🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_दोन अंगठ्या_*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
_एका वृद्ध गृहस्थाचे निधन झाले. त्याच्या मागे दोन मुलगे होते. आपल्या भारतीय परंपरेनुसार पित्याच्या मृत्यूनंतर काही दिवस ते एकत्र कुटुंब पद्धतीला अनुसरून एक कुटुंब म्हणूनच राहू लागले. पुढे घरगुती भांडणांमुळे संपत्तीची वाटणी करून त्यांनी स्वतंत्र राहावयाचे ठरविले. तडजोड झाल्यानंतर वडिलांनी काळजीपूर्वक जतन केलेले एक पाकीट त्यांना मिळाले. ते उघडल्यानंतर त्यात त्यांना दोन अंगठ्या सापडल्या. एका अंगठित मौल्यवान हिरा जडविलेला होता तर दुसरी साधी चांदीची होती._
_मौल्यवान हिऱ्याची अंगठी बघून मोठ्या भावाच्या मनात लोभ निर्माण झाला व तो आपल्या छोट्या भावाला म्हणाला, 'मला वाटते ही अंगठी काही आपल्या वडिलांनी विकत घेतली नसणार, ती आपल्या घरात वडिलोपार्जित, परंपरेने चालत आलेली असावी व म्हणूनच त्यांनी ही त्यांच्या मिळकतीतून बाजूला ठेवली असावी. ज्या अर्थी ती वडिलोपार्जित आहे, त्याअर्थी हीच परंपरा पुढेही चालली पाहिजे व म्हणूनच मी मोठा भाऊ असल्यामुळे ती मीच ठेऊन घेतो. तू आपली चांदीचीच अंगठी घेतलेली बरी.'_
_छोटा भाऊ म्हणाला, 'काही हरकत नाही, तू हिऱ्याच्या अंगठित खूष रहा, मी या चांदीच्या अंगठीवर खूष आहे.' दोघेही आपापल्या अंगठ्या घेऊन निघून गेले._
_छोट्या भावाने मनाशी विचार केला, आपल्या वडिलांनी हिऱ्याची अंगठी जतन करून ठेवली हे योग्य आहे. पण ही साधी चांदीची अंगठी त्यांनी का बरे जपून ठेवली असावी? त्याने त्या अंगठीचे बारकाईने निरीक्षण केल्यावर त्याला असे आढळले की त्यावर *'हे पण बदलणार आहे'*, असे शब्द कोरलेले आहेत. अरे वा! हा आपल्याआ वडिलांचा उपदेश आहे तर! त्याने ती अंगठी आपल्या बोटात घातली._
_दोघा भावांनी आयुष्यातील चढ-उताराशी सामना केला. जेव्हा वसंत ऋतू येई तेव्हा मोठा भाऊ अत्यानंदाने आपल्या मनाचा समतोल घालवून बसत असे. आणि जेव्हा पानगळींचा हिवाळा येई त्यावेळी निराशेमुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडत असे, असह्य ताणामुळे त्याचा रक्तदाब वाढत असे. निद्रानाशामुळे त्याला झोपेची व मानसिक ताण आणि प्रक्षुब्धता कमी करणारी औषधे घ्यावी लागत. सर्वांची परिणती शेवटी त्याला विद्यूत उपचाराचे झटके देण्यात झाली. हा भाऊ हिऱ्याच्या अंगठीचा मालक होता._
_चांदीच्या अंगठीचा मालक असणारा छोटा भाऊ मते वसंत ऋतू असतांना त्यापासून पळून न जाता त्याचा आनंद पूर्णपणे उपभोगीत असे. पण चांदीची अंगठी त्याला आठवण करून देत असे, *'हे पण बदलणार आहे'* आणि तो बदलत असे तेव्हा तो स्मित करून म्हणे, *'खरंच! हे मला माहीतच होते की, 'हे पण बदलणार आहे' आणि ते बदलले, हरकत नाही'.* जेव्हा हिवाळा येई त्यावेळसही परत अंगठिकडे बघून त्याला आठवे, *'हे पण बदलणार आहे.'* तो दुःखी होत नसे, रडत बसत नसे कारण *'हे पण बदलणार आहे'* हे त्याला पक्के माहीत होते आणि खरोखरच ते बदले, निघून जाई._
*_आयुष्यातील सर्व सुख-दुःखे, सर्व प्रकारची स्थित्यंतरे, चढउतार काही कायम टिकणारे नाहीत याची त्या सदैव जाणीव अंगठीवरील उपदेशामुळे होत असे. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा उगम हा नाशासाठी होतो हे त्याला पक्के माहीत होते. त्यामुळेच त्याने कधीही आपल्या मनाचे संतुलन घालवले नाही. त्याने आपले आयुष्य आनंदात व सुखशांतीत घालवले. हाच तो चांदीची अंगठी घेणारा छोटा भाऊ होता._*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ : जगण्याची कला*
*संकलन : महेश कांबळे*
*१८/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment