Saturday, 21 December 2024

फलज्योतिषाचं थोतांड - भाग ३

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_फलज्योतिषाचं थोतांड_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2024/12/blog-post_21.html

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_भाग ३_*

*_जन्माची वेळ कोणती?_*

_दुसरा मुद्दा म्हणजे किंवा दुसरं गृहीत म्हणजे मानवी जीवनावर होणारा परिणाम. व्यक्तीच्या जन्मवेळेवर अवलंबून असतो. *ज्यांची प्रसूतिगृहं असतात ते तुम्हाला सांगतील की आतमधून टॅं... करून रडण्याचा आवाज आला की बाहेर आलेल्या डॉक्टरला दोन प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न, 'डॉक्टर, मुलगा का मुलगी?' आणि दुसरा प्रश्न डॉक्टर- 'किती वाजले?'*_

_आता तुम्ही कधी जन्मता? तुम्ही कधी जन्मता याच्या मी तुम्हांला सात वेळा सांगतो. यापैकी कुठल्यावेळी मूल जन्मतं हे तुम्ही मला सांगा._ 

१. _खरं तर ज्यावेळेला स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचं मीलन स्त्रीच्या नलिकेच्यामध्ये होतं आणि जीवाची पहिली पेशी तयार होते. त्यावेळेला मूल जन्मतं का? तो जो गर्भ असतो तो वाढतो आणि सात महिन्यांचा होतो._ 

२. _सात महिन्यांचं मूल हे बाहेर आल्यानंतर जगण्याची शक्यता असते. त्याला Viable Child असं म्हणतात. त्यामुळं गर्भपात करायचा असेल तर तो कायदेशीरपणे ५ महिन्यापूर्वीच करावा लागतो. सात महिन्यांचं मूल ज्यावेळी होतं, त्यावेळी त्याची जन्माची वेळ झाली असं मानायचं?_ 

३. _तिसरी गोष्ट ज्यावेळेला मूल जन्माला येतं, त्यावेळेला पहिल्यांदा बाळाचं डोकं बाहेर येतं आणि मुलाचा जन्म म्हणजे काही रॉकेटचं उड्डाण नाही. मुलाचं डोकं बाहेर आल्यानंतर मुलाचे पाय बाहेर येण्यासाठी काही वेळ लागतो. काही वेळेला अर्धाअर्धा तास देखील लागतो. अशा वेळेला जन्माची वेळ कोणती समजायची?_

४. _डोकं बाहेर येतं ती की पाय बाहेर येतात ती? तेवढ्यात नक्षत्र बदलत असेल तर? काही वेळेला उलट होतं. मूल पायाळू असतं. पहिल्यांदा पाय बाहेर येतात, नंतर डोकं बाहेर येतं. अशा वेळेला मुलाची जन्मवेळ ही कोणती मानायची?_

५. _बरं मूल जन्माला आलं, तरी देखील ते मूल आईच्या अस्तित्वाचा भाग असतं. डॉक्टर नाळ कापून आईपासून त्याला दूर करतात आणि स्वतःच्या जगामध्ये जगण्याचा त्याचा प्रारंभ होतो. म्हणजे मुलाच्या जन्मण्याची वेळ ही नाळ कापण्याची वेळ मानायची का?_ 

६. _आणि खरं म्हटलं तर मूल आईपासून नाळ कापून वेगळं करूनही चालत नाही. जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे रडावंच लागतं. ते जर रडलं नाही, तर डॉक्टरला रडण्याची पाळी येते. कारण मुलांची फुप्फुसं ही आईच्या गर्भाशयामध्ये आकुंचित असतात. ज्यावेळी ते रडतं, त्यावेळी ते बाहेरचा श्वास घेतं आणि त्याची फुप्फुसं प्रसरण पावतात. म्हणजे मूल ज्यावेळी या जगातला पहिला श्वास घेतं त्यावेळेला ते जन्माला आलं, असं मानायचं का? आणि हे तरी का मानायचं? त्याला पुरावा काय?_

७. _आपल्याला माहीत आहे की काही बायकांची नैसर्गिक प्रसूती होणारी नसते. ज्यांची नैसर्गिक प्रसूती होणार नसते त्यांना आम्ही डॉक्टर असं सांगतो की, 'तुमचे दिवस पूर्ण झाले की, मग आपण तुमचं सिझरीनचं ऑपरेशन करू. ऑपरेशन सोपं असतं आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही.' अशा वेळेला त्या बाईचे नऊ महिने भरतात. ती डॉक्टरांच्याकडे जाते. डॉक्टर तिला असं सांगतो की, 'उद्या सकाळी या. भूल देणाऱ्या आमच्या डॉक्टरांनाही वेळ आहे. उद्या सकाळी आपण तुमचं ऑपरेशन करून टाकू.' आणि ती बाई थोडीशी चाचरत-चाचरत असं म्हणते की, 'डॉक्टर, तुम्ही माझं ऑपरेशन आणखी दोन दिवसानी केलं तर चालेल की नाही?' डॉक्टरांना काही कळत नाही ते म्हणतात, 'कशाकरता?' ती म्हणते, 'आणखी दोन दिवसांनी गुढीपाढवा आहे.

_त्यामुळे माझं मूल जन्माला येताना साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर जन्माला येईल. त्याच्यामुळे माझं मूल मुहूर्तावर जन्माला यावं, यासाठी तुम्ही दोन दिवसांनी माझं सिझरीन करा.' आता तुझं मूल वेळेवर जन्माला घालून त्याचं भविष्य, त्याचं सगळं आयुष्य हे जर चांगलं करण्याची क्षमता डॉक्टरांच्यामध्ये असेल तर मग डॉक्टर हा ब्रह्मदेवाचा बाप झाला, असं मानायला हरकत नाही. आणि समजा, आपण जर असा प्रयत्न केला-जी गोष्ट शक्य आहे एका हॉस्पिटलमध्ये एकाच ठिकाणी एकाच ऑपरेशन थिएटरमध्ये म्हणजेच एकाच अक्षांश रेखांशावर बरोबर एकाच सेकंदाला सिझरीन करून तीन बालकांना जन्म देता येणं शक्य आहे. ज्यापैकी एक बालक अंबानीसारख्या श्रीमंत घराण्यातले असेल. दुसरे बालक हे सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातले असेल आणि तिसरं बालक हे रोजगार हमीवर काम करणाऱ्या शेतमजूर स्त्रीचं मूल असेल. एकाच सेकंदाला एकाच ठिकाणी जन्माला आलेल्या मुलांची ही भविष्यं ही एकच असतील काहो? ती निश्चितच एक नसतील._

*_क्रमशः_*

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

*_संदर्भ :- श्रद्धा आणि अंधश्रद्धा_*

*_लेखक :- डॉ नरेंद्र दाभोलकर_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :-_* २१/१२/२०२४

✨🌹🙏✨🌹🙏✨🌹🙏✨🌹

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...