✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_फलज्योतिषाचं थोतांड_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_22.html
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_भाग ४_*
*_नियतिवादाला विरोध_*
_याचं कारण असं की, *माणसाचं भविष्य हे समाजाची स्थिती ठरवत असते. माणसाचं भविष्य हे ग्रहगोलांची गती ठरवत नाही.* या ठिकाणी आपण गृहीतकाच्या तिसऱ्या भागाकडे जातो. जे लोक फलज्योतिषाला शास्त्र मानतात, त्यांचं म्हणणं काय असतं? ते असं सांगत असतात की, 'आम्ही तुम्हांला भविष्य सांगतो, म्हणजे काय करतो? आम्ही तुम्हांला ग्रहगोलांच्या द्वारे दिसणारे तुमचे नियतीचे संकेत सांगतो. जसं रेल्वे चाललेली असते. रूळ टाकलेले असतात. रेल्वे रूळावरूनच धावत असते. पण तरी ठिकठिकाणी बोर्ड असतात. पुढे स्टेशन आहे. पुढे वळण आहे, पुढे बोगदा आहे. पुढे अपघातप्रवण क्षेत्र आहे. म्हणजे तुम्हाला इशारा मिळतो. याच पद्धतीनं माणसाचं जीवन हे नियतीच्या रूळावरून चाललेलं असतं. ते त्याला बदलता येत नाही. परंतु कुंडलीच्या द्वारे या नियतीच्या रूळावरून जाताना पुढे त्याला जे काही सोसावं लागणार आहे, त्याचे संकेत आम्ही त्याच्यापर्यंत पोचवतो आणि पुढे जीवनात त्याचा फायदा होतो.' ही गोष्ट कृपया लक्षात ठेवायची की, ही साफ खोटी आहे. *एकतर अशा स्वरूपाचे पोचवलेले संकेत हे निश्तिपणे तसेच होतात, याचा कसलाही पुरावा आतापर्यंत या ज्योतिषांनी दिलेला नाही. हे जर ते देण्यास तयार असतील, तर त्यासाठी अंधश्रद्धानिर्मूलन समिती सदैव आव्हानाच्या पवित्र्यामध्ये उभी आहे.* आणि दुसरा भाग म्हणजे माणसाचं जीवन हे कसं ठरतं? *सावित्रीबाई फुले जन्माला येईपर्यंत या देशामधल्या स्त्रियांच्या कुंडलीमध्ये दोन हजार वर्ष शिक्षणाचे योग जवळपास नव्हतेच. आणि गेल्या १०० वर्षांमध्ये भराभराभरा हे शिक्षणाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये उमटले, असं झालं काय ?* देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी या देशातील आयुर्मान सरासरी ३० वर्षे होतं. अनेक मानवी प्रयत्नांनी आता हे वय ५७ झालं. याचा अर्थ गेल्या ५० वर्षांमध्ये कुंडलीमधील मृत्यू योग पुढं सरकले, असा अर्थ आहे का? त्याच्यामुळे *ग्रहच माणसाचं जीवन नियंत्रित करतात किंवा ग्रहच माणसाच्या जीवनाचे संकेत देतात, ही गोष्ट खरी नव्हे. माणसाच्या जीवनाची जी वैशिष्ट्ये असतात, ती एकतर त्याला जी आईवडिलांच्याकडून रंगसूत्रं आणि गुणसूत्रं मिळतात आणि ज्या सामाजिक, कौटुंबिक वातावरणात तो वाढतो त्याच्यावर अवलंबून असतात.*_
*_क्रमशः_*
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*
*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*
*_संकलन :- महेश कांबळे_*
*_दिनांक :-_* २२/१२/२०२४
✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹
No comments:
Post a Comment