Tuesday, 19 October 2021

उपोसथ

_*सर्व उपासक उपासीकानां मंगलमय शुभेच्या*_

👉     *उपोसथ दिन*

https://mikamblemahesh.blogspot.com/2021/10/blog-post_26.html

👉 *उपोसथ-अष्टशीलाचे पालन कसे करावे ?*

१. ज्या दिवशी अष्टशीलाचे पालन करावयाचे आहे, त्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यापासून बुद्ध, धम्म व संघ गुणांचे सतत स्मरण करणे आवश्यक आहे.  सिद्धार्थ गौतमाचे जीवन चरित्र, त्याला बुद्धत्वाची झालेली प्राप्ती, निर्वाणाचा मार्ग, शील, समाधी, आर्यसत्य आणि प्रतित्यसमुत्पादाचे तत्त्व याविषयीच्या विचारांनी मन ओतप्रोत भरलेले असावे‌.  मनात निर्माण होणाऱ्या चित्तवृत्ती, भाव व विचार हे कुशल राहतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.  अष्टशील पालनाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अकुशल विचार, भाव इत्यादी मनात जागृत होणार नाहीत, यासाठी जागृक असणे आवश्यक आहे.

२. आंघोळीनंतर अष्टशील धारण करणाऱ्या व्यक्ती बुद्ध, धम्म व संघ वंदनेचे पठण करून, बुद्ध प्रतिमेसमोर पंचांगप्रणाम करून बुद्ध, धम्म व संघाला शरण जातात.  त्यानंतर त्या व्यक्तींनी बुद्ध विहाराला भेट देऊन भिक्खूंकडून अष्टशील ग्रहण करून घ्यावे._ 

३.  जर विहारामध्ये भिक्खू हजर नसतील, तर त्या व्यक्तीने बुद्ध प्रतिमेसमोर पंचांग-प्रणामाच्या मुद्रेत बसून स्वतःच अष्टशील ग्रहण करावे.  अष्टशील ग्रहण केल्यानंतर उपासकाने आपल्या ऐपतीप्रमाणे, 'माझ्या दानामुळे जगात धम्म वाढीस लागून लोक सुखी-समाधानी जीवन जगोत', असा विचार मनात आणून विहारास दान करावे.

४.  उपासक राहात असलेल्या भागात विहार नसतील, तर त्या उपासक आणि उपासिकांनी जवळ असलेल्या कोणत्याही सार्वजनिक सभागृहामध्ये किंवा एखाद्या उपासकाच्या घरी एकत्र जमावे व बुद्ध प्रतिमेसमोर अष्टशील ग्रहण करावे.  अष्टशील ग्रहण केल्यानंतर उपासकांनी त्यानुसार आचरण करणे आवश्यक आहे.  उपासकांनी मध्यान्हापूर्वी भोजन करणे आवश्यक आहे.  यासाठी सर्व उपासक एकत्र येऊन अष्टशील धारण केलेल्या सर्व उपासकांसाठी एका ठिकाणी अन्न तयार करू शकतात व मध्यान्हापूर्वी सामूहिकपणे ते भोजन ग्रहण करू शकतात.

५.  भोजन ग्रहण करण्यापूर्वी ज्यांच्या श्रमामुळे, ते ग्रहण करीत असलेले अन्न निर्माण झाले, अशा व्यक्तींच्या मंगलाची कामना सर्व उपासकांनी केली पाहिजे.  उपोसथाच्या दिवशी जर त्यांना अन्न दान म्हणून मिळत असेल, तर ज्या व्यक्तीच्या रानातून ते अन्न प्राप्त होते, त्या व्यक्तीच्या मांगल्याची कामनाही त्यांनी केली पाहिजे.

६.  ज्या व्यक्ती कार्यालयात किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी जातात, त्या व्यक्ती आपल्या घरी अष्टशील ग्रहण करून स्वतः जेवणाचा डबा सोबत घेऊन जाऊ शकतात.  ज्या व्यक्ती दुपारच्या भोजनासाठी घरी येतात, त्यांनी उपोसथाच्या दिवशी भोजनासाठी मध्यान्हापूर्वीच घरी पोहचून भोजन ग्रहण केले पाहिजे.

७.  उपोषणाच्या दिवशी एकत्र येऊन जे उपासक मध्यान्हापूर्वी भोजन ग्रहण करतात, त्यांनी भोजनानंतर धम्म प्रवचन आयोजित करावे.  विनयाचे पालन करणारे भिक्खू किंवा अष्टशील पालन करणारे उपासक यांना धम्म प्रवचनासाठी निमंत्रित करता येते.  उपोसथाच्या दिवशी धम्म प्रवचन ऐकून उपासकांमध्ये अष्टशीलाचे पालन करण्याची प्रेरणा निर्माण होते.  धम्म प्रवचनानंतर उपासक आपापल्या घरी जाऊन आपले दररोजचे दैनंदिन कार्य पार पाडू शकतात.

८.  अष्टशील उपोसथाच्या संपूर्ण कालावधीत उपासक आणि उपासिका यांनी अष्टशीलाचे तंतोतंतपणे पालन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.  उपोसथाच्या दिवशी दुपारचे बारा वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे.‌  उपासक फक्त द्रवरूप अन्न ग्रहण करू शकतात.  त्यामुळे उपासकांनी कोणत्याही प्रकारचे अन्न रात्री खाऊ नये.  फक्त द्रवरूप अन्नाचे प्राशन करावे.  एकंदरीत मध्यान्हापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत उपासक आणि उपासिकांना चावून खाण्याची गरज असलेले अन्न ग्रहण करता येत नाही, फक्त द्रवरूप अन्न प्राशन करता येते.

९.  उपोसथाच्या संपूर्ण कालावधीत बुद्ध, धम्म व संघ या त्रिरत्नांमधील गुणांचे व या त्रिरत्नांना शरण गेल्यामुळे प्राप्त होणाऱ्या पुण्य फळाचे विचार मनात निर्माण होणे आवश्यक आहे.

१०. संध्याकाळी बुद्ध विहारामध्ये धम्म प्रवचन आयोजित करावे.  काही उपासक एकत्र येऊन ते राहात असलेल्या भागात उपलब्ध असलेल्या हॉलमध्ये किंवा एखाद्या उपासकाच्या घरी धम्म प्रवचन आयोजित करू शकतात.  उपोसथाच्या दिवशी केलेल्या धम्म चर्चेमुळे उपासक व उपासिकांचे मन बुद्ध, धम्म व संघाविषयीच्या श्रद्धेने भरून येते व त्यामुळे उपासक आणि उपासिकांमध्ये *निब्बाण* प्राप्तीसाठी धम्म पालन करण्याची प्रेरणा निर्माण होते, उत्साह वृद्धिंगत होतो‌.

११. रात्री झोपण्याच्या वेळी तसेच दिवसभर आराम करतेवेळी सुद्धा उंच, आरामदायक व मोठा बिछाना वापरू नये.  दुसऱ्या दिवशी उपासक जेव्हा झोपून उठतो, तेव्हा त्याने बुद्ध, धम्म व संघ गुणांचे स्मरण करावे आणि स्नानादी विधी आटोपून अष्टशील सोडेपर्यंत आठ शीलांचे योग्य प्रकारे पालन करावे.

१२. स्नानानंतर पंचशील ग्रहण करून उपोसथ अष्टशीलाचा शेवट करावा.  जेव्हा उपासक पंचशील ग्रहण करतात, तेव्हा अष्टशील उपोसथाचा आपोआपच शेवट होतो.  यानंतर पंचशीलाचे पालन करून कोणत्याही तत्त्वाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावयाची असते.

१३. उपोसथाच्या संपूर्ण कालावधीत, उपोसथ संपल्यानंतर आपण कोणते विशिष्ट अन्न ग्रहण करणार आहोत याचा कुठलाही विचार मनात येता कामा नये.  खरे म्हणजे, उपोसथाचे दिवशी उपोसथ ग्रहण करणारे उपासक किंवा उपासिकांनी जे अन्न शिजविले जाईल, तेच अन्न, दान म्हणून स्वीकारावे.  उपासक किंवा उपासिकेने अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींना विशिष्ट तऱ्हेचे अन्न तयार करण्याची सूचना देऊ नये.  अन्न तयार करणारी व्यक्तीच जर उपोसथ ग्रहण करीत असेल, तर त्या व्यक्तीने दररोज ज्याप्रमाणे अन्न तयार होते, तसेच नेहमीचे अन्न तयार करावे आणि ते ग्रहण करावे.  उपोसथाचे दिवशी चवदार अन्न घेण्याचा मुळीच उद्देश नाही, तर शरीराला ऊर्जा मिळावी, यासाठी अन्न ग्रहण करणे हा अन्न ग्रहण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

१४. उपोसथाच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमास हजर राहून त्याचा आस्वाद घेऊ नये.  दूरदर्शन आणि रेडिओवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा यात समावेश आहे.  दूरदर्शनवरील सिनेमा, नृत्य, गीतगायन, वाद्य यापासून उपोसथाच्या दिवशी पूर्णतः दूर राहावे‌.  तथापि, दूरदर्शन आणि रेडिओ यांचा उपयोग या दिवशी आपल्याला करता येतो.  धम्मगीते ऐकून आपण धम्म पालनात उत्साह निर्माण करू शकतो.  

१५. उपोसथाच्या दिवशी प्रत्येकाने जेवढ्या साधेपणाने व आनंदी वृत्तीने जीवन जगणे शक्य आहे, तसे ते जगावे.  

१६. काया, वाचा  व मनाची सर्व कृती, अष्टशीलाचे उल्लंघन होणार नाही, अशीच असावी.

१७. जे उपासक समाधीचा अभ्यास करतात, त्यांनी उपोसथाच्या दिवशी सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीच्या अभ्यासासाठी जेवढा जास्त वेळ त्यांना देता येईल, तेवढा द्यावा व समाधीचा जागरूकपणे अभ्यास करावा.


☸️               *अष्टशील*             ☸️

                    ========


      अष्टशील म्हणजे आठ शीलांचे पालन होय.  अष्टशीलांमध्ये तिसऱ्या शीलातील फरकासह संपूर्ण पंचशील आणि तीन अतिरिक्त शीलांचा समावेश होतो.

     अष्टशील पुढीलप्रमाणे आहेत :

*१.  पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि ।*

(मी प्राणी हिंसेपासून विरत राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*२.  अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि ।*

(मी चोरी पासून विरत राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*३.  अब्रह्मचरिया वेरमणी सिक्खापदं समादियामि ।*

(मी ब्रह्मचर्याचे पालन करण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*४.  मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि ।*

(मी खोटे बोलण्यापासून विरत राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*५ सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि ।*

(मी सुरा, मद्य व मादक पदार्थांच्या सेवनापासून विरत राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*६.  विकाल-भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि ।*

(मी अवेळी भोजनापासून विरत राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*७.  नच्च-गीत-वादित-विस्सूक-दस्सन माला-गंध-विलेपन-धारण-मण्डन-विभूसनट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि ।*

(मी नृत्य, गायन, वादन आणि तमाशा पाहणे ह्यापासून, त्याचप्रमाणे माळा, सुगंधित द्रव्यांचे लेपन धारण करण्यापासून विरत राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*८.  उच्चासयना-महासयना वेरमणी सिक्खापदं समादियामि ।*

(मी फार उंच व मौल्यवान आसनावर, शय्येवर झोपण्यापासून विरत राहण्याची शिक्षा ग्रहण करतो.)

*जय भीम नमो बुद्धाय_*

🙏💙

1 comment:

  1. खुप सुंदर अश्या लेखांमुळे उपासकांना प्रेरणा व मार्गदर्शन मिळते
    साधू साधू साधू

    ReplyDelete

Trees and vines

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐  *_Trees and vines_* *_रुक्खलता_* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 १. Areca palm — पूगो — सुपारीचे झाड २. Bamboo — वेळ; वेणु — ...