*_प्रश्न ४६ - प्लँचेटच्या साहाय्याने मृतात्म्यास आवाहन करता येते व माहिती मिळविता येते हे खरे की खोटे?_*
*उत्तर 👉* अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची प्लँचेट करून पाहिलेली आहेत. प्लँचेट करणे ही बनवेगिरी आहे, हाच निष्कर्ष निरीक्षणांती अनुभवास येतो. प्लँचेट करताना अक्षरे व अंक रेखाटलेल्या गुळगुळीत पाटीवर अगर बोर्डवर बोटाने सरकवता येईल अशी गुळगुळीत वस्तू ठेवलेली असते. उदाहरणार्थ काचेचा पेला, बॉल बेअरिंग लावलेले लाकडी बदाम इत्यादी.
ज्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा आत्मा बोलवायचा, त्याने आपले बोट गुळगुळीत वस्तूवर ठेवायचे. प्लँचेट करणाऱ्या एक अगर दोन व्यक्ती असतात. त्या आपली बोटे प्लँचेट वस्तूवर ठेवतात. प्लँचेट करणारे खुबीने त्या वस्तूला असा जोर लावतात की हव्या त्या अक्षराकडे प्लँचेट वस्तू सरकावी. उदा. तू सुखी आहेस का? असा आत्म्याला प्रश्न विचारला व उत्तर नाही असे आणावयाचे असेल तर प्लँचेटवाले न , ा, ह, ी अशा क्रमाने अक्षरावरून प्लँचेट वस्तू सरकवतात. बोटांच्या दाबाचा उपयोग या बनवेगिरीत अशा तऱ्हेने केला जातो. स्वर्गातील अगर पृथ्वीवर भटकत असलेल्या आत्म्याला हवेतून, पोकळीतून सहज संचार करता येत असेल तर प्लँचेट (व ग्लास अगर बदाम)मध्ये प्रवेश करायला त्यास बोटांचा आधार कशाला हवा?
प्लँचेट करणाऱ्या व्यक्तींना बोटे सरळ न ठेवता प्लँचेट वस्तूवर उलटी ठेवायला सांगितली तर त्यामुळे पेलयाला ढकलता येणे अशक्य होते. आत्मा प्लँचेटध्ये येण्यास बोटाचा स्पर्श पुरा असेल तर उलट्या बोटांनी प्लँचेट का करता येत नाही?
बल लावल्याशिवाय वस्तू हलत नाही, हे भौतिक सत्य आहे. बोटाने बल लावून केलेली हातचलाखी म्हणजे प्लँचेट. प्लँचेटध्ये आत्मा येत नाही. कारण आत्मा नसतोच. यामुळेच ज्या व्यक्तींचा प्लँचेटवर विश्वास नाही, अशा तीन व्यक्तींना करण्यास बसवले तर त्यांच्या स्पर्शाने वस्तू कधीही हालत नाही.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment