Wednesday, 10 January 2024

कोणत्याही स्वरूपातला देवही नाकारताय का?

_*प्रश्न १३ - तुम्ही धर्म नाकारताय, तसा कोणत्याही स्वरूपातला देवही नाकारताय का?*_

_*उत्तर -* हाही पुन्हा असाच एक प्रश्न आहे की, ज्याचं मला फार सविस्तर उत्तर दिलं पाहिजे. *पहिली गोष्ट अशी की, 'देव नाकारताय का?' असा प्रश्न ज्या वेळी तुम्ही मला विचारता, तेव्हा तुम्ही देवाची व्याख्या केलेली नाही. तुम्ही जर मला असं विचारलं असतं की, 'जगाची निर्मिती करणारा, जगाचं नियंत्रण करणारा, चमत्कार करणारा, नवसाला पावणारा देव तुम्ही नाकारता का?' तर मी निःसंदिग्धपणे असं म्हटलं असतं की, 'हो, हा देव मी नाकारतो.' पण तुम्ही जर मला असं विचारलं असतं की, 'गाडगेबाबांनी देवाची जी कल्पना स्वीकारली, ती तुम्ही नाकारता का?' तर मी म्हणेन, नाही!*_ 

                    _तुम्हाला कदाचित माहीत नसेल, *गाडगेबाबा तीस वर्षं आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला गेले. पण एकदाही त्यांनी उपवास केला नाही. एकदाही ते देवळात गेले नाहीत. लोकांनी खराब केलेला चंद्रभागेचा किनारा ते स्वत:च्या खराट्याने साफ करायचे, रात्री कीर्तनाला उभे राहायचे आणि समोरच्या हजारोंच्या श्रोतृसमुदायाला विचारायचे, 'बापो, द्येव पाहिला का द्येव ?' लोकांना वाटायचं, 'कमाल आहे! आम्ही इथं कशाला आलोय ?' लोक म्हणायचे, 'पाहिला जी!' बाबा म्हणायचे, 'कमाल आहे! तुम्ही द्येव पाहिला? तुमचा द्येव कोठे राहतो?' लोकांना वाटायचं, 'या माणसाला काहीच माहीत नाही.' ते म्हणायचे, 'अरे आमचा देव देवळात राहतो, तो विटेवर उभा आहे, त्यो रंगाने सावळा आहे, त्याचे हात कटीवर आहेत, त्याच्या बाजूला रखमाई आहे.' बाबा म्हणायचे, 'कमाल आहे! तुमचा देव देवळात राहतो? माझा देव माझ्या मनात राहतो.' तरी लोकांना काही कळायचं नाही. मग बाबा विचारायचे, 'तुम्हारे देवाले अंघोळ करते की नाही?' लोक म्हणायचे, 'करते तर!' बाबा म्हणायचे, 'तुम्हारे देवाले अंघोळ कोन घालते?' लोक म्हणायचे, 'आम्हीच घालतो जी!' बाबा म्हणायचे, 'अरे, जे तुमचे देवाले स्वतःचे अंघोळ स्वतःले करता येत नाही, तो तुम्हाला तुमच्या भाग्याची अंघोळ रे काय घालणार!' मग पुढे बाबा विचारायचे, 'तुम्हारे देवाले धोतर नेसते की नाही?' लोक म्हणायचे, 'नेसते तर!' बाबा म्हणायचे, 'अरे, जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वतःले नेसता येत नाही, तो तुम्हाला तुमच्या भाग्याचे वस्त्र रे काय देणार!' पुढं बाबा म्हणायचे, 'तुम्हारे देवाले नैवेद्य दाखवते की नाही?' लोक म्हणायचे, 'दाखवते.' बाबा म्हणायचे, 'नैवेद्य दाखवून काय करते?' लोक म्हणायचे, 'नैवेद्याच्या बाजूला हातात काठी घेऊन बसते.' बाबा म्हणायचे, 'कशाला?' लोक म्हणायचे, 'कावळा-कुत्रा ते नैवेद्य खायला येईल, त्याला हाकायला.' बाबा म्हणायचे, 'अरे, जे तुमचे देवाले तेच्यासाठी वाढलेल्या स्वत:च्या नैवेद्याचे स्वत: ले रक्षण करता येत नाही, तो तुमच्या आयुष्याचं रक्षण रे काय करणार!'*_

                    _आणि मित्रांनो *पुढं बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे, 'जित्ताजागता देव कुणी पाहिला का जित्ताजागता देव?' लोक कावऱ्या-बावऱ्या चेहऱ्यानं इकडंतिकडं बघायला लागायचे. गाडगेबाबांच्या बाजूला एक माणूस उभा असायचा. चेहरा रापलेला, पांढरीशुभ्र दाढी, अंगावर जाडेभरडे खादीचे कपडे, पाय अनवाणी. त्याच्याकडे बोट दाखवत बाबा म्हणायचे, 'अरे, हे भाऊराव पाटील बघा. हे महारामांगाच्या पोरांना शिकवण्याचं काम करते. त्येला देव म्हणा. त्ये गांधीबाबा बघा. ते देशासाठी मर मर मरते. त्येला देव म्हणा. अरे, अडाण्याला शिक्षण द्यावं, आजाऱ्याला औषध द्यावं, बेघराला घर द्यावं, रंजल्या-गांजलेल्याची सेवा करावी, मुक्या प्राण्यावर दया करावी... बाप हो, द्येव होच्यात राहते. बाप हो देव देवळात राहत नाही. द्येव आपल्या मनात राहते, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते.'*_

               _म्हणजे, तुम्ही कशाला देव मानता, याच्यावर अंनिसचं उत्तर अवलंबून आहे. *तुम्ही जर म्हणालात, ' 'नैतिकतेचा आविष्कार' असा आम्ही देवाचा अर्थ लावतो', तर मी असं म्हणेन की, 'माझा विवेक मला हा आदेश देतो, पण तुमचा देव जर तुम्हाला नैतिकतेचा आदेश देत असेल, तर मी त्याचं पूर्ण स्वागत करतो.'*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संकलन - महेश कांबळे_*

*_दिनांक :-  ११/०१/२०२४_*

*_संदर्भ :-_*

*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post_10.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...