Thursday, 18 January 2024

देव आणि धर्म हेच सर्व अंधश्रद्धांचं कारण आहे किंवा हेच सर्व अंधश्रद्धांचं मूळ आहे

_*प्रश्न २१ -* आत्तापर्यंत वीस प्रश्न झालेत. उपलब्ध वेळेत आपण आणखी पाचेक प्रश्न घेऊ शकू. हे जे पाच प्रश्न आमच्यासमोर आहेत, ते अंधश्रद्धाळू नसलेल्या लोकांकडून विचारले जाणारे आहेत. त्यांतला पहिला मुख्य प्रश्न असा आहे की, *देव आणि धर्म हेच सर्व अंधश्रद्धांचं कारण आहे किंवा हेच सर्व अंधश्रद्धांचं मूळ आहे, पण त्याविरोधात आवश्यक तितकी कठोर भूमिका अंनिसकडून घेतली जात नाही.* डॉ. श्रीराम लागू अंनिसच्या व्यासपीठावर अनेक वेळा आले आहेत, त्यांचीही भूमिका याबद्दल जास्त कठोर होती. ते असं म्हणायचे की, *'ईश्वर हीच सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. तिच्यावर पहिला आघात करा.' पण तुम्ही तसं करत नाही...*_

_*उत्तर -* तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. *डॉ. लागूंच्या मताशी मी सहमत नाही, म्हणूनच आम्ही विवेक-जागराचे जाहीर वाद-संवाद चालवायचो.* याचं अगदी थोडक्यात उत्तर देता येईल. *पहिलं, राज्यघटनेनं जर व्यक्तीला देव आणि धर्म मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असेल तर मला हे म्हणण्याचा अधिकार नाही की, देव आणि धर्म सोडल्यानंतरच या देशामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन होईल. दुसरं, गंमत अशी आहे की, प्रत्येक जण मला येऊन असं सांगतो- 'देव आणि धर्माला नकार दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन होईल, पण त्यातून फक्त माझा धर्म वगळा.' म्हणजे प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की, 'बाकीचे सगळे धर्म अंधश्रद्धेला पूरक आहेत आणि माझा धर्म मात्र अंधश्रद्धा घालवणारा आहे.'*_

                 _त्यामुळे आम्ही काय करतोय, ते कृपा करून लक्षात घ्या. *आम्हाला जो अंधश्रद्धांचा प्रचंड लांबी-रुंदीचा रस्ता चालायचाय, त्या रस्त्यावर देवा-धर्माची मोठी मोठी मंदिरं वगैरे आहेत, हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही त्यांना विरोध करत नाही. कारण ज्या रस्त्यावरनं तुम्ही जाणार, त्यावर अंधश्रद्धांच्या नावानं धर्मश्रद्धांच्या आधारे आलेले अनेक खड्डे, दगड, काटे, हिंस्र श्वापदं आहेत... ती दूर करणं आम्ही महत्त्वाचं मानतो.*_

                _पण तुम्ही जर मला म्हणाला की, 'हा संपूर्ण रस्ता मोकळा करा.' तर मी म्हणेन, आम्हाला ते सगळे दगड हलवता येत नाहीत; सगळे खड्डे भरता येत नाहीत आणि सगळ्या हिंस्र श्वापदांचाही बंदोबस्त करता येत नाही. म्हणून आम्ही तुमच्या हातांमध्ये एक छोटी चिकित्सेची बॅटरी देऊन एवढंच म्हणतो की- *'बाबांनो, तुम्ही या रस्त्याने जाणार आहात, डाव्या बाजूला देवाची मंदिरं आहेत. तुम्हाला देवाकडे जायचंय का नाही बघा, पण निदान या खड्ड्यात पडू नका.* त्या हिंस्र श्वापदांपासून जरा सावध राहा. पायामध्ये काटे टोचणार नाहीत, हे बघा. दगडावर आपटून कपाळमोक्ष करून घेऊ नका.' *मात्र तुम्ही जर असं म्हणालात की, 'नाही, या खड्ड्यामध्येच मला मूर्तीचा साक्षात्कार होणार आहे आणि मला गुप्तधन मिळणार आहे.' तर तुम्हाला खड्ड्यात पडून पाय मोडून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही.*_

                    _आता यातला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा की, सगळ्याच धर्मांना एक वाक्य लागू आहे आणि म्हणूनच धर्मामध्ये ताकद आहे. *धर्मामध्ये चार गोष्टी असतात. एक- शोषण, दोन- पुरोहितशाही, तीन- तत्त्वज्ञान आणि चार- नीती. धर्मातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, धर्म असा विश्वास देऊ इच्छितो की, अंतिम विजय मांगल्याचाच होईल.* आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की, 'अरे, आज नाही, पण अंतिमतः मांगल्याचा विजय झाला पाहिजे'. आणि धर्म तुम्हाला ती शक्ती देतो. तुकाराम जर का असं म्हणत असतील की,_

_'जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।।_

_तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।'_

                 _तर तुकारामांशी भांडण करायचं मला काय कारण आहे? *मला अंधश्रद्धांचं निर्मूलन करायचंय, देव आणि धर्मश्रद्धा यांचं निर्मूलन नाही करायचं. या दोहोंत व्यवस्थित फरक करून ज्या अर्थी पंचवीस वर्ष चळवळ आम्ही चालवलेली आहे, त्या अर्थी डॉ. लागूच्या प्रश्नाला आम्ही व्यावहारिकदेखील उत्तर दिलेलं आहे.*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  १९/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_18.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

भिक्खु, भदंत आणि उरगेन

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_भिक्खु, भदंत आणि उरगेन_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_22.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_भि...