Thursday, 20 October 2022

राजकुमार सीलवा

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_राजकुमार सीलवा_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

                    _*बिम्बिसारचा आणखी एक पुत्र होता सीलवा. बिम्बिसारच्या कित्येक राण्या होत्या. काही वरिष्ठ, अनेक कनिष्ठ सीलवा त्यापैकी कोणत्या राणीचा पुत्र होता, हे सांगता येत नाही.* राज्यसत्तालोलुप अजातशत्रूने त्याला ठार करण्याचे अनेक प्रयत्न केले. यावरून असे अनुमान करता येईल की, तो एक विशेष महत्वाचा राजपुत्र असावा. राज सिंहासनावर इतरांपेक्षा त्याचा जास्त अधिकार असावा. म्हणून तर अजातशत्रु त्याला आपला प्रबळ स्पर्धक मानून त्याला मारण्यासाठी अनेक कटकारस्थाने करीत राहिला. परंतु आपल्या पूर्वपुण्याईच्या बळावर सीलवा मृत्यूच्या भक्ष्यस्थानी पडला नाही._

                       _*एकदा एक षडयंत्र रचून त्याला एका उन्मत्त कोपिष्ट हत्तीच्या पाठीवर बसविले. हेतू हा की हत्ती क्रुद्ध होऊन त्याला आपल्या पाठीवरून पाडील व पायाखाली तुडवून ठार मारील. सीलवाची भगवान बुद्धांच्यावर नितांत श्रद्धा होती. तो वारंवार त्यांच्याकडून धर्म शिकण्यासाठी वेणुवनात जात असे. भगवानांना माहित होते की, हा माणूस याच जीवनात अरहंत होण्याची पूर्ण क्षमता असलेला आहे. जेव्हा त्यांना कळले की त्याला कपटाने उन्मत्त हत्तीच्या पाठीवर बसविले गेले आहे. तेव्हा महामोग्गलायनला त्याचे प्राण वाचविण्यासाठी पाठविले. महामोग्गलायनने आपल्या मैत्रीबलाने त्या उन्मत्त हत्तीला शांत केले व त्याला राजकुमार सीलवासहित भगवान बुद्धांच्या जवळ आणले. शांत चित्ताने हत्तीने भगवानांसमोर गुडघे टेकले आणि सीलवाने उतरून भगवानांना साष्टांग प्रणिपात केला.*_

                          _*सीलवा खरोखरच अत्यंत शीलवान होता. भगवान बुद्धांनी त्याला यथायोग्य उपदेश देऊन विपश्यना साधना शिकवली. तिचा सतत अभ्यास करून तो स्रोतापन्न अवस्थेला पोहोचला. त्यानंतर अत्यंत श्रद्धाशील भावनेने तो प्रव्रजित झाला आणि मगध राज्यातील कटकारस्थानांपासून दूर होऊन कोशल देशातील एका अरण्यात दूरवर एकांत साधना करण्यासाठी निघून गेला. काही कालावधीनंतर योग्य वेळी त्याला अरहंत अवस्था प्राप्त झाली.*_

                           _जेव्हा अजातशत्रूला कळले की सीलवा कोणा एका अरण्यात प्रव्रजित होऊन राहिला आहे. तेव्हा त्याला वाटले की, हा मृत्यू टाळण्यासाठी सोंगे करीत आहे. अनुकूल वेळ येताच हा मगधात परत येऊन गादीवर आपला अधिकार अवश्य सांगेल. म्हणून हा काटा आताच काढला पाहिजे. सीलवा परक्या देशात होता. तिथे आपले सैनिक पाठवून तो त्याला कैद करू शकत नव्हता. म्हणून त्याने काही धंदेवाईक हत्याऱ्यांना त्याला ठार करण्यासाठी पाठविले. *जेव्हा है लोक या दुष्ट हेतूने अरहंत सीलवाजवळ पोहोचले, तेव्हा सीलवाने त्यांना अत्यंत मैत्रीचित्ताने आपल्याजवळ बसवून घेतले आणि धर्मप्रवचन ऐकविले. मैत्रीभावाच्या तरंगानी ते प्रभावित झाले व धर्मदेशना ऐकू लागले. शीलवान सीलवाने त्यावेळी जे शील महात्म्य, सत्वरित्र महिमा गायिला सुदैवाने आजही सुरक्षित आहे.* आपल्यासाठी उपलब्ध आहे. हे धर्मगीत पंचवीसशे वर्षांपासून धर्म पथिकांना, मोक्षमार्गीयांना असीम प्रेरणादायक ठरत आहे. आज ही ते तेवढेच प्रेरणादायक व टवटवीत आहे. या सनातन धर्मवाणीपासून आपण प्रेरणा घेऊ या व प्रसन्न होऊ या.

*_सीलवाद्वारे गायिलेले शील महात्म्य असे आहे._*

_*१.* इथे या मृत्यूलोकात मोक्षमार्गीयांनी चारित [ पालनयोग्य ] आणि वारित [वर्ज्य] शीलात सुरक्षित व्हायला पाहिजे. अशा सेवित शीलामुळे सर्व मानवी, दिव्य आणि निर्वाणिक संपत्तीचा लाभ होतो._

_*२.* या लोकात ज्याला यश, प्रशंसा व त्याचप्रमाणे परलोकीचा आनंद लाभ हवा आहे त्या समजदार बुद्धिवंताने आपल्या शीलाचे रक्षण करावे._

_*३.* शारीरिक, वाचिक दुष्कर्मापासून दूर राहणारा शीलवान माणूस आपल्या धर्माचरणामुळे अनेकांना आपला मित्र बनवितो. या उलट कायिक, वाचिक दुष्कर्मात मग्न दुःशील व्यक्ती आपल्या पापाचरणामुळे आपल्या मित्रांपासून दुरावतो. मित्रता धुळीस मिळवितो. ४. दुःशील निंदनीय व अपयशी ठरतो पण सत्शील माणूस सदैव कीर्ति आणि प्रशंसा प्राप्त करतो._

_*५.* सदाचरणाचा मार्ग सर्व कुशलतेचे उगमस्थान आहे. प्रतिष्ठापित आधार आहे, कल्याणाचा जनक आहे आणि सर्व धर्मात प्रमुख स्थान घेणारा आहे. म्हणून नेहमी शुद्ध शील संपादन करावे._

_*६.* दुराचरणाला शील हे सीमारेषेप्रमाणे असते. शील मनाचा समतोल आहे. शील मनाची अतीव प्रसन्नता आहे. सर्व बुद्धांचे ते तीर्थ आहे. तिथे दुष्कर्माांची मलीनता धुतली जाते आणि पुढे जाऊन निर्वाण शांतीची डुबकी मारता येते. म्हणून शुद्ध शील संपादन करावे._

_*७.* शील माराच्या सेनेला पराजित करण्यासाठी अप्रतिम सामर्थ्य आहे. विकारांचा समूह नष्ट करणारे उत्तम अस्त्र आहे. शील धर्मवंतांचे आभूषण अलंकार आहे. शील आपल्या संरक्षणाचे अभेद्य अद्भुत कवच आहे._

_*८.* विकारांमध्ये बुडून जाऊ नये यासाठी आणि संसार-सागर तरुन जाण्यासाठी शील सहाय्यक पूल आहे, सेतू आहे. शील एक सर्वदूर पसरणारा सुगंध आहे, श्रेष्ठ प्रकारचा लेप आहे. ज्याचा सुवास सर्व दिशांना पसरतो - प्रवाहित होतो._

_*९.* भवचक्राच्या भीषण बिकट मार्गाला पार करणाऱ्या धर्मसंपन्न व्यक्तीसाठी शील श्रेष्ठ आधार आहे. शील उत्तम पाथेय-शिदोरी आहे. शील है असं एक वाहन आहे की त्यात बसून अतिदुर्गम अरण्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व दिशांतून प्रवास करता येतो._

_*१०.* शीलामध्ये समाहित नसलेला प्राणी या लोकात निंदा अपयशाचा भागीदार होतो आणि परलोकात अधोगतीस प्राप्त होऊन दुःखी होतो. अशी मूर्ख व्यक्ती सर्वत्र उदासीन व दुःखी राहाते._

_*११.* शीलसंपन्न धर्माचरणी याच लोकी यशस्वी कीर्तिमान होतो आणि परलोकातही स्वर्गीय सुखभोगी होतो. अशी सूज्ञ व्यक्ती सर्वत्र सुमन सुखलाभी होते._

_*१२.* इथे ह्या विमुक्ती मार्गावर शील अग्रभागी आहे, प्रमुख आहे. प्रज्ञा उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. शील आणि प्रज्ञा यांच्या संयोगाने मनुष्य आणि देवतांना सदैव विजय मिळत असतो._

_शीलमहात्म्याची कशी आहे ही सांगोपांग अभिव्यंजना! स्वच्छ स्पष्टीकरण!!_

_*खरच शील आधार आहे प्रज्ञेचा व प्रज्ञा ही आधार आहे विमुक्तीची. शीलावाचून प्रज्ञा जागृत होऊ शकत नाही. 'न हि सीलेन विना पञ्ञा सम्भवति ।" आणि प्रज्ञेवाचून केवल शील मुक्तीदायी होत नाही. प्रज्ञेवाचून शीलवान व्यक्ती किच्चकत [कृत्यकर] होतो पण किच्चकत [कतकृत्य] होत नाही. शील आणि प्रज्ञा दोन्ही परस्परांना उपयुक्त आहेत, सहाय्यक आहेत, बल प्रदान करणाऱ्या आहेत. म्हणून म्हटले गेले आहे की, जसे एका हाताने रगडून दुसरा हात धुता येतो, एका पायाने रगडून दुसरा पाय स्वच्छ करता येतो, तसेच शीलाला प्रज्ञेने रगडून धुवावे आणि प्रज्ञेला शीलाने रगडून धुवावे. विमुक्ती निश्चितच प्राप्त होते.*_

               _कोणी एकादा सामान्य वक्ता देखील शील आणि प्रज्ञेची अशी व्याख्या करू शकतो पण ती तेवढी परिणामकारक होत नाही. इथे शीलाचे महात्म्य त्या शीलवंताने गायिले आहे. जो शीलाच्या आधाराने प्रज्ञा जागवून अरहंत झाला आहे. त्याची वाणी अशी कारुण्याने ओथंबली आहे. आणि ओजपूर्ण आहे. जिला ऐकून प्रचंड धन मिळण्याच्या लोभामुळे आलेले ते खुनी सुद्धा बदलले. त्यांची मनोभूमिका बदलली. त्यांच्या मनात धर्मसंवेग जागा झाला. निर्वेद जागला. साऱ्यांनी  संत सीलवाच्या पायांवर डोके ठेवले व ते गैरमार्गाने उदर निर्वाह करण्याचे सोडून स्वस्ति-मुक्तीच्या खऱ्या मार्गाचे अनुगामी झाले._

_धन्य आहे हे शील महात्म्य! या! मित्रांनो! आपण देखील असेच आपले शील बलवान करू या आणि प्रज्ञापथावर एकेक पाऊल पुढे टाकून आपले मंगल साधू या!_

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- २०/१०/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/10/blog-post_20.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...