🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बौद्ध लेण्यांमधिल बोधिसत्त्वाच्या आणि इतर मूर्तीविषयी_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_बौद्धधम्मप्रमाणेच ब्राह्मणी धर्मात सुरुवातीला मूर्तिपूजा नव्हती. महायानी पंथात मूर्तिपूजा झाल्यावर किती काळ नंतर हिंदू धर्मात मूर्तिपूजा सुरू झाली. कोणी कोणाचे देव घेतले हा वादाचा प्रश्न आहे._*
*_बरेच लेणी अभ्यासक लेणींवर अभ्यास करण्यासाठी जात असतात, अनेक पर्यटक लेणींवर येत असतात अश्या वेळी लेणींवरील असलेली मूर्ती कोणाची हे त्यांना ओळखता येत नाही, अश्या लेणी अभ्यासकांसाठी सोबत नवीन पर्यटकांसाठी मुर्त्या समजावून सांगण्यासाठी हा अल्पसा प्रयत्न..._*
*अवलोकितेश्वर :-* महायानामध्ये अवलोकितेश्वर हा एक फार महत्त्वाचा आणि उपासकांचा आवडता बोधिसत्त्व आहे. त्याच्या डाव्या हातात देठासकट कमळाचे फुल असून उजव्या हातात अमृताचा घट असतो. बऱ्याच वेळा त्याच्या दोन्ही बाजूस दोन स्त्रियांच्या आकृत्या असतात. त्यापैकी एक तारा आणि दुसरी भ्रुकुटी असते. खाली चबुतऱ्यावर शूचिमुख नावाचा प्राणी दयेची भीक मागत आहे असे दाखविलेले असते. अवलोकितेश्वराच्या आणि बहुतेक इतर बोधिसत्त्वाच्या डोक्यावर अत्यंत कलाकुसरीचे काम असलेला रत्नजडीत मुकुट असतो. मुकुटावर वरच्या भागात नेहमीच भगवान बुद्धाची एक लहानशी मूर्ती असते. बोधिसत्त्वाने "जानवे" घातलेले दाखवतात.
*पद्मपाणी :-* पद्मपाणी हा एक महत्त्वाचा महायानी बोधिसत्त्व आहे. त्याच्या एक हातात देठासकट कमळाचे फूल असून दुसऱ्या हाताने उपासकांना संरक्षण देत आहे किंवा त्यांना उपदेश करत आहे, असे दाखविलेले असते.
*मंजुश्री :-* मंजुश्री बोधिसत्त्व आसनावर किंवा सिंहासनावर बसलेला दाखवितात मंजूश्री म्हणजे शहाणपण, वक्तृत्त्व आणि तल्लख बुद्धिमत्ता. चुकीच्या गोष्टी आणि असत्य यांना कापून टाकण्यासाठी त्याच्या उजव्या हातात तलवार आहे. त्याच्या डाव्या हातातील पुस्तक बुद्ध धम्मातील दहा पारमितांचे प्रतीक आहे. मंजूश्री नावाच्या धम्मोपदेशकाने बुद्धधम्म प्रथम नेपाळात नेला. त्यालाच बोधीसत्त्वाचे स्वरूप दिले असले पाहिजे असे कित्येक पाश्चात्य पंडितांचे मत आहे.
*वज्रपाणि :-* वज्रपाणि बोधिसत्त्वाच्या उजव्या हातात शंख असून डाव्या हाताने वज्र धरले आहे. त्याच्या शिरस्त्राणांत कधीकधी नाग दाखविलेले असतात. कधीकधी वज्रपाणिला तीन शिरे आणि सहा हात दाखविलेले असतात. ह्या सहा हातांत शंख, वज्र, माला बाण, धनुष्य आणि पाश धरलेले असतात. शक्ती नावाची स्त्री त्यांच्या शेजारी बसलेली असते.
*तारा :-* महायानी पंथात तारा ही अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची सहचारिणी आहे. ती नेहमीच न चुकता उपासकांचे संरक्षण करते अशी समजूत आहे. तिच्या डाव्या हातात देठासकट कमळाचे फूल असते आणि उजव्या हाताने ती उपासकांना संरक्षण देत आहे, असे दाखविलेले असते. तारापूर शहर तिच्याच नावावरून पडलेले दिसते.
*प्रज्ञापारमिता :-* महायान पंथामध्ये प्रज्ञापारमिता ही विद्येची देवी मानलेली आहे. ती कमळाच्या फुलावर बसलेली असून तिने ग्रंथ आणि कमळाचे फूल हातात धरलेले असते. कधी कधी तिला दहा हात असलेले दाखवतात. त्या हातात, एक पात्र, दोरीचा पाश, शंख, ग्रंथ, कमळाचे फूल, ध्वज, फळ, माला, तलवार, आणि शेवटचा हात अभय मुद्रेत दाखविलेला असतो.
*मारिची:-* ही आणखी एक महायान पंथातील देवी आहे. तिला तीन तोडे असतात. त्यापैकी एक सूकराचे असते. तिला सहा हात असून त्या हातामध्ये सूई, दोरा, अंकुश, बाण, धनुष्य, वज्र आणि अशोक आहे असे दिसते. ती घोड्यांच्या किंवा सूकराच्या रथात बसलेली असते.
*जाम्बाल :-* जाम्बाल हा महायान बौद्धांचा धनदौलतीचा देव आहे. त्याच्या एका हातात फळ असून दुसऱ्या हातात पैशाची थैली असते. कधी कधी त्याला चार हात आहेत असे दाखविलेले असते. त्या चार हातात पात्र, तलवार, कमळाचे फूल आणि आहेत असेही दाखविलेले असते. मुंगूस घरले
*त्रैलोक्य विजय :-* हा एक क्वचितच दाखविलेला महायान पंथाचा देव आहे. त्याची मुद्रा रागीट असून तो शिवपार्वतीला तुडवत आहे असे दाखविले आहे. अशी मूर्ती महाराष्ट्रातील लेण्यात पाहावयास मिळाली नाही.
*हरिती :-* ही महायान पंथातील देवी असून जाम्बालाची सहचारिणी आहे. कदाचित नी सुपीकतेची देवी असावी.
*वसुंधरा :-* ही हरिती सारखीच महायान पंथातील देवी आहे. तिच्या डाव्या हातात कमळाचे फूल, धान्याची कणसे आणि एक पात्र दिसते. उजवा हात वरद मुद्रेत दाखविलेला असतो.
*मैत्रेय :-* मैत्रेय म्हणजे पुढे होणारा बुध्द. त्याची बोधिसत्त्व म्हणून पूजा होते. थेरवादी बौद्धसुद्धा मैत्रेयाला मान्यता देतात. मैत्रेयाच्या बरोबर नेहमीच दुसऱ्या बोधिसत्त्वाची मूर्ती असते. मैत्रेयाला ओळखण्याची खूण म्हणजे त्याच्या शिरस्त्राणातील चैत्य आणि कमरेला डाव्या बाजूस बांधलेला शेला. त्या शेल्याची टोके मैत्रेयाच्या पायापर्यंत खाली लोंबकळत असतात.
_वर वर्णन केलेल्या देवदेवतांशिवाय महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यात सामंतभद्र, रत्नपाणि, विश्वपाणि, ज्ञान केतु, भद्रपाल, क्षितिगर्भ, घंटापाणि, इत्यादी बोधिसत्त्व; आणि सरस्वती, अपराजिता, वज्रधात्री, लोचना, मामकी, पाण्डुरा, चुन्दा, इत्यादी देवदेवतांच्या मूर्ती दिसतात त्याचप्रमाणे इन्द्र यक्ष, किन्नर, गरुड, नाग इत्यादीच्याही मूर्त्या पाहावयास मिळतात._
*_कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याआधी या मुर्त्या लेण्यांत का दिसतात यासाठी महायान सोबत बौद्ध धम्मातील पंथाचा, त्यावेळच्या परिस्थितीचा, जनजीवनाचा खोल अभ्यास करायला हवा_*
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संदर्भ :- महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :- ३०/०६/२०२३_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2023/06/blog-post_92.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment