Tuesday, 18 May 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न ८१

 *_प्रश्न ८१ - यल्लमाच्या नावाने वाढवलेल्या जटा कापल्या तर कोप होतो, हे खरे आहे का?_* 


 *उत्तर*  👉  *हे खरे नाही. यल्लमाचा अर्थ आहे जगाची आई. ती मुलींना जट वाढवून विद्रूप करील काय?*

   

          *अस्वछ्ता व अज्ञान यामुळे केसाचा गुंता होतो. यल्लमाचे दलाल (म्हाताऱ्या देवदासी, पुजारी, देवर्षी इ.) सांगतात: गुंता (जट) यल्लमामुळे झाला. आई कोपली; आता जटेला कंगवा लावायचा नाही, त्यावर हळद-कुंकू वहायचे व वडाचा चीक लावायचा. मग गुंता अधिक घट्ट होतो. हीच जट होय.* 


            काही जटवाल्या बाईच्या गळ्यात यल्लमाचे दर्शन बांधले जाते. तिचे देवाशी लग्न लावले जाते. अशी देवदासी यल्लूआईची परडी घेवून जोगवा मागत गावोगाव हिंडते. ती गावाची भोगदासी होते. काही वेळा दलाल देवदासीला मुंबईकडे वेश्या व्यवसायाला पाठवतात.

   

            आपल्याच मुलीने वेश्या व्हावे असे यल्लमाला वाटेल काय? अघोरी अंधश्रद्धा, दारिद्र्य व अज्ञानामुळे होणारा स्त्रियांच्या योनीशोषणाचा हा अमानुष प्रकार आहे.

   

             *गारगोटी येथील डॉ.आनंद वास्कर यांनी जट सोडवण्याचे प्रभावी कार्य सुरु केले. त्यांनी ४०० च्यावर मुलामुलींच्या जटा सोडविल्या आहेत. जोगत्यांनी वास्करना दम दिला. हे काम बंद कर नाहीतर यल्लमाआई तुला वर्षाच्या आत लुगडे नेसवील.(लुगडे नेसविणे-नपुंसक करणे). डॉ.वास्करना अजून लुगडे नेसण्याची पाळी आलेली नाही.*

   

          *वास्करांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातारा परिसरात जट निर्मूलन मोहीम सुरु केली. गेल्या दोन वर्षात १२५ जटा सोडविल्या. या कार्यकर्त्यांवर यल्लमाचा कोप झालेला नाही. जटामुक्त स्त्रिया सुखी व आनंदी आहेत. त्यांच्यावरही यल्लमा कोपली नाही.*

   

           आतापर्यंत जटामुक्त स्त्रियांची व पुरुषांची संख्या १००० च्यावर पोहोचली असेल. हे सर्व स्त्री-पुरुष व जटानिर्मूलन मोहिमेतील कार्यकर्ते यांच्यावर कसलाही कोप झालेला नाही.


 *-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार* 


https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

घट सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_घट सुत्त_*  *_(संयुक्त निकाय)_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_47.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼...