Friday, 5 February 2021

सुभा कम्मारधीता

 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*७० सुभा कम्मारधीता*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖    

                    _राजागृहातील एका सोनाराच्या घरी हिचा जन्म झाला होता. सौंदर्यसंपन्न असल्यामुळे *’सुभा’* असे नाव ठेवण्यात आले. एके दिवशी ती तथागतांचे दर्शन करण्यासाठी गेली. दर्शन घेऊन तीने त्यांना वंदन केले आणि एका बाजूला बसली. भगवंतांनी तिला धम्मोपदेश केला. तेथेच तिला स्रोतापती फळाची प्राप्ती झाली. काही दिवसांनी गृहत्याग करून महापजापती गोतमीकडे जाऊन ती प्रव्रजित झाली आणि ती अर्हतपदाची प्राप्ती करण्यासाठी ती साधना करू लागली. तिचे नातलग येऊन तिला संपत्तीचे प्रलोभन दाखवीत होते. परंतु तिने सांसारिक जीवनातील दोष दाखवून त्या सर्वांना परत पाठविले. अर्हतपदाचा साक्षात्कार झाल्यावर ती आपल्या पूर्वजन्माचे स्मरण करीत असताना आनंदाने तिच्या तोंडून पुढील उद्गार बाहेर पडले :-_

*_मी पुर्वी तरुणी, शुद्धवसना असताना ज्या दिवशी धम्म ऐकला त्याच दिवशी अप्रमादि अशा मला सत्याचे यथार्थ ज्ञान झाले. ||३३८||_*

*_त्याच दिवसांपासून मला सर्व कामभोगांचे बाबतीत खूप अनासक्ती वाटू लागली. सत्काय दृष्टीत आत्मा आहे असे मानण्यात भय आहे असे पाहून मला निष्काम भावनेत आवड वाटू लागली. ||३३९||_*

*_नातलग, दास, सेवक, समृद्ध गाव आणि शेती त्याचप्रमाणे रमणीय व आनंद देणाऱ्या इतर उपभोग्य वस्तूंचा त्याग करून व मोठी संपत्ती सोडून मी प्रव्रजित झाले.||३४०||_*

*_अशाप्रकारे श्रद्धेने संसारत्याग करून मी सद्धम्मात गेले असतांना सोने-चांदी त्यागून मी अकिंच्च्न भावाची इच्छा करावी हे योग्य नाही काय? पुनः घरी परत यावे हे श्रमणाला योग्य नाही. ||३४१||_*

*_चांदी अथवा सोने हे ज्ञानाकरिता नाही व शांतीकरिताही नाही. हे श्रमणाला योग्य नाही. हे अर्याचे धन नाही. ||३४२||_*

*_लोभ, मद, मोह व रजोगुण वाढविणारे आहेत. ते जवळ बाळगण्यात अनेक शंका कुशंका व रक्षण करण्यास अनेक आयास पडतात. असे असून सुद्धा ते स्थिर राहत नाही माणसाजवळ आज आहे उद्या नाही. ||३४३||_*

*_येथे सोन्या चांदीमध्ये आसक्त झालेली माणसे प्रमत्त होतात. त्यांच्या मनाला क्लेश उत्पन्न होतात. त्यामुळे ते एकमेकांशी सतत संघर्ष करतात व आपसात कलह वाढवितात. ||३४४||_*

*_कामतृष्णामध्ये आसक्त असलेल्या मनुष्यांमध्ये वध, बंधन, परीक्लेश, हानी, शोक, उपद्रव ह्या सर्व आपत्ती दिसतात. ||३४५||_*

*_तर मग माझ्या नातलगांनो! तुम्ही जणू काही माझे शत्रू होऊन कशाकरिता मला कामतृष्णाकडे वळवीत आहात? प्रव्रजित झालेली मी कामतृष्णात भय पाहते हे समजून घ्या. ||३४६||_*

*_सोन्यानाण्याने आश्रव नष्ट केले जात नाहीत. काम हे मानवांचे शत्रू, वध करणारे, वैरी आहेत. त्याचप्रमाणे ते पीडादायक बंधन आहेत. ||३४७||_*

*­_ तर मग माझ्या नातलगांनो! तुम्ही जणू काही माझे शत्रू होऊन कशाकरिता मला कामतृष्णाकडे वळवीत आहात? मुंडण करून संघाटी नेसलेली अशी मी प्रव्रजित झाले आहे हे समजून घ्या. ||३४८||_*

*_भिक्षेकरिता दारोदारी उभी राहून मिळविलेला अन्नाचा गोळा व धुळीने माखलेले चीवर बेघर जीवनाचा आधार असलेल्या मला हेच अनुकूल आहे. ||३४९||_*

*_दिव्य आणि मानवी कामभोग महर्षींनी नष्ट केले आहेत, एका सुरक्षित अशा स्थानामध्ये ते विमुक्त झाले असून त्यांनी अचल सुख प्राप्त केले आहे. ||३५०||_*

*_ज्यामध्ये मानवाला संरक्षण नाही अशा कामभोगांमध्ये मी जाऊ नये. कारण कामभोग मानवांचे शत्रू, वध करणारे, प्रज्वलित अग्नीपुंजाप्रमाणे दुःखदायक आहेत. ||३५१||_*

*_कामभोग हा भीतीयुक्त, विघातक, फाटेरी व धोक्याचा मार्ग आहे. अत्यंत विषम असा लोभ उत्पन्न करणारा व मोह पाडणारा आहे. ||३५२||_*

*_कामभोग सापाच्या फण्याप्रमाणे असून त्याचा उपसर्ग महाभयंकर आहे. जे त्याचे अभिनंदन करतात ते मूर्ख, अज्ञानान्ध व सामान्य आहेत. ||३५३||_*

*_जगामध्ये पुष्कळ अडाणी लोक कामभोगरुपी चिखलात फसलेले आहेत. ते जन्म मरणाच्या चक्राचा अंत जाणत नाहीत. ||३५४||_*

*_कामभोगाची इच्छा असल्याकारणामुळे पुष्कळ लोक दुर्गतीला नेणाऱ्या मार्गाने वाटचाल करतात व ते स्वतः रोगाला आमंत्रण देतात. ||३५५||_*

*_अशाप्रकारे कामभोग शत्रू निर्माण करणारे, तापदायक, क्लेशदायक, लोकांना आमिष दाखविणारे आणि माणसांना संसाराच्या बंधनात बांधणारे आहेत. ||३५६||_*

*_कामभोग, उन्माद व प्रलाप उत्पन्न करणारे, चित्त भडकविणारे असून प्राण्यांच्या क्लेशाकरिता माराने निःशंकपणे पसरेलेल जाळे आहे. ||३५७||_*

*_कामभोग अत्यंत दोषयुक्त, पुष्कळ दुःखदायक, महाविषारी, अल्प आस्वाद असलेले, युद्ध घडविणारे व मानव जीवनाच्या उज्ज्वल पक्षाचे शोषण करणारे आहेत. ||३५८||_*

*_मी अशाप्रकारे पुन्हा आचरण करून कामभोगाच्या इच्छेने त्या आपत्तीमध्ये पुन्हा परत येणार नाही. कारण आता मी निब्बाणात सतत रमणारी आहे. ||३५९||_*

*_कामभोगाबरोबर युद्ध करून मी शांतभावाची इच्छा करणारी आहे. सर्व बंधनाचा नाश करण्याकरिता मी अप्रमादि राहून विहार करीन. ||३६०||_*

अशोक, निर्मल, सुरक्षित, सरळ अशा ज्या आर्य अष्टांगिक मार्गाने महर्षी तरुन गेले त्याच मार्गांचे मी अनुसरण करीन. ||३६१||_*

*_पहा, मी धम्मात स्थिर झालेली सोनाराची कन्या, सुभा, तृष्णारहित असलेले स्थान प्राप्त करून वृक्षाखाली ध्यान करीत आहे. ||३६२||_*

*_सद्धम्माची शोभा वाढविणारी, श्रद्धायुक्त, उप्पलवण्णा भिक्खुणीची शिष्या, तीन विद्या प्राप्त, मृत्यूवर मिळविलेली असून प्रव्रज्या घेतल्यानंतरचा तिचा आज आठवा दिवस आहे. ||३६३||_*

*_ती हि भिक्खुणी, इंद्रियांची भावना केलेली, ऋणमुक्त, स्वतंत्र, सर्व बंधनापासून विमुक्त, कृतकृत्य आणि चित्तमलरहित आहे. ||३६४||_*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*संदर्भ: - थेरिगाथा*

*संकलन :- महेश कांबळे*

*०६/०२/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

नवसुत्तं

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 "नवसुत्तं" https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_20.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _...