*_प्रश्न ७९ - बैल भूतभविष्य ओळखतो, गर्दीतील माणसांच्या प्रश्नांची उत्तरे देतो, नाव ओळखतो हे कसे घडते?_*
*उत्तर* 👉 *_व्हर्जिनिया (अमेरिका) राज्यातील फोंडा नावाच्या बाईंनी लेडी वंडर नावाची घोडी पाळली होती. लेडी वंडर लोकांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देते, असा बोलबाला झाला. घोडीच्या अतींद्रिय शक्तीची ए.बी.ऱ्हाईन या मानसशास्त्रज्ञाने चाचणी घेवून खात्री केली. ऱ्हाईनच्या निवेदनानंतर लेडी वंडरकडे प्रश्न घेऊन येणाऱ्यांची रीघ लागली._*
प्रो.स्कार्न (न्यू जर्सी, अमेरिका) यांनी नंतर या घोडीची चिकित्सा केली असता फोंडा बाईंची बनवेगिरी त्यांच्या लक्षात आली.
घोडीच्या समोर अक्षरांचे ठोकळे मांडलेले होते. सौ.फोंडा मागे हातात चाबूक घेवून उभी राही. घोड्याचे डोळे बाजूला असतात त्यामुळे घोडीला बाजूचे दिसे(विशिष्ट कोनातील). फोंडाने चाबूक वाजविला की घोडी तोंड ठोकळ्यावरुन हालवायला लागे. प्रश्नाचे उत्तर YES असे द्यावयाचे असल्यास Y ह्या अक्षराजवळ तोंड आल्यावर पुन्हा चाबूक हालवी. त्या वेळी घोडी Y अक्षराला स्पर्श करी. या युक्तिने घोडी YES अगर NO अगर TODAY इत्यादी शब्दांद्वारे प्रश्नांची उत्तरे देई.
प्रा.स्कार्न यांनी प्रश्न घोडीला विचारला. तो फोंडानेही ऐकला. तिने चाबकाद्वारे घोडीला संदेश दिला. नंतर स्कार्ननी प्रश्न कागदावर लिहिला. कागद फोंडाला दिसू दिला नाही. घोडीला प्रश्न ओळखून उत्तर देता येणे शक्य झाले नाही कारण फोंडाच्या संकेताशिवाय घोडी अक्षरांचे ठोकळे निवडू शकत नव्हती. या बनवेगिरीला प्रसिद्धि देताच फोंडाचा अतींद्रिय शक्तिचा धंदा बंद पडला.
*प्रश्नकर्त्याने बैलाचा मालक व बैल यांच्याकडे प्रयोगाचे वेळी प्रा.स्कार्नप्रमाणे चिकित्सक वृत्तीने पाहिले असते तर बैल प्रश्नांची उत्तरे कशी देतो हे त्यांच्या लक्षात आले असते. बैलाचा मालक प्रशिक्षित करून संकेत वापरून प्रश्नांची उत्तरे देत असणार हे उघड आहे.*
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment