_*प्रश्न २२ -* अलीकडच्या काळातले अनेक बाबा आणि बुवा बऱ्यापैकी पैसे मिळवायला लागलेत, असं दिसतं. त्यातून ते समाजोपयोगी बरीचशी कामं करताना दिसतात. उदा. हॉस्पिटल्स किंवा शिक्षणसंस्था... तर लोकांच्या मनात असं येतं की, 'ठीक आहे, *थोडीफार बुवाबाजी ते करत असतील, पण त्यांना मिळणाऱ्या पैशांतून समाजाचं काहीतरी भलं होतंय, तर त्याला अंनिसचा विरोध का आहे?'*_
_*उत्तर -* काय आहे की, *ते थोडीफार बुवाबाजी करत नाहीत, बरीच बुवाबाजी आणि थोडंफार काम करतात, ही खरी अडचण आहे. म्हणजे आता सत्यसाईबाबांनी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स काढली, पाण्याच्या कूपनलिका खोदल्या, उत्तम शिक्षणसंस्था काढल्या... या सगळ्यांसाठी चारशे कोटी रुपये खर्च केले. पण त्यांच्या मृत्यूच्या वेळी जाहीर झालं की, त्यांची एकूण मालमत्ता चाळीस हजार कोटी रुपयांची होती! आता ज्याला चाळीस हजार कोटी रुपये मिळतात, त्याने निदान एक टक्का रक्कम सामाजिक कामासाठी द्यावी, एवढं शहाणपण असतं की नाही हो?* तुम्हालादेखील उद्या जर एक कोटी रुपये मिळाले, तर तुम्ही सगळेच्या सगळे पैसे बँकेत ठेवणार नाही. तुम्ही म्हणणार, 'लोकांच्या डोळ्यांवर येईल. लाख-दोन लाख रुपयांचं काहीतरी करू आपण आणि मग बाकीचे पैसे आपल्यासाठी वापरू.'_
_*दुसरी गोष्ट अशी, हे सगळे बाबा जी समाजोपयोगी कामं करतात, त्याच्या हजार पटीनं जास्त काम कुठल्याही राज्याचं शासन करतं. पण त्यावर तुम्ही काय म्हणता, 'काय उपकार करतात काय ! आमच्याच पैशानं करतात.' मग बाबा कुणाच्या पैशानं करतात ? बरं, तुम्ही त्या सरकारला पाच वर्षांनी प्रश्न विचारता- 'तुला मत दिलं होतं. पुरेसं काम केलं नाहीस. तुला खुर्चीतून काढून टाकीन. नवीन माणसाला बसवीन.' पण बाबाला प्रश्न विचारता काय? म्हणजे तुम्ही हजारपट जास्त कामं करणाऱ्या सरकारची चिकित्सा करता आणि बाबाची चिकित्सा करण्यासाठी मात्र तुमची जीभ लुळी पडते!*_
_त्यामुळे त्यांची कामं ही एक प्रकारे, अप्रत्यक्षरित्या मानसिक गुलामी निर्माण करण्यासाठी केलेलं साधन आहे, हे लक्षात घेऊन 'मर्यादित अर्थानं जे काही भलं साधत असेल ते चांगलंच आहे,' असं आपण म्हटलं पाहिजे. मात्र त्याचा व्यापक परिप्रेक्ष्य लक्षात घेतला पाहिजे._
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- २०/०१/२०२४_*
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_19.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment