_*प्रश्न १६ -* तुम्हाला देवाचा आधारही वाटत नाही आणि देवाची भीतीही वाटत नाही, हे आता आम्हाला जवळपास कळलंय. पण सर्वसामान्य लोकांना मात्र देवाची पूजा करण्यामध्ये एक आत्मिक समाधान मिळतं. अशा प्रकारच्या *मनःशांती देणाऱ्या पूजेला तुमचा आणि अंनिसचा विरोध आहे का? जर असेल, तर त्यांना मनःशांती मिळवून देण्याचा तुमच्याकडे दुसरा काय उपाय आहे?*_
_*उत्तर - पहिली गोष्ट अशी की, देवाच्या पूजेला आमचा विरोध नाही. याचं साधं कारण असं की, प्रत्येकाला भारतीय राज्यघटनेनं हा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला धर्मपालनाचा, उपासनेचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा असे सर्व अधिकार राज्यघटनेनं दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधी जाण्याचं मला काहीच कारण नाही.*
_मला फक्त एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, मनःशांती किंवा मन अस्वस्थ आहे, तर काय कराल? एक, झोपेची गोळी घ्याल. दोन, एखादा पेग घ्याल. तीन, देवळात जाल. चार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याल. तुम्ही माझ्याकडे आलात, तर मी म्हणेन की, 'अरे बाबा, तुझं डोकं दुखतंय. पण का दुखतंय ? सर्दी झाली म्हणून डोकं दुखतंय, चष्म्याचा नंबर बदलला म्हणून डोकं दुखतंय, ब्लड प्रेशर वाढलं म्हणून डोकं दुखतंय, का मेंदूत ट्यूमर झाला म्हणून डोकं दुखतंय... हे शोधू या.' तुम्ही जर म्हणालात की, 'नाही, तसं काही नाहीये मला. माझी तब्येत फिट आहे.' मग मी म्हणेन, 'बायकोशी भांडण झालंय का? पोरगं नीट वागत नाहीये का? बॉस फार त्रास देतो का?' *मी सांगतोय हे सगळं कार्यकारण शोधणं आणि त्याच्यावर उत्तर मिळवणं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जर म्हणालात, 'काही करू नका. मन:शांती मिळेल. मागं फक्त तसबीर लावा- 'भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.' तर कसा काय तो पाठीशी येणार? तो काय करणार? तुमच्या बायकोला शांत करणार? पोराला सुधारणार? तुमच्या बॉसला सांगणार? म्हणजे माझ्या प्रश्नांची उत्तरं मलाच शोधली पाहिजेत.*_
_बाकीचे सोडा, *दस्तुरखुद्द साने गुरुजी - साधनेचा मी संपादक आहे- म्हणायचे, 'मला देव लागतो. कारण मी माणूस आहे. माझ्या मनात जर पापी विचार आला, तर मी देवाला विनंती करतो की, देवा मनातला पापी विचार दूर कर.' बरोबर आहे. अशा कारणासाठी जर देव लागत असेल, तर ती एका अर्थानं वरिष्ठ पातळीवरची मनःशांती आहे. त्याला विरोध असायचं काय कारण आहे?*_
_परंतु आपली सध्याची मन:शांती म्हणजे मनाची शांती बिघडावी अशा सगळ्या गोष्टी रोज करायच्या आणि नंतर देवाला येऊन म्हणायचं, 'काय देवा पटतंय का, बघा आपलं. काही मनःशांती वगैरे द्या. तुमचं काय असेल, ते आपण भागवून घेऊ.'_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- १४/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_43.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment