*_प्रश्न २६- आमच्या
गावच्या पाणवठ्यावर शेजारी वडाखालून येताना अमावस्या-पौर्णिमेला भुताने झपाटलेल्या
दहा-वीस घटना तरी दर वर्षी घडतात. आम्ही हे डोळ्यांनी बघतो. हे खोटे कसे?_*
*उत्तर* *अब्राहम कोवूरांच्या Begone
Bodmen या पुस्तकातील* त्यांना आलेला भुतांचा अनुभव येथे सांगितला,
तर वरील प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. कोवूर व त्यांच्या पत्नी या दोघांवरही
भुते असतात व ती माणसांना झपाटतात, हा संस्कार
लहानपपीच झाला होता. रिचमंड कॉलेजात असताना रात्रीच्या वेळी कॉलेजच्या मार्गावरील
खिंडीच्या रस्त्याने
पत्नीसह जाण्याचा त्यांना प्रसंग आला. त्या खिंडीतील झाडावर भयंकर भुते आहेत असे
त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले होते. खिंडीत आल्यावर सौ.कोवूर किंचाळल्या व
समोर भयानक हत्ती दिसतोय असे ओरडल्या. खिंडीतील भुताने हत्तीचे रूप घेतले असा
त्यांचा समज होऊन त्यांनी कोवूरांना घट्ट मिठी मारली. कोवूर त्या तेथून पळाले असते
तर सौ. कोवूर पळता पळता बेशुद्ध पडल्या असत्या व भुताने झपाटणे खरे असते ही
कोवूरांची समजूत दृढ झाली असती. पण कोवूर पळाले नाहीत. ते जागेवरच पत्नीला धीर देत
उभे राहिले. थोड्या वेळाने हत्तीच्या तोंडातून 'घुं
घुं' असा निघणारा आवाज त्यांना ऐकू आला तरी
कोवूर जागेवरून विचलित झाले नाहीत. पण त्यांनी दोनदा आरोळ्या ठोकल्या. त्याबरोबर
हत्तीने कान हलविला व हत्ती जवळून एक व्यक्ती कोवूरांकडे यायला लागली. "कोण
आहात तुम्ही ? अंधारात हत्ती इथे कशाला आणलात?" असे कोवूरांनी
त्याला रागाने विचारले असता तो माणूस म्हणाला,
"कोठला
हत्ती? ती मोटार आहे. मी ड्रायव्हर आहे.” हे
कोवूरांनी पुढे जाऊन बघितले.मोठी काळी डॉज गाडी झाडाखाली होती.
अंधारातील मोटार सौ. कोवूरांना
खिंडीतील भुताचे रूप (हत्तीच्या रूपात) का वाटले? भुते
असतात हा पूर्वग्रह. खिंडीतील झाडावर भुते आहेत ही ऐकलेली हकीकत.
यामुळे गाडी ही हत्ती आहे व भुताचे ते
रूप आहे हा समज झाला. धीटपणे अंधारातील ती काळी आकृती जवळून पाहिली असती, तर हा भ्रम झाला नसता.
गाडीला हत्ती समजणे हा 'दृष्टिभ्रमा'चा
प्रकार होय. गाडीत झोपलेल्या ड्रायव्हरचे घोरणे
सौ. कोवूरांना हत्तीचे घोरणे वाटले. हा
'ध्वनि-भ्रम' होय.
कोवूरांच्या पत्नीने 'तो हत्ती आहे' असे म्हणताच कोवूरही कारला हत्ती समजू लागले.
याला 'सूचना वर्तन' म्हणतात.तो
हत्ती आहे असे एकदा मनात पक्के झाले, की
पुढे त्याच दिशेने मन विचार करू लागते. गाडीच्या ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडला, तो म्हणजे हत्ती कान हालवायला लागलाय अशी समजूत
याच सूचना वर्तनानुसार घडली.पाणवठ्यावर शेजारी असलेल्या वडाच्या झाडावर भूत आहे, हा त्या गावातील लोकांचा पूर्वग्रह असतो. ही
भुते अमावास्या-पौर्णिमेला हमखास दिसतात, हा
आणखी एक पूर्वग्रह (Delusion) वडाखालून जाताना
दृष्टिभ्रमामुळे भुताचा भ्रम होतो. घाबरलेल्या व्यक्तीची दातखिळी बसते. ती भीतीने
बडबडू लागते.
बऱ्याच बाबतीत अगोदरच मानसिक संतुलन
बिघडलेल्या व्यक्ती भूत या भ्रमाची शिकार बनतात. आजारपण, अपघात, भांडण इत्यादी कारणांनी मानसिक संतुलन ढळते.
अशा व्यक्ती रात्रीच्या वेळी अगर दुपारच्या वेळी वडाखालून जाऊ लागल्या, तर
मनाची अस्वस्थता भुताच्या भासाला पूरक
ठरते. तेव्हा मनाचे संतुलन जास्तच बिघडून व्यक्ती बडबड करू लागते, गप्प गप्प राहते इत्यादी. लोक मात्र 'भुताने झपाटला' अशी
समजूत करून घेतात.
*डॉ.
नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे*
*यांनी लिहिलेल्या 'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून साभार*
https://mikamblemahesh.blogspot.com/
No comments:
Post a Comment