Monday, 22 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न २७

 

*_प्रश्न २७- आमच्या गावाच्या स्मशानाजवळ,अधूनमघून विशेषत: अमावस्येला जाळ फिरताना दिसतो.भुतांचे पलिते भुते नाचवतात अशी ग्रामस्थाची समजूत आहे. काय घडत असावे?_*

 

 *उत्तर*    भुते नसतात. त्यामुळे भुते पलिते नाचवीत नाहीत. हा ऐकीव माहितीवर आधारित पूर्वग्रह (Delusional belief) आहे. मग हे पलिते किंवा जाळ कसा दिसतो?

हे पलिते माणसाने घेतलेले असतात. या बाबतीत कोवूरांचा एक मजेशीर अनुभव आहे. एका श्रीमंत माणसाच्या घरी काम करणाऱ्या नोकराने पलिता नाचवून जमीनदाराच्या घराजवळ वेताळ उठल्याची अफवा पसरविली. कोवूरांनी याचा धीटपणे तपास करून ह्या नोकराला पकडताच त्याने आपणच पलिता नाचवीत असल्याचे कबूल केले व त्यामागचे कारणही सांगितले.

स्मशानात प्रेते जळत असतात. हा जाळ म्हणजे वेताळाचा पलिता असा दृष्टिभ्रम होणे शक्य आहे. जंगलात काही ठिकाणी बुरशीची वाढ ज्यांच्यावर झाली आहे अशी झाडे असतात. या झाडांच्या बुरशीतून प्रकाश बाहेर पडतो. अशी झाडे काळोख्या रात्री पेटल्यासारखी भासतात. दृष्टिभ्रमामुळे आग्या वेताळ आहे, असा भ्रम होतो. पाणथळ जागी वनस्पतीच्या कुजण्याने मेथेनसारखे ज्वग्लाग्राही वायू तयार होतात. असे वायूचे बुडबुडे पेट घेतात. अशा ठिकाणी आग नाचल्याचा दृष्टिभ्रम होतो. फॉफरस ज्वालाग्राही आहे. काही कारणांनी एखाद्या ठिकाणी फॉस्फरस असेल, तर तो पेटून चकाकतो. अंधारात आग नाचविणारे भूत त्या ठिकाणी असल्याचा दृष्टिभ्रम होतो. नॉक्टीलुका नावाचे सूक्ष्म जंतू उष्ण कटिबंधातील समुद्राच्या पाण्यामध्ये असतात. असे पाणी लाटांमुळे अगर अन्य कारणांनी हालू लागले, तर नॉक्टीलुका पसरलेल्या भागात पाणी पेटल्यासारखे दिसते. हा पाण्यातील भुताने नाचविलेला पलिता असे समुद्र प्रवासी मानत होते.ज्याचे स्पष्टीकरण देता येत नाही अशा घटनेला दैवी अगर पिशाचपीडित समजणे, हा मानवाच्या मनाचा कमकुवतपणा आहे. अशा प्रकारच्या पूर्वग्रहांतून अतिरंजित गोष्टी तिखट-मीठ लावून रंगविल्या जातात

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...