*_प्रश्न ३७- अंगात आलेल्या छोट्या मुलींनी संस्कृत गीता
घडाघडा म्हणून दाखविली, अशा प्रकारची
उदाहरणे आम्ही वृत्तपत्रात वाचली आहेत. त्यात कितपत तथ्य आहे?_*
*उत्तर* इंडोनेशियात्तील
जाकार्ता शहरात राहणाऱ्या एका मुस्लिम स्त्रीचा गर्भ कुराणातील वचने म्हणून दाखवतो, अशी बातमी तेथील वृत्तपत्रांतून झलकली. ह्याची
शहानिशा इंडोनेशियातील काही डॉक्टरांनी केली; त्यांना
ते खरे असल्याचे दिसून आले. इंडोनेशियातील एका वैज्ञानिकाने या चमत्काराची
पुनर्तपासणी केल्यावर त्याच्या लक्षात आले की, बाईने
पोटावर उशीखाली छोटा टेपरेकॉर्डर लपविला होता व उशी लांब झगा घातल्याने दिसत
नव्हती. संस्कृत गीता घडाघडा म्हणून दाखविण्याच्या चमत्कारामागे अशाच प्रकारची
बनवेगिरी असू शकते. शहानिशा करणारे पत्रकार अगर इतर मंडळी शरीराची संपूर्ण तपासणी
घेत नाहीत. अशा तऱ्हेची तपासणी घेतली तर बनवाबनवीचा मामला उघड होतो. ज्या वेळी
फसवणुकीचा प्रकार नसेल, त्या वेळी ही
गोष्ट कशी घडत असेल? आपण वाचलेली वा
एखादी गोष्ट आपण पूर्णत: विसरलेलो असतो. परंतु
एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने
अवचितपणे त्या बाबीचे पूर्णत: वा अंशत: स्मरण होते. ती बाब आपल्या स्मृतीत केव्हा
नोंदविली गेली, याची आठवण असतेच असे
नाही.विस्मृतीमध्ये असलेल्या अशाच काही संस्कृत ओळी व्यक्तीला आठवणे सहज शक्य आहे.
या ओळी अर्थाशिवाय स्मृतीत नोंदविल्या गेल्या असतील, तर
व्यक्तीला त्या आठवतीलच, त्या वेळीही ते
नुसते स्मरण असेल, त्याचा अर्थ
व्यक्तीला येणार नाही.परंतु संबंधित व्यक्तीने या संस्कृत ओळी ऐकल्या आहेत याची
माहिती नसल्यामुळे व व्यक्तीला संस्कृत येत नसल्यामुळे हे आठवणे लोकांना दैवी
चमत्कार वाटतो. वस्तुत: ही स्मृती विस्मृतीची साधी घटना आहे.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment