*_प्रश्न ६४ - माणसाच्या मेंदूचे अनेक भाग अजून अज्ञात आहेत. त्याची कार्यक्षमता विकसित व्हायची आहे. त्या भागातून अतिन्द्रिय शक्तीची स्पंदने निघत असतील काय?_*
*उत्तर* 👉 *माणसाच्या मेंदूचे तीन भाग मानले जातात. थॅलॅमस, हायपोथॅलॅमास व पॉन्स. या भागात जीवन धारणेला अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टींची नियंत्रण केंद्रे असतात. रक्तदाब, श्वसन, हृदयाची हालचाल याचे नियंत्रण या भागातून होते. त्याला जोडून वरच्या भागात लिम्बिक मेंदू असतो. माणसाची स्मृतीधारणा म्हणजेच स्मरणशक्तीचा काही भाग साठवण करण्याची क्षमता या भागात साठवलेली असते. आपल्या कोमल भावना माया, ममता या भागात उगम पावतात. निओकॉर्टेक्स हा सगळ्यांत प्रगत असून आपली विचारशक्ती, बुद्धिमत्ता, गहन समस्यांवर उत्तरे शोधण्याची क्षमता, तरल संवेदना, तरल भावना यात साठवलेली असते.* अर्थातच ही ढोबळ विभागणी आहे. या सर्व मज्जा संस्था एकत्रित काम करीत असतात. मेंदूच्या भागाचे पूर्ण काम अजून माहित नाही, पण रचना पूर्ण माहित आहे. त्या रचनेत अतींद्रिय शक्तीला कोणताही आधार नाही. जो अज्ञात लहरी प्रक्षेपण वा ग्रहण करेल असा भाग मेंदूत असण्याची शक्यता शून्य आहे.
*माणसाच्या मेंदूचा अभ्यास म्हणजे मेंदूत तयार होणाऱ्या विद्युत रासायनिक स्पंदनाचा अभ्यास, हे नीट लक्षात ठेवावयास हवे. विशिष्ट कारणाने काही वेगळी क्षमता कुणाच्या मेंदूत निर्माण झाल्यास तिच्यात अतींद्रिय काही नसेल, जी आज न उद्या निश्चितपणे समजू शकेल. परंतु आज अज्ञात आहे अशी एखादी प्रक्रिया असेल.*
उदाहरणार्थ काही मतीमंद बुद्धीची मुले असतात त्यांचा बुद्ध्यांक सत्तर वा त्यापेक्षा कमी असतो. मात्र शंभर वर्षांतील कॅलेंडरच्या कोणत्याही तारखेचा वार वा कोणत्याही महिन्यातील कोणत्याही वाराची तारीख ते क्षणार्धात सांगतात. सहा अंकी संख्येचे वर्गमूळ, घनमूळ सेकंदात सांगतात. ही क्षमता त्यांच्यात कशी आली हे अजूनही माहित नाही, परंतु त्यांना मिळालेली ती दैवी शक्ती नाही. ही क्षमता त्यांना कशी प्राप्त होते याचा उलगडा जेनेटिक इंजिनियरिंग मध्ये आज न उद्या नक्की होईल. त्याप्रमाणेच अतींद्रिय शक्ती एखाद्यात आहे असे उद्या आढळले, तरी त्याची वैज्ञानिक कारणमीमांसा समजू शकेल. त्यामध्ये गूढ विज्ञानापलीकडचे काही नाही.
*-डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment