➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*६६
अम्बपाली*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वैशालीमधील
राज उद्यानात आम्रवूक्षाखाली आम्रपालीचा जन्म झाला होता. उद्यान रक्षकाने तिला
नगरात नेले, आम्रवूक्षाखाली तिचा जन्म झाल्यामुळे तिचे नाव *”आम्रपाली”* असे नाव
पडले. ती अतिशय सुंदर दिसत होती. वैशालीतील राजकुमारांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी
एकमेकांशी स्पर्धा करण्यास सुरुवात केली. आपसातील अशी स्पर्धा पाहून असा निर्णय
घेण्यात आला कि, *हि कोणा एकाची पत्नी न बनता ती सर्वांचीच पत्नी म्हणून राहील. या
निर्णयानुसार तिला गणिका करण्यात आले.*_
_भगवान
बुद्ध जेव्हा वैशालीला आपल्या भिक्खू संघासह आले तेव्हा ते आम्रवनातच राहिले होते.
आम्रपालीने तेथे जाऊन भगवान बुद्धांचा चरणांना वंदन करून त्यांना भोजनासाठी
आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी भगवंत तिच्याकडे भोजनासाठी गेले. भोजन संपल्यानंतर
भगवंतांनी तिला धम्मोपदेश दिला. त्यानंतर आम्रपालीने आम्रवन भिक्खू संघास दान
दिले. अशाप्रकारे ती बुद्धांची उपासिका बनली. आपला *प्रव्रजित झालेला पुत्र
विमलकौन्डीन्य* याच्याजवळ धम्म ऐकून तिने भिक्खुणी संघात प्रवेश केला.
वृद्धावस्थेत झालेले आपल्या शरीरातील परिवर्तन पाहून तिला बुद्धवचनाची सत्यता
पटली. सर्व सांसारिक वस्तूंच्या अनित्यतेचे ज्ञान झाले. आपल्या जर्जर शरीराचे
वर्णन करताना ती म्हणते :-_
*_भुंग्याच्या
रंगासारखे, काळे व कुरळे असे माझे केस होते, ते आज म्हातारपणामुळे अंबाडीच्या
तागाप्रमाणे झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५२||_*
*_सुगंधी
फुलाने भरलेल्या सुवासिक फुलांच्या करंड्याप्रमाणे माझा केशसंभार होता. आज
म्हातारपणामुळे माझ्या मूळ केसांचा वासच राहिला आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन
मिथ्या होत नाही. ||२५३||_*
*_कंगवा
आणि काट्यांनी चांगल्या प्रकारे बसविलेला माझा केशसंभार चांगल्या प्रकारे
लावलेल्या व घनदाट अरण्याप्रमाणे सुशोभित होता. तो आज म्हातारपणामुळे ठिकठीकाणी
केस गळाल्यामुळे विरळ झालेला आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही.
||२५४||_*
*_काळ्या
पुंजक्याची, सोन्याने सजविलेली माझी अलंकृत वेणी शोभून दिसत आहे. आज
म्हातारपणामुळे माझ्या डोक्याला टक्कल पडत चाललेले आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन
मिथ्या होत नाही. ||२५५|_*
*_चित्रकाराने
कुशलतेने अंकित केलेल्या रेखांप्रमाणे माझ्या दोन भुवया होत्या. ते आज
म्हातारपणामुळे सुरकुत्या पडून खाली लोंबत आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या
होत नाही. ||२५६||_*
*_गडद
निळ्या रंगाचे, सुंदर मण्याप्रमाणे, तेजस्वी व विशाल असे माझे डोळे होते. ते आज
म्हातारपणामुळे अभिहत झाल्याने सुंदर दिसत नाहीत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या
होत नाही. ||२५७||_*
*_तारुण्यात
आल्यावर सुंदर व टोकदार असे माझे नाक शोभून दिसत असे. ते आज म्हातारपणामुळे
विशोभित होऊन चपटे झाले आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५८||_*
*_चांगल्या
प्रकारे तयार केलेल्या, सुघटीत कंकणाप्रमाणे माझ्या कानाच्या पाळी पुर्वी शोभून
दिसत होते. ते आज म्हातारपणामुळे सुरकुत्या पडून खाली लोंबत आहेत. सत्यवादी
बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२५९||_*
*_कर्दळीच्या
कळीप्रमाणे रंग असलेले माझे दात पुर्वी शोभून दिसत होते. ते आज म्हातारपणामुळे
पडून जवाप्रमाणे पिवळे झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही.
||२६०||_*
*_वनामध्ये
विचरण करणाऱ्या कोकिळेच्या मधुर कुजनाप्रमाणे माझी वाणी मधुर होती. ती आज
म्हातारपणामुळे अडखळणारी झाली आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही.
||२६१||_*
*_चांगल्याप्रकारे
घासून गुळगुळीत केलेल्या शंखाप्रमाणे माझी मान पुर्वी शोभून दिसत होती. परंतु आज
म्हातारपणामुळे भग्न झाली व वाकली आहे. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही.
||२६२||_*
*_सुंदर
गोल अडसराप्रमाणे माझे दोन्ही बाहू शोभून दिसत असत. परंतु आज म्हातारपणामुळे ते
पांढऱ्या फटफटीत पाटलीवृक्षाच्या फांदीप्रमाणे झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन
मिथ्या होत नाही. ||२६३||_*
*_सुंदर
अंगठी आणि सुवर्णालंकारांनी सजविलेले माझे हात पुर्वी शोभून दिसत असत. ते आज
म्हातारपणामुळे मुळ्याप्रमाने पांढरे फटफटीत झाले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन
मिथ्या होत नाही. ||२६४||_*
*_घट्ट,
गोल, एकमेकाला जुळू पाहणारे आणि उन्नत असे माझे दोन्ही स्तन पुर्वी शोभून दिसत
होते. ते आज म्हातारपणामुळे पाणी नसलेल्या चामड्याच्या रिकाम्या पखालीप्रमाणे खाली
लोंबत आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२६६||_*
*_चांगल्याप्रकारे
चकाकणार्या सोन्याच्या फलकाप्रमाणे माझे शरीर पुर्वी शोभून दिसत असे. ते आज
म्हातारपणामुळे सूक्ष्म सुरकुत्यांनी व्यापले आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या
होत नाही. ||२६७||_*
*_हत्तीच्या
अन्न सेवन करणाऱ्या सोंडेप्रमाणे माझ्या दोन्ही मांड्या शोभून दिसत होत्या. त्या
आज म्हातारपणामुळे पोकळ बांबूच्या नळ्याप्रमाणे झाल्या आहेत. सत्यवादी बुद्धांचे
वचन मिथ्या होत नाही. ||२६८||_*
*_कापसाप्रमाणे
मऊ अशी माझी दोन्ही पावले पुर्वी शोभून दिसत होती. ती आज म्हातारपणामुळे फटा
पडलेली व सुरकुत्या पडलेली आहेत. सत्यवादी बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही.
||२६९||_*
*_एके
वेळी हे संपूर्ण शरीर अशा प्रकारचे होते. परंतु ते आज म्हातारपणामुळे जर्जर, अनेक
दुःखाचे घर झाले आहे. ते पोपडे पडलेल्या घराप्रमाणे जीर्ण झाले आहे. सत्यवादी
बुद्धांचे वचन मिथ्या होत नाही. ||२७०||_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ: - थेरिगाथा*
*संकलन :- महेश कांबळे*
*०१/०२/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment