Wednesday, 24 March 2021

अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - प्रश्न २८

 

*_प्रश्न २८- भुताने झपाटलेले लोक डॉक्टरकडे जाऊनही बरे होत नाहीत. पण मांत्रिक त्यांना बरे करतो असा आमचा अनुभव आहे. हे कसे घडू शकते?_*

 

 *उत्तर*    कोणत्या डॉक्टरकडे जाऊन भुताने झपाटलेले लोक बरे झाल्याचा अनुभव प्रश्नकर्त्याला आला. याचा उल्लेख प्रश्नात नाही. भुताने झपाटणे हा मनाचा आजार आहे. मनाच्या आजारात निदान करणे व त्यावर उपचार करणे हे मनोविकार तज्ञ डॉक्टर करू शकतात, ग्रामीण भागातील बहुसंख्य डॉक्टरांना मनोविकाराचे निदान करणे, त्यावर उपचार करणे याचे ज्ञान नसते. भूत असते व ते झपाटते यावर त्यांची श्रद्धा असते. ते रोग्याच्या नातेवाइकांना, 'हे बाहेरचे आहे. दवाखान्यात बरे होणारे नाही’ असा सल्ला देतात. अशा वेळी रोग्याला मांत्रिकाकडे नेण्याशिवाय अन्य उपाय नसतो. काही बाबतींत तथाकथित भुताने झपाटलेली व्यक्ती मांत्रिकाकडून बरीही होते. हे कसे घडते?

मानसिक संतुलन ढळलेल्या मनोरुग्णाचा भूत असते व ते झपाटते असा ठाम विश्वास (Delusion) असतो. मांत्रिक अशा व्यक्तीच्या अंगावरून कोंबडे उतरवून अगर अन्य प्रकारे हे भूत उतरविल्याचा अभिनय करतो. आपल्याला लागलेले भूत मांत्रिकाने उतरविले अशी सूचना मिळाल्याने मनोरुग्ण व्यक्तीचा मानसिक आधार वाढतो. भूत निघाले म्हणजे रोग्याच्या मनातील भूत निघालेले असते. रोगी बरा होतो पण... मांत्रिकाकडून भूत उतरविणे ही प्रक्रिया धोकादायक असते. रोग्याच्या मानसिक आजाराने मूळ कारण रोग्याला समजत नाही, त्यामुळे आजार पुन्हा उपटू शकतो. गंभीर मानसिक आजार मंत्रिकाकरवी बरे होत नाहीत. आजारी व्यक्ती तरुण स्त्री असेल तर तिचा उपभोग घेणारे मांत्रिक असतात.

म्हणून रोगाचे निदान करून खात्रीचा उपचार करणाऱ्या मनोविकार तज्ज्ञाकडे जाणे हे केव्हाही अधिक फलदायी असते. याबाबत हा आक्षेप येऊ शकेल की मानसोपचारतज्ज्ञ फारच कमी असतात व त्यांच्या उपचाराचा खर्चही सामान्य माणसाच्या आवाक्यापलीकडचा असतो. परंतु ही अडचण असली, तरी मांत्रिक वा देवर्षीकडे जागे हा पर्याय याला असू शकत नाही.

याबाबतची उपाययोजना म्हणून समुदायात मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण करणे व जोपासणे आवश्यक आहे. असे झाले, तर अनेक मनोविकारांवर उपाय होऊ शकतो. या स्वरूपाची काहीशी कार्यवाही कर्नाटकात डॉ. श्रीवत्समूर्ती यांच्या नेतृत्वाखाली सुरूही झाली आहे. या उपक्रमांना व्यापक पातळीबर चळवळीचे रूप आल्यास त्यातून बरीच फलनिष्पत्ती होऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासाठी प्रयत्नशील आहे.

 

*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*

*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*

https://mikamblemahesh.blogspot.com/

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...