_*प्रश्न ४ -* पहिल्या तीनही प्रश्नांच्या उत्तरांमधून अंनिसची भूमिका कोणत्या प्रकारची आहे, याचा अंदाज आपल्याला यायला लागलेला आहे. आता एक मूलभूत प्रश्न, ज्याचा सामना आपण सर्वांनीच आयुष्याच्या सुरुवातीला केलेला असतो. तो म्हणजे भूत. *भूत हा नेमका काय प्रकार असतो, भूत खरोखर असतं का, या प्रश्नांनी प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा त्रास दिलेला असतो. तुमची त्याबद्दलची काय भूमिका आहे?*_
_*उत्तर - आमची भूमिका अशी आहे की, जगात भूत कुठंच नसतं, ते तुमच्या- आमच्या मनात असतं.* अनेक लोक असं विचारतात की, *भूत खोटं असतं का ? तर होय, भूत खोटं असतं.* पण तुम्हाला जे वाटतं, ते खरं असण्याची शक्यता असते. म्हणजे काय? तर *भूत हे भीतीचं, भ्रमाचं किंवा भासाचं असतं.*_
_भीतीचं भूत आपण समजू शकतो. समजा एखादा पडका वाडा आहे आणि त्या ठिकाणी स्मगलिंग चालतं, आणि त्या ठिकाणी भुताटकी आहे, असं पसरवलं गेलं, तर कदाचित अशी शक्यता आहे की, त्यांचं स्मगलिंग व्यवस्थित चालू शकेल. त्यामुळे त्यांना भुताच्या भीतीचा उपयोग करता येतो._
_पण भूत भासाचं असतं म्हणजे काय? मी आणि माझा मित्र एकदा स्मशानाच्या बाजूच्या रस्त्याने रात्री बाराच्या दरम्यान चाललेलो होतो. आम्ही स्मशानापासून लांब होतो. एक पांढरी आकृती हवेतून इकडून तिकडं आणि तिकडून इकडं जाताना माझ्या मित्राला दिसली. तो माझ्या मागे स्कूटरवर बसला होता. तो काही बोलला नाही. थोड्या वेळानं माझं लक्ष गेलं आणि मलाही ती दिसली. मी त्याला म्हटलं, 'अरे, तू बघितलंस का?' तो म्हणाला, 'मी मगाशीच बघितलंय.' स्मशानाजवळ रात्रीच्या वेळेला एक पांढरी आकृती हवेतून इकडून तिकडं आणि तिकडून इकडं जातीये, असं म्हटल्यानंतर दोनच शक्यता उरतात. एक, लवकरात लवकर स्कूटर फास्ट करून निघून जायचं. दोन, जाऊन बघायचं. *म्हणून आम्ही जवळ जाऊन बघितलं. त्या वेळी लक्षात आलं की, त्या स्मशानाजवळ डोंबाऱ्यांची पालं होती. दोन बाजूला बांधलेल्या काठ्यांवर पांढऱ्या पातळातली एक मुलगी दोरीवर चालण्याचा सराव करत होती. हे जर आम्ही बघितलं नसतं, तर हवेतून इकडून तिकडं आणि तिकडून इकडं जाणारी पांढऱ्या कपड्यांतली बाई आम्हाला लांबून भूतच वाटलं असतं. हा झाला भास.*_
_आता भ्रम याचा अर्थ काय ? दोन प्रकारचे मनोजन्य आजार असतात. उदाहरणार्थ एक व्यक्ती कालपर्यंत व्यवस्थित बोलत होती. आज अचानक तिचा चेहरा, आवाज बदलला. ती डोळे मिचकवायला लागली, चुटक्या वाजवायला लागली, स्वतःभोवती गिरक्या घ्यायला लागली आणि दुसऱ्या दिवशी परत नीट झाली. तर पहिली शंका काय येते ? *काल हिला भुतानं धरलं होतं आणि आज हिची बाधा दूर झालेली आहे. कारण मन अचानक आजारी पडतं आणि तितक्याच अचानक बरं होऊ शकतं, हे आपल्याला माहीत नसतं.*_
_*मगाशी मी तुम्हाला पांढऱ्या भुताचं उदाहरण सांगितलं, तो इंद्रियजन्य भ्रम होता. मनोजन्य भ्रम वेगळा असतो. त्यामध्ये काहीच नसतं, तरीदेखील दिसतं. समोर कुणीच नसतं, पण पांढरी जख्खं बाई उभी आहे, असं वाटतं. बाजूला कुणीच बोलत नसतं, पण कुणीतरी कानात सारखा संदेश देतंय असं वाटतं. आजूबाजूला कसलाच वास नसतो, पण कुजलेल्या कचऱ्याचा वास येतो. या सर्व गोष्टींना hallucinations किंवा मनोभ्रम म्हणतात. परंतु हे माहीत नसल्यामुळे, एखादी व्यक्ती विचित्र वागायला लागल्यावर तिला भुतानं झपाटल्याची शंका आपल्याला येते.*
_*एकदा माझा टीव्हीवर फोनो घेत होते. त्याच वेळी त्या टीव्हीवर भुताचे फोटो दाखवत होते. दिल्लीवरून फोन कनेक्ट झाला आणि तिकडच्या अँकरनं विचारलं की, 'आपल्याबरोबर डॉ. दाभोलकर आहेत, त्यांना आम्ही हे सगळे भुताचे फोटो दाखवतोय. तर डॉक्टर, याच्याबद्दल आपलं काय मत आहे?' तेव्हा मी जोरात म्हटलं की, "It is a fraud'. ते त्यांना अपेक्षित नव्हतं. ते सगळ्यांना ऐकू जातं ना! ते म्हणाले, 'नाही-नाही आम्ही काही fraud करत नाही.' मी म्हटलं, 'अहो, तुम्ही फ्रॉडच करताय.' ते म्हणाले, 'नाही-नाही हे भुताचे फोटो आम्ही परिश्रमपूर्वक मिळवलेले आहेत.' मी म्हटलं, 'अहो, तुम्ही भुताचे फोटो मिळवलेत, पण आम्हाला तपासायला दिले का ? तुम्ही कुठं तपासले, कसे मिळवलेत, हे तुम्ही सांगितलंत का?' तर मित्रहो, भूत असतं, असं सांगितलं जातं, त्या वेळी ती भीती असते किंवा भ्रम असतो किंवा भास असतो किंवा माध्यमांचा बदमाशपणा असतो.*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन - महेश कांबळे_*
*_दिनांक :- ०१/०१/२०२४
*_संदर्भ :-_*
*_१) प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे (मुलाखत - विनोद शिरसाठ दिनांक ०८/०४/२०१३)*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/01/blog-post.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment