Friday, 18 December 2020

नीचाशीं लढण्यापेक्षां पराजय बरा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *_नीचाशीं लढण्यापेक्षां पराजय बरा_* 
 *_(सूकर जातककथा)_* 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

                 _एकदा बोधिसत्त्व सिंह होऊन अरण्यांत रहात असे. त्या अरण्यांत एका सरोवराच्या कांठीं आपल्या पर्णकुटिका बांधून पुष्कळ तपस्वी रहात असत. आणि कांहीं ग्रामसूकरहि तेथें रहात असत. एके दिवशीं बोधिसत्त्व हत्तीचें मांस यथेच्छ खाऊन त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठीं आला. जवळच एक लठ्ठ डुकर चरत होता. त्या लठ्ठ डुकरावर सिंहाची दृष्टी गेली. व तो मनांत म्हणाला, ''दुसरी कांहीं शिकार सांपडली नाहीं तर या डुकरावर आपला निर्वाह करतां येईल, तेव्हां याला आपली चाहूल न दाखवितां येथून निघून जावें हें बरें.''_ 

                       _असा विचार करून सिंह पाणी पिऊन आड वाटेनें हळूहळू दडत जाऊं लागला. पण त्याला डुकरानें ओळखलें, आणि मोठ्यानें ओरडून तो डुकर म्हणाला, ''कायरे सिंहा, असा भिऊन पळतोस कशाला ? तूं जसा चतुष्पाद आहेस, तसा मीहि चतुष्पाद आहे. तेव्हां घाबरून पळून न जातां माझ्याशीं चार हात कर, व आपला पराक्रम दाखव.''_ 

                       _सिंह म्हणाला, ''अरे डुकरा, आज मी तुझ्याशीं युद्ध करूं इच्छित नाहीं. आणखी एका आठवड्यानें आम्हीं येथों भेटूं, व त्या वेळीं द्वंद्वयुद्ध करूं.''_ 

             _डुकराला ही गोष्ट पसंत पडली. तो घरीं जाऊन आपल्या जातभाईंना म्हणाला, ''आज मी मोठा पराक्रम केला आहे ! मला पाहून एक सिंह हळूच दडत पळून जात होता. त्याला मी आव्हान केलें ! परंतु त्याची तयारी नसल्यामुळें त्यानें एक आठवडा मागून घेतला आहे. आणखी एका आठवड्यानें तो माझ्याबरोबर लढाई करण्यास येणार आहे. सिंहाविषयीं आपल्या जातीला उगाच बाऊ वाटत असतो. इतका जर सिंह बळकट असता, तर युद्धाची तयारी करण्यास त्याला एक आठवडा कां लागला असता ? एवढी तयारी करून आला तरी मीं त्याची अशी खोड जिरवतों कीं, त्यानें या अरण्यांत पुनः पाऊल देखील टाकुं नये.''_ 

             _हें त्या बालिश डुकराचें भाषण ऐकून वृद्ध डुकर म्हणाले, ''बाबारे तुझी बडबड आतां पुरे कर. सिंहानें तुला आठवड्याची मुदत दिली हें तुझें भाग्य समज. हत्तीचें मांस खाऊन सिंह तृप्‍त झाला असेल, आणि आठवडाभर पुरण्यासारखे मांस शिल्लक असेल म्हणून तुला त्यानें एक आठवड्याची मुदत दिली आहे. हत्तीचें गंडस्थळ फोडणार्‍या सिंहापुढें तुझ्यासारख्या यःकश्चित प्राण्याचें काय चालणार आहे ? पण तुझा हा मूर्खपणा तुलाच भोंवणार आहे, असें नाहीं. त्याचा परिणाम आम्हा सर्वांना भोगावा लागेल. सिंह तुला मारीलच. पण तेवढ्यानें त्याची तृप्ति न होतां तो आमचा सर्वांचा नाश करील._

             _हा हितोपदेश ऐकून तो लठ्ठ डुकर घाबरून गेला. हत्ती त्याने पाहिला होता. पण हत्तीचें गंडस्थळ एवढासा सिंह फोडून टाकतो ही गोष्ट त्याला माहीत नव्हती. आतां वृद्ध डुकराच्या उपदेशानें त्याचे डोळे उघडले आणि त्याला शरण जाऊन तो म्हणाला, ''मीं हें धाडसाचें कृत्य केलें खरें, परंतु यांतून पार पडण्याचा उपाय कोणता ? मी आजच येथून पळून जाऊं कीं काय ?''_ 

             _ते वृद्ध डुकर म्हणाले, ''पळून जाण्यानें या प्रश्नाचा निकाल लागणार नाहीं. सर्व डुकर या आठवड्यांत पोराबाळांना घेऊन दुसरीकडे जाऊं शकणार नाहींत आणि जरी गेले तरी त्यांना गाठून सिंह सर्वांचा फज्जा उडवून देईल. तेव्हां आतां तूं असें कर कीं, या ॠषींच्या शौचकूपांत जाऊन लोळ आणि पुनः सर्व दिवस अंग वाळल्यावर दुसर्‍या दिवशीं तसाच लोळून अंगाला विष्टेचीं चांगलीं पुटें दे व ठरलेल्या दिवशी तळ्याच्या कांठीं जाऊन वार्‍याच्या उलट्या दिशेला रहा. परंतु तेथें जाण्यापूर्वी दंवानें आपलें अंग ओलें करण्यास विसरूं नकोस.''_ 

                     _त्या तरुण डुकरानें वृद्ध डुकराचा उपदेश सव्याज पाळला. दुसरा धंदा न करतां सात दिवसपर्यंत शौचकुपांत लोळून आठव्या दिवशीं पहांटेस दंवाने आपलें अंग भिजवून ठरलेल्या ठिकाणीं आपल्या अंगाचा वारा सिंहावर जाईल अशा बेतानें तो उभा राहिला. सिंह डुकराचें मांस कसें असतें याची रुची घेण्याची आज संधी मिळेल असा विचार करीत त्या स्थळीं आला. पण डुकराच्या अंगाची अशी घाण सुटली होती कीं, त्याच्या आसपास जाणें मुळींच शक्य नव्हतें. तो दूर अंतरावर उभा राहिला. त्याला पाहून मोठ्या शौर्याचा आव आणून डुकर म्हणाला, ''कायरे इतका दूर कां उभा राहतोस. असा जवळ ये म्हणजे एकदम युद्धाला सुरुवात करूं.''_ 

                 _सिंह म्हणाला, ''बाबारे, तूं ही उत्तम युक्ती शोधून काढली आहेस, तुझ्या अंगाचा एवढा दुर्गंध सुटला आहे कीं, तुला पायानें देखील शिवण्यास मी धजणार नाहीं मग तुझ्या अंगाचा चावा घेण्याची गोष्ट बाजूसच राहिली! आतां मी पराजित झालों असें तूं खुशाल म्हण मी आपखुषीनेंच तुला जय देतों. *नीचाशीं लढण्यापेक्षां पराजय पतकरलेला बरा !'*'

             _असें म्हणून सिंह तेथून निघून गेला आणि हा डुकर बचावल्याबद्दल सर्व डुकरांना आनंद झाला. इतकेच नव्हे, सिंहाचा पराजय करण्याचें नवीन साधन त्यांच्या हातीं आल्यामुळें त्यांना सिंहाचें भय वाटेनासें झालें._ 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 
 *संदर्भ : - जातक कथा संग्रह* 
 *संकलन :- महेश कांबळे* 
 *१५/१२/२०२०* 
 https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1 
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

कोलित सुत्त

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_कोलित सुत्त_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_41.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  _'कोलित सुत...