Monday, 18 October 2021

पाहण्यात मात्र केवळ पाहणे

                    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 

*_पाहण्यात मात्र केवळ पाहणे_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

                 _पूर्वीच्या काळी, ज्याला *'सुप्पारकपट्टनं'* म्हणत, तिच्या आसपास, तिथे घरादाराचा त्याग केलेला एक साधु पुरुष राहत असे. जे जे लोक त्यांच्याकडे जात, ते सर्व त्यांचे भव्य व्यक्तित्व पाहून आदराने त्यांचे पूजन करीत. ते पूर्ण अवस्थेला पोहोचलेले आहेत असा बऱ्याच जणांचा समज होता. आपली अशी ख्याती ऐकून त्यांनाही तसेच वाटू लागले. प्रामाणिक असल्यामुळे कुणीतरी त्यांच्या असे लक्षात आणून दिले की आपण अजून पूर्ण मुक्त झालेले नाहीत तर नीटपणे तपासून बघता अजून अशुद्धतेची काही आवरणे आपल्या मनावर शिल्लक आहेत, नक्कीच जोपर्यंत सगळ्या अशुद्धतेचा संपूर्ण नाश होत नाही, तोपर्यंत आपली गणना संपूर्ण मुक्त अवस्था प्राप्त केलेल्या साधुसंतात-अर्हतांत होणार नाही, हे त्यांनी जाणले. म्हणूनच आपल्या दर्शनाला आलेल्या भक्तांना त्यांनी विचारले, *'आज जगात पूर्णत्वाला पोहचलेला, संपूर्ण मुक्त अवस्था प्राप्त झालेला दुसरा कोणी संत नाही का?'*

            _'होय महाराज! आहे ना!' त्यांनी सांगितले, *'ज्यांना बुद्ध म्हणून संबोधिले जाते असे 'गौतम' नावाचे संन्याशी आहेत. ते 'श्रावस्ती' शहरात राहतात. त्यांची 'सम्यक संबुद्ध' अशी ख्याती आहे. संपूर्ण मुक्त अवस्थेला नेईल असा साधनविधी ते लोकांना शिकवितात.*_

                _'तर मग मला त्या महापुरुषाकडे गेलेच पाहिजे.' असे संन्याशाने ठरविले. आपण बुद्धाकडे जाऊन संपूर्ण मुक्ती मिळविण्याची साधना शिकलीच पाहिजे, तो मार्ग जाणून घेतला पाहिजे, अशा निश्चयाने ते मुंबईहुन निघून मध्यभारत पार करून चालत चालत शेवटी श्रावस्तीला पोहचले. हे गाव नवीन भारतातील उत्तरप्रदेशात आहे. श्रावस्तीला पोहचल्यावर ताबडतोब त्यांनी भगवान बुद्धांचा आश्रम गाठला व ते कोठे भेटू शकतील याचा शोध सुरू केला._

                 _'ते भिक्षाटनाला गेलेले आहेत' एका भिक्षूने सांगितले. 'ते भिक्षेसाठी शहरात गेलेले आहेत, आपण प्रवासातून दमून आलेले दिसता. जरा विश्रांती घ्या. थोड्या वेळात ते परत येतीलच.'_

                  _'नाही, नाही, मी थांबू शकत नाही. मला थांबायला वेळच नाही. ते कोणत्या रस्त्याने गेलेले आहेत, तो मला दाखवा. मी त्यांना तिकडेच भेटतो.'_

               _'हा आपला हट्टच असेल तर सांगतो. ते त्या रस्त्यावर गेलेले आहेत. आपण त्यांचा शोध घेऊ शकता.' थोडाही विलंब न करता त्या संन्याशाने चालण्यास सुरुवात केली व ते शहराच्या मध्यावर आले. तेथे त्यांना घरोघर शिक्षा मागणारा एक भिक्षु दिसला. *त्यांच्या सभोवती अतिशय शांत व समतेचे वातावरण पाहून त्या संन्याशाला हेच 'भगवान बुद्ध' असणार याची खात्री पटली.* रस्त्यावरील एका वाटसरूला विचारून बघितले व त्यांचा अंदाज खरा ठरला. ते गौतम बुद्धच होते._

              _त्या रस्त्यातच संन्याशाने भगवान बुद्धांना गाठले. त्यांना वाकून नमस्कार करून त्यांचे पाय धरले व विनवले, 'महाराज मला असे समजले आहे की, आपण पूर्ण मुक्त आहात, मुक्ती प्राप्त करून देण्याचा मार्गही शिकवता. कृपा करून मला हा साधनविधी शिकवा, तो मार्ग दाखवा.'_

                _भगवान बुद्ध म्हणाले, 'होय मी तो विधी शिकवितो व मी आपणालाही तो विधी शिकवू शकेल. पण त्यासाठी ही जागा योग्य नाही. आपण विहारात जाऊन थांबा मी थोड्याच वेळात परत येतो व आपल्याला हा साधनविधी शिकवितो.'_

                _'नाही महाराज मी थांबू शकत नाही.'_

                _'काय, अर्धा तास देखील नाही?'_

          _'नाही महाराज! अर्धा ताससुद्धा नाही. कोणास ठाऊक, कदाचित तोपर्यंत मी मरेनदेखील. कदाचित अर्ध्या तासात आपणदेखील राहणार नाही. अर्ध्या तासात कदाचित माझा तुमच्यावर असलेला विश्वासदेखील नाहीसा होईल व आपल्यापासून हा विधी शिकता येणार नाही. म्हणूनच महाराज आता हीच वेळ त्याच्यासाठी योग्य आहे. कृपया मला तो साधनविधी शिकवाल ना?'_

             _भगवान बुद्धांनी संन्याशाकडे बघितले व बोधिचित्ताने जाणले, 'होय! ह्या संन्याशाला खरेच फार थोडा अवधी शिल्लक आहे. काही मिनिटातच ह्याचा देहांत होणार आहे. याला हिते व आत्ताच धर्माची शिकवण दिली पाहिजे.' पण धर्माची शिकवण अशी रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून कशी देणार? *ते फक्त थोडेच शब्द बोलले. पण त्या शब्दांमध्ये धर्माचा सारा सार ओतलेला होता.*_

                _*'तुमच्या बघण्याच्या क्रियेत केवळ बघणेच हवे. तुमच्या ऐकण्यात ऐकण्याखेरीज काहीच नसावे. तुमच्या वास घेण्यात, चव घेण्यात वा स्पर्शात देखील फक्त वास घेणे, चव घेणे आणि स्पर्श करणेच असावे, याखेरीज काहीच नसावे. तुमच्या जाणण्यात जाणण्याखेरीज काहीच नसावे. सहा ज्ञानेंद्रियांच्या क्षेत्रात घडणाऱ्या स्पर्शाद्वारा होणाऱ्या अनुभवांचे मूल्यांकन करू नका. पूर्वग्रहावर आधारित आकलन नको. एकदा का संज्ञेने चांगले, वाईट असे अनुभवाचे मूल्यांकन करायला सुरुवात केली की, स्वतःच्या अंध प्रतिक्रियांमुळे आपल्या भोवतीचे सर्व जग आपल्याला विकृतच दिसते. सर्व प्रकारच्या पूर्व संस्कारांच्या पगड्यातून जर मनाला मुक्त करावयाचे असेल तर आपण पूर्व प्रतिक्रियांच्या आधारे होणारे मूल्यांकन थांबविण्यास शिकलेच पाहिजे व घटनांचे मूल्यांकन वा प्रतिक्रिया न करता फक्त सजगता ठेवली पाहिजे.'*_

             _संन्याशाचे मन इतके शुद्ध होते की, या थोड्याश्या शब्दांचा उपदेशही त्याला पूरेसा ठरला. त्या रस्त्याच्या बाजूला बसून त्याने डोळे बंद करून आपल्या आतील सत्याचे, घडणाऱ्या बदलांचे मूल्यांकन-विरहित, प्रतिक्रिया-विरहित केवळ तटस्थ निरीक्षण सुरू केले आणि आपल्या आयुष्याची शेवटची काही मिनिटे राहिली असताना आपले अंतिम ध्येय, दुःखमुक्ती गाठली व ते अर्हंत झाले._

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ : जगण्याची कला*

*संकलन : महेश कांबळे*

*१९/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


No comments:

Post a Comment

Medicinal Herbs and drugs

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Medicinal Herbs and drugs_* *_भेसज्जमुआदीनी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/medicinal-herbs-and-drugs...