Monday, 23 December 2024

फलज्योतिषाचं थोतांड - भाग ५

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_फलज्योतिषाचं थोतांड_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_23.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भाग ५_*

*_ज्योतिषांना आव्हान_*

_जर कुणाचा असा दावा असेल की, 'आम्ही भविष्य सांगू शकतो.' तर त्याला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पाच लाखाचं आव्हान आहे. हे आव्हान काय आहे? *माणसं आज कशाकरता ज्योतिषाकडं जातात? माणसं याच्यासाठी जातात की- आपल्याला शिक्षण किती आहे ? नंतर आपल्याला नोकरी कशी मिळेल? नंतर आपलं लग्न होईल ती बायको कशी असेल? आपल्याला मुलं किती होतील? आयुष्यामध्ये अकल्पित काही चांगल्या वाईट गोष्टींचा योग आहे का? धनप्राप्ती किंवा परदेशगमन किंवा काही अपघात आहे का? वगैरेवगैरे.*_

_*आम्हा ज्या कुणा ज्योतिष्याची आव्हान स्वीकारण्याची तयारी असेल त्याला २० कुंडल्या देऊ. या २० कुंडल्यांच्या आधारे त्यानं कितीही वेळ घ्यावा; पण या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. की त्या व्यक्तीचं लग्न कितव्या वर्षी झालं? त्या व्यक्तीचं शिक्षण किती? त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती किती ? या व्यक्तीला मुलं आणि मुली किती? याच्या जीवनामध्ये काही महत्त्वाची गोष्ट-अपघात किंवा परदेशगमन किंवा लॉटरी लागणं-या स्वरूपाची घडली आहे काय? याच्या जीवनामध्ये काही वेगळं सांगावं असं काही आहे काय? जर त्याची उत्तरं ८० टक्के बरोबर दिली, तर आम्ही असं मानू की, 'ज्योतिष हे शास्त्र आहे.' हे मानावयास जागा आहे.*_

_याचबरोबर *एकाच वेळी या २० कुंडल्या वेगवेगळ्या पाच प्रख्यात ज्योतिष्यांना दिल्या जातील. आपल्याला माहीत आहे की, वैद्यकशास्त्र हे शास्त्र का आहे. जर तुम्ही भारतामधल्या, पाकिस्तानमधल्या, चीनमधल्या कुठल्याही डॉक्टराला रक्तातील साखरेचा जर रिपोर्ट दाखवला तर तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे तो सांगेल. कारण त्याबद्दलचे निकष समान आहेत. तुम्ही जर इंग्लंडमधल्या, अमेरिकेमधल्या, फ्रान्समधल्या माणसाला रोग्याचा एक्स-रे दाखवलात, तर तो क्षय आहे की नाही हे तुम्हांला सांगेल; कारण त्याबाबतचे निकष हे समान आहेत. जर फलज्योतिष हे शास्त्र असेल, तर पाच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पाच नामवंत ज्योतिष्यांना बसवून प्रत्येकाला त्याच पाच पत्रिका देऊ आणि त्यांची जी उत्तरं आहेत ही त्यांची उत्तरं जर समान आली तर असं मानायला जागा आहे-निदान त्याच्या पातळीवर तरी शास्त्राचे निकष एक आहेत; तरी ज्योतिष हे शास्त्र आहे, हे मानायला आम्ही तयार आहोत.*_

_*प्रत्यक्षामध्ये असं लक्षात येतं की 'या स्वरूपाचं आव्हान स्वीकारा' म्हटलं की या ना त्या स्वरूपाची कारणं सांगून माणसं माघारी वळतात. आणि इतर वेळेला 'फलज्योतिष हे शास्त्र आहे' याच्यासाठी भलीमोठी लंबीचौडी भाषणं ठोकत असतात. तेव्हा 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' या पद्धतीनं आम्ही त्याची तपासणी करू इच्छितो.*_ 

_अनेक आव्हानं या संदर्भामध्ये सांगता येतील. आणि कुठल्याही 'ज्योतिष हे शास्त्र आहे' म्हणणाऱ्या किंवा स्वतः त्यासाठी चाचणी देण्यास पुढं येणाऱ्या माणसाचं आम्ही स्वागतच करतो._

*_क्रमशः_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*

*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २३/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...