Friday, 5 August 2022

चढ उतार प्रगती पथावर

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_चढ उतार : प्रगती पथावर_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

                 _नंदक आणि भरत नावाची दोन मले चंपा नगरीत एका धनाढ्य गृहस्थापोटी जन्मास आली. भगवान बुद्धांचा तो कालखंड होता. मोठे झाल्यावर नंदक आणि भरत या दोघांनीही असे ऐकलं की त्या नगरीतील *सोण* नावाचा अत्यंत सुकोमल, आणि ऐष आरामांत वाढलेला महाधनवान असा युवक घरदार सोडून *भगवान बुद्धांच्या सान्निध्यात गेला. प्रव्रजित-संन्यस्त जीवन स्वीकारून साधना करीत करीत अरहंत अवस्थेला पोहोचला.* हे ऐकून त्या दोन्ही भावांच्या मनांत धर्मसंवेग जागा झाला आणि दोघांनीही व्रतस्थ जीवन स्वीकारून विपश्यना साधनेस वाहून घेतले. *मोठा भाऊ भरत आपल्या सत्प्रयत्नांनी थोड्याच कालांत साऱ्या आस्रवातून मुक्त होऊन अरहंत अवस्थेस पोहोचला. पण लहान भाऊ नंदकाला हे यश लाभले नाही.* त्याच्या साधनामार्गात अनेक अडचणी आल्या. तरीही त्याने प्रयत्न सोडला नाही. एवढे प्रयत्न पण अनेक जन्मातील संग्रहित झालेल्या मलिन कृत्यांच्या [कषायांच्या ] कारणांमुळे एकावर एक अनंत अडचणी उभ्या राहिल्या. अंतराय वाढत राहिले. शारीरिक संवेदनाच्या आधाराने अनित्यबोधाची, परिवर्तनशीलतेची प्रज्ञा जागृत झाली नाही. नंदक फारच निराश झाला. साधना करण्याच्या त्याच्या उत्साहावर पाणी पडले. भरताने आपल्या भावाची ही अवस्था पाहिली व त्याच्या मनांत प्रेरणा जागृत करण्यासाठी तो त्याच्याशी काही वेळ धर्म चर्चा करीत राहिला. साधनेचे विधी - नियम समजावून दिले आणि त्याला ध्यानकेंद्रावर फिरायला घेऊन गेला. काही अंतर चालून गेल्यावर रस्त्याच्या काठी बसून धर्मप्रबोधन - धर्मजागृतीची शिकवण देऊ लागला._

      _एवढ्यांत बैलगाड्यांचा एक जथा समोरून येतांना त्यांना दिसला. पाहतात तो काय? त्यातील एका बैलगाडीचे चाक एका खोल चिखलाच्या दलदलीत रुतून बसले आहे. गाडीचा बैल स्वतः गुडघ्याएवढ्या चिखलात रुतलेला असतांनाही पराकाष्ठेने गाडी खेचण्याची शिकस्त करीत होता. पण असफल होऊन तिथेच खाली पडला. गाडीवानाने तात्काळ त्याच्या मानेवरचे जूं-जोखड सोडले त्याला बाहेर काढले. चारापाणी देऊन विश्राम दिला. त्या बैलाची पाठ थोपटली व त्याला गाडीला जोडले. बैल जातिवंत होता. प्रशिक्षित-अनुभवी होता. त्याने सारी शक्ती एकवटून गाडीला दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले._

       _ते दृश्य दाखवून भरत आपल्या भावाला नंदकाला म्हणाला, "पाहिलास ना त्या बैलाचा पुरुषार्थ," नंदक उत्तरला 'हो ना! ज्याप्रमाणे या पुरुषार्थी बैलाने आपली संपूर्ण ताकद लावून गाढ चिखलातून गाडीला बाहेर काढले त्याप्रमाणे मी ही माझ्या संपूर्ण परिश्रमांनी या भवसंसाराच्या चिखलाच्या दलदलीतून बाहेर पडेन."_

         _*या प्रेरणादायी दृश्याने नंदकाचा आत्मविश्वास बळावला. तो विपश्यना साधनेच्या प्रयत्नास लागला. पुन्हा आरंभ केला. अजूनपर्यंत वैफल्याचे आघात सहन करणारा नंदक आता अतिउल्हसित अंतःकरणाने साधना करू लागला. त्याला सफलता मिळाली. विपश्यना साधनेच्या तेजाने - तपोबलाने त्याची सारी भवबंधने तुटली. तो मुक्त झाला. अरहंत अवस्थेला पोहोचला. साधना सफल झाली. साधक कृतार्थ झाला.*_

           _विजयाच्या या आनंदमय उल्हासात या प्रेरणादायक प्रसंगांची आठवण करून त्याच्या तोंडून प्रभावी सहजोद्वार बाहेर पडले._

            *_'सम्यक् सम्बुद्धाचे शिष्य, जे सम्यक् दर्शन संपन्न आहेत ते त्या जातिवंत बैलाप्रमाणे असतात. जो या ना त्या कारणाने चिखलात पडला अडचणीत सापडला तरीही तो अधिक आवेशाने, आत्मविश्वासाने उठून उभा राहतो व आपला मार्ग सुकर करतो. प्रगतीपथावर वाटचाल करतो. स्वतःची उन्नती साधतो._*

*_!! धन्य होवो ! मंगल होवो ! कल्याण होवो !!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_संदर्भ :- जागे पावन प्रेरणा_*

*_संकलन :- महेश कांबळे_*

*_दिनांक :- ०६/०८/२०२२_*

https://mikamblemahesh.blogspot.com/2022/08/blog-post_85.html

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

योग

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *_योग_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_19.html 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 _भगवंतांनी संबोधी मार्गा...