*प्रश्न ७- अनेक बुवा, बाबा समाजोपयोगी कामे करतात. त्यांना विरोध कशासाठी?*
*उत्तर 👉* मी चोरी करून पैसे मिळवले व त्या पैशाचा काही हिस्सा शाळेतील मुलांना गणवेश फुकट पुरवण्यासाठी केला, तर हे कृत्य नैतिक ठरेल काय? लोकांच्या खिशातील पैसा लुटून त्यातून मन्दिर उभारणी करणारे बुवा, नैतिक ठरतील काय? पैसा आणि स्त्रिया यासाठीच बुवाबाजी चालते. बुवा पैसे घेत नाहीत हा बुवाच्या भक्तांनी केलेला फसवा प्रचार असतो. पैसे घेण्याची बुवांची खास यंत्रणा विश्वासू भक्तांमार्फत काम करते. बुवाचा जम बसला की पैसा मिळत जातो. मग आश्रम बांधणे, झाडे लावणे इत्यादी कामे सुरु केली जातात. या कामासाठी खर्च केलेला पैसा लोकांच्या खिशातूनच आलेला असतो.
बुवाकडे लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतात. कोणाला मुलगा हवा असतो. कोणाला असाध्य आजार असतो. कोणाला कोड असते. मुलगा होणे वैद्यकीयदृष्ट्या शक्य नसले, कॅन्सर बरा होणारा नसला, कोड नाहीसे होणारे नसते, तरी बुवा या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचे भक्तांना आश्वासन देतो. प्रश्न सुटणारे नसताना प्रश्न सोडवीण असा दावा करणे हे अनैतिक आहे. *यामुळे लोकांचा दैववादीपणा वाढतो व प्रश्न सोडवण्याचा बौद्धिक शहाणपणा गहाण पडतो.*
वरील विवेचनावरून असे लक्षात येईल की बुवा दोन दृष्टींनी अनैतिक काम करीत असतात. *पैसा व स्त्रिया यांचे शोषण व दैववादाचा प्रचार* .
हे न करणारा बुवा असेलच तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र अनैतिक मार्गाने नैतिक समाज-जीवनाची बांधणी करणे हे इष्ट नाही व शक्यही नाही.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment