*_प्रश्न६० - डॉ. पुरंदरे हे जागतिक कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ. त्यांनी गर्भवती स्त्रीच्या उदरात मुलगा की मुलगी हे समजण्यासाठी अतिशय सोपी पद्धती रुद्राक्षाच्या आधारे शोधून काढली आहे, हे शास्त्रीय नव्हे काय? त्यांचे असेही मत आहे की हातावरून रुद्राक्ष धरून संबंधित व्यक्ती धनभारित (पॉझिटिव्हली चार्जड) ऋणभारित (नेगेटिव्हली चार्जड) वा तटस्थ आहे का, ते समजू शकते. धनभारित व्यक्तीकडे भविष्य अचूक वर्तविण्याची क्षमता असते, हे खरे आहे काय?_*
*उत्तर* 👉 एखाद्याने – मग तो कोणीही असो – नवीन काही शोधून काढणे ही बाब स्वागतार्ह आहे. यातूनच विज्ञान पुढे जात असते. एखाद्या विज्ञान शाखेतील तज्ज्ञांचा दावा असेल तर स्वाभाविकच अपेक्षा अधिक, कारण एखादी गोष्ट शास्त्रीय आहे की नाही हे कसे तपासावे हे त्यांना अधिक चांगले समजत असते. या पार्श्वभूमिवर रुद्राक्षाच्या डॉ. पुरंदरेंच्या दाव्याबाबत प्रत्यक्ष काय आढळून येते? *रुद्राक्षाच्या या विशिष्ट गुणधर्माच्याबाबत कोणत्याही स्वरुपात शास्त्रीय तपासाची सांख्यिकी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान दिले होते व ते आजही कायम आहे.* प्रसूत होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व ज्यांची गर्भलिंग निश्चितीची पूर्व तपासणी झालेली नाही, अशा शंभर गरोदर स्त्रियांच्या पोटावर ठेवून त्याची चाचणी घेणे सहज शक्य आहे. यामुळे त्या स्त्रिया पुढील दोन-चार दिवसात प्रसूत होताच हा दावा खरा की खोटा हे समजून येईल.
*व्यक्ती धनभारित वा ऋणभारित वा तटस्थ असतात, हे रुद्राक्षाच्या सहाय्याने ओळखणे ही एक अशीच भूलथाप आहे. याबद्दल कसलाही वैज्ञानिक व संख्याशास्त्रीय पुरावा नाही.* पुरंदरेंनी ज्यांना ज्यांना धनभारीत व्यक्ती म्हणून सांगितले त्यांनी रुद्राक्ष स्वतः डॉ. पुरंदरेंच्या हातावर धरल्यावरही (डॉ. पुरंदरेही त्यांच्या मते धनभारित आहेत) तो अजिबात न फिरल्याचा पुरावा आहे. मग त्या तथाकथित धनभारित्वामुळे अचूक भविष्य सांगण्याची क्षमता येणे दूरच राहिले.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment