Monday, 1 April 2024

स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - १०

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन_*

*_डॉ. नरेंद्र दाभोलकर_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/04/blog-post.html

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_भाग १०_*

*_कार्यकारण तपासा_*

              _याचा अर्थ काय ? याचा अर्थ असा की, या परंपरांच्या निमित्ताने आपण स्वतःला फसवण्याचं निमित्त निर्माण करतोय. हे सगळं जर आपण लक्षात घेतलं, तर स्त्रीच्या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये या सगळ्या रूढीपरंपरांचा किती मोठा वाटा आहे, हे आपल्याला कळू शकेल. म्हणजे मला एकदा एक जण येऊन म्हणाले, "दाभोलकर, तुम्ही काहीही म्हणा हो, पण शेवटी पायगुण नावाची काही गोष्ट असतेच. नवीन सून घरात आल्यानंतर काही घरांना ती लाभते; काही घरांना ती लाभत नाही. आता बघा, हे अमकं अमकं घर. त्यांच्या घरी लग्न होऊन नवीन सून आली. नवीन सून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत काय काय होऊ नये! तिच्या नवऱ्याची होणारी बढती थांबली; तिचा दीर नापास झाला; तिच्या नणंदेचं लग्न मोडलं; तिच्या सासऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली; तिच्या सासूला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. आता नवीन सून घरात आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जर असं घडत असेल, तर *तिला पांढऱ्या पायाची नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं!"*_

                _मी त्यांना म्हणलो, "मला सांगा, नवऱ्याची नोकरीतली बढती नेमकी कशामुळे थांबली?" ते म्हणाले, "तसं काही नाही. बॅकलॉक डावलून त्याला बढती देणार होते, पण ऐन वेळी कुणीतरी बॅकलॉकचा मुद्दा काढला आणि त्याच्यामुळे त्याला बढ़ती मिळाली नाही". मी म्हणालो, "बारावीला तिचा दीर नापास झाला, हे बरोबर आहे, पण दहावीला कितव्या वेळेला पास झाला होता?" ते म्हणाले, "दहावीला त्याला तीन वेळा बसावं लागलं होतं. आता, जो दहावीला तिसऱ्या वेळेला पास झाला, तो बारावीला पहिल्या वेळेला कसाकाय पास होईल? मी म्हणालो, "नणदेचं जे ठरत आलेलं लग्न मोडलं, ते का मोडलं?" ते म्हणाले, "ही काय पद्धत आहे का! ऐन लग्राच्या वेळेला मुलाकडच्यांनी दहा तोळे सोनं मागितलं. मी म्हणालो, "म्हणजे लग्न कशावरनं मोडलं ? सुनेच्या पायगुणाने मोडलं नाही; देण्याघेण्याच्या प्रकारावरनं मोडलं. आणि तिच्या सासऱ्यांना शिक्षा का झाली?" ते म्हणाले, "नाही, ते तसे पैसे खाणाऱ्यातलेच होते, त्यांच्यावर खटलाही चालू होता, पण त्या खटल्याचा निकाल लागायला आणि लग्न होऊन अवघे दोन महिने व्हायला एकच वेळ आली आणि तो निकाल त्यांच्या विरोधात लागला. तसा तो लागणारच होता; आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं". आता लक्षात घ्या, ज्या बाईच्या मुलाचं प्रमोशन थांबलंय, ज्या बाईचा एक मुलगा बारावीला नापास झालाय, जिच्या मुलीचं ठरत आलेलं लग्न मोडलंय, जिच्या नवऱ्याला तुरुंगात जावं लागलंय, त्या बाईला, म्हणजे या मुलीच्या सासूला ब्लड प्रेशर होईल नाहीतर काय होईल! *म्हणजे ते गृहस्थ सांगत असलेल्या प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभाव आहे, परंतु तो तपासण्याची संधी मात्र या परंपरेने स्त्रीला दिलेली नाही.*_

           _याचं कारण, *तिच्यावर एक जीवनव्यापी गौणत्व लादण्यात आलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना मुळात शिक्षणाची संधी अगदी अलीकडे मिळाली. स्त्रियांच्या शिक्षणाचा या देशामधला इतिहास १५० वर्षांपेक्षा जास्त नाही आणि खरं बोलायचं तर तो स्वातंत्र्यानंतरच थोडा अधिक प्रभावीपणे सुरू झाला. सुरुवातीला स्त्रियांचं शिक्षण म्हणजे 'होम सायन्स', असंच समीकरण रूढ होतं. मात्र होम सायन्स हा शास्त्राचा विषय आहे आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे, हे विद्यापीठामध्ये अलीकडे, म्हणजे अवघ्या ६०-७० वर्षांपूर्वी मानलं जायला लागलं; त्यामुळे ज्या वेळेला स्त्रीला शिक्षणाची संधी मिळाली आणि मुली मोठ्या प्रमाणात शिकायला लागल्या, त्या वेळेला शिक्षणामुळे तिच्यामध्ये 'चिकित्सा करण्याची प्रवृत्ती रुजण्याऐवजी' त्या शिक्षणाकडे स्वाभाविकपणे 'कुशल रोजगाराची संधी' म्हणून बघण्यात आलं. म्हणून ती बाई जरी बी. एस्सी. बी. एड. झाली, तरी 'आपण व्रत का करतो आणि त्या व्रताचा अर्थ काय असतो', याचा चिकित्सकपणे, डोळसपणे विचार करण्याची गरज तिला राहत नाही.*_

              *_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-०१/०४/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन - लेखक डॉ नरेंद्र दाभोळकर*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...