🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_एकीचे व बेकीचे फळ_*
*_(सम्मोदमान जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्त्व लावा पक्षाच्या कुळात जन्मून हजारो लाव्यांचा पुढारी होऊन अरण्यात राहात असे. त्यावेळी एक पारधी त्या अरण्यात येऊन चरणार्या लाव्यांना जाळ्यात पकडून त्यांना बाजारात विकून आपला निर्वाह करीत असे. एके दिवशी बोधिसत्त्व आपल्या समूहातील लाव्यांना म्हणाला, "हा पारधी आपल्या ज्ञातीवर्गाचा नाश करीत आहे, ह्याला एकच उपाय आहे, जर तुम्हांपैकी कोणी त्याच्या जाळ्यात सापडला तर एकमताने ते जाळे घेऊन तुम्ही उडावे, व एखाद्या काटेरी झुडुपावर टाकून त्याच्या खालून निघून जावे."_
_दुसऱ्या दिवशी काही लाव्यांवर पारध्याने जाळे टाकल्याबरोबर, बोधिसत्त्वाच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी ते उडवून नेले, व एका काटेरी झुडुपावर टाकून त्याच्या खालून पळ काढिला. काट्यातून जाळे मोकळे करता करता पारध्याला संध्याकाळ झाली व रिकाम्या हातानेच तो घरी गेला. हे असे बरेच दिवस चालले, तेव्हा त्याची बायको रागावून त्याला म्हणाली, "रोज रोज एक कवडीही न आणता घरी येता; ह्याच्यावरून असे दिसते की कोणीतरी बाई तुम्ही सांभाळली असली पाहिजे व तिच्यासाठी सर्व पैसा खर्चण्यात येत असला पाहिजे."_
_पारधी म्हणाला,"तुझी चुकीची समजूत झाली आहे, पण मी काय करू? लावावे एकजुटीने जाळे घेऊन जातात आणी काटेरी झुडुपावर टाकतात; त्यामुळे माझा संपूर्ण दिवस ते जाळे सोडवण्यात जातो. आणि शेवटी हाती काही लागत नाही. तथापि मी निराश झालो नाही, *जोपर्यंत त्यांच्यात एकी आहे तोपर्यंत जाळे घेऊन उडून जातील, पण जेव्हा आपसांत भांडू लागतील तेव्हा खात्रीने माझ्या हाती येतील.*"_
_काही दिवसांनी खाण्यासाठी जात असताना एक लावा दुसऱ्याच्या डोक्यावरून गेला. त्यामुळे दुसऱ्याला त्याचा राग आला. *पहिल्या लाव्याने क्षमा मागितली तथापि दुसऱ्याने ते न ऐकता भांडण्यास सुरुवात केली, होता होता सर्व समुदायात फूट पडली.*_
_*बोधिसत्त्वाने विचार केला की जेथे एकी नाही, तेथे सुरक्षितपणा नाही* आपण येथून दूर गेलेले चांगले. त्या प्रमाणे बोधिसत्त्व आपल्या वचनात राहणाऱ्या समुदायाला घेऊन दुसरीकडे निघुन गेला. *इकडे लाव्यापैकी काही जण जेव्हा जाळ्यात सापडत तेव्हा तिथेही भांडणे करीत,* पक्षप्रतिपक्ष करीत व जाळे उडवून नेण्याचे सामर्थ्य न राहिल्यामुळे पारध्याच्या हाती जात. अशा रीतीने पारध्याची चांगली चैन चालली व बायकोची त्याच्यावर फार मर्जी बसली._
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*०७/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment