➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_मूर्खांवर आपले काम सोपवू नये_*
*_(आरामदुसक जातककथा)_*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_एका काळी वाराणसी नगरीत उत्सवाची उद्घोषणा करण्यात आली होती. त्या दिवसापासून सर्व लोकांनी उत्सवास सुरुवात केली. पण राजाच्या बगीच्यातील माळ्यास आपले काम टाकून या उत्सवास जाता येईना. पुढे त्या माळ्यास एक युक्ती सुचली की, आपल्या उद्यानांत राहणाऱ्या वानरांच्या टोळीवर बगीच्याला पाणी देण्याचे काम सोपवून आपण रक दिवस तरी उत्सवाला जावे. तो त्या टोळीच्या मुख्य वानरास म्हणाला, "मित्रा या उद्यानापासून जसा मला फायदा आहे तसा तुम्हाला देखील फायदा आहे. बागेतील फळे खाऊन तुम्ही आपला निर्वाह करिता, तेव्हा एक दिवस माझे थोडे काम करणे तुमचे कर्तव्य आहे."_
_तो वानर म्हणाला, "आपले काय काम आहे ते आम्हांस समजावून द्या म्हणजे आम्हाला शक्य असेल तर ते आम्ही करू."_
_माळी म्हणाला, "तुम्ही या झाडांच्या रोपांना आजचा दिवस तेवढे पाणी द्या म्हणजे तेवढ्या अवधीत मी उत्सवाची थोडी मौज पाहून माघारी येतो." तो वानर म्हणाला, "ठिक आहे, आम्ही मोठ्या संतोषाने हे काम करितो."_
_माळी पखाली आणि लाकडाची भांडी वानरांच्या स्वाधीन करून शहरांत गेला. इकडे मुख्य वानर आपल्या टोळीतील वानरांना म्हणाला, "आपल्यावर सोपविलेले काम आपण मोठ्या शिताफीने केले पाहिजे. येथल्या पाण्याच्या अपव्यय न करिता ते मोठ्या काटकसरीने वापरले पाहिजे. नाहीतर आपल्याला आणि माळ्याला पाण्यासाठी त्रास सोसावा लागेल. तेव्हा तुम्ही झाडाच्या रोपाला पाणी देत असतांना त्यांच्या मुळाच्या प्रमाणाने पाणी देत जा. त्यांची मुळे खोल गेली असतील त्यांना जास्ती पाणी द्या व ज्यांची उधळ असतील त्यांना कमी पाणी द्या."_
_वानरांनी आपल्या पुढाऱ्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व रोपे उपटून पाहून त्यांच्या मुळांच्या प्रमाणावर त्यांस पाणी दिले._
_या वानरांच्या कृत्यामुळे बिचाऱ्या माळ्याचे किती नुकसान झाले असेल याची कल्पनाच केली पाहिजे! *मूर्खांवर जो आपल्या कामाचा भार टाकतो त्याची शेवटी अशीच हानी होते !*_
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संदर्भ : - जातक कथा संग्रह*
*संकलन :- महेश कांबळे*
*१६/११/२०२०*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
No comments:
Post a Comment