Saturday, 16 October 2021

दुधाची खीर - पांढरी म्हणजे? मऊ की वाकडी?

                  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 

*_दुधाची खीर - पांढरी म्हणजे? मऊ की वाकडी?_*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

                   _एका शहरात दोन अतिशय गरीब मुले राहत होती. त्यापैकी एक जन्मापासून आंधळा होता. दुसरा नेहमी त्याला मदत करीत असे. दोघेही शहरात व आसपासच्या भागात दारोदारी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असत. भिक्षा मागण्यासाठी ते दोघेही बरोबरच हिंडत असत._

                    _एके दिवशी तो आंधळा मुलगा आजारी पडला. दुसरा मुलगा त्याला म्हणाला, 'आज तू इथेच थांब व विश्रांती घे, मी एकटाच गावात जाऊन भिक्षा मागून आणतो. त्यातून तू पण घे.' आणि तो भिक्षेसाठी गावात गेला._

                 _त्या दिवशी त्याला एका ठिकाणी दुधापासून केलेली खीर मिळाली. त्याने त्यापूर्वी अशी स्वादिष्ट खीर कधीच खाल्लेली नव्हती. त्यामुळे त्याने ती आनंदाने व आवडीने खाल्ली. दुर्दैवाने त्याच्याजवळ भांडे नसल्यामुळे त्याला खीर तेथेच खाऊन संपवावी लागली. आपल्या मित्रासाठी  घरी आणता आली नाही._

            _आपल्या अंध साथीदाराकडे आल्यावर तो त्याला म्हणाला, 'मित्रा आज मला फारच छान दुधाची खीर मिळाली होती, पण दुर्दैवाने माझ्याजवळ भांडे नसल्यामुळे ती मी तुझ्यासाठी आणू शकलो नाही. मला फार वाईट वाटले रे!'_

               _अंध मुलाने त्याला विचारले, 'असू दे रे! पण दुधाची खीर म्हणजे काय आणि ती कशी असते ते तर सांग!'_

               _'अरे दूध पांढरे असते ना? तशीच खीर पण पांढरी असते.'_

              _जन्मापासून अंध असल्यामुळे त्या अंध मुलाला पांढरी म्हणजे कशी ती काही कळले नाही. त्याने विचारले, 'पांढरी म्हणजे कशी रे?'_

                 _ऑं! पांढरी म्हणजे तुला माहीत नाही?'_

                _'नाही रे! मला माहित नाही, तू सांग ना!'_

                _'अरे! पांढरी म्हणजे काळ्याच्या विरुद्ध.'

            _'अस्स होय? पण काळे म्हणजे काय?'

             _'अरे! जरा समजण्याचा प्रयत्न कर!' पण त्या अंधास काहीच समजले नाही. मित्राने त्याला समजाविण्याच्या प्रयत्नात थोडे इकडे तिकडे बघितले, तेव्हा त्याला एक बगळा दिसला. त्याने त्या बगळ्याला पकडून त्यास आपल्या मित्राकडे आणले व तो त्याला म्हणाला, 'हे बघ! पांढरे म्हणजे या पक्ष्यासारखे!'_

               _डोळे नसल्यामुळे त्या अंध मुलाने बगळ्याला जवळ घेऊन चाचपले व तो म्हणाला, 'हो! हो! मला आत्ता कळले, पांढरे म्हणजे काय ते! पांढरे म्हणजे मुलायम! मऊ मऊ!'_

               _'नाही, नाही! पांढरे म्हणजे मऊ नाही. पांढरे असण्याचा मऊपणाशी काहीही संबंध नाही. पांढरे म्हणजे पांढरे! अरे, जरा समजाऊन घेण्याचा तर प्रयत्न कर!'_

                  _'अरे, पण तू तर मला सांगितलेस की, पांढरे म्हणजे या बगळ्यासारखे म्हणून! मी त्या पक्ष्याला हात लावून बघितला, तेव्हा तो तर मला मऊ वाटला! म्हणजे दुधाची खीर मऊ नाही का? पांढरे म्हणजे मऊच!'_

                _'नाही बाबा! तुला समजले नाही. परत प्रयत्न कर.'_

              _अंध मुलाने पुन्हा एकदा बगळ्याला हातात घेतले व त्याच्या चोचीपासून शेपटीपर्यंत त्याने पुन्हा हात फिरवला. त्याचे सारे शरीर स्पर्श करून पाहिले. चोचीच्या टोकापासून तर शेपटीपर्यंत चाचपडून झाल्यावर तो अंध मुलगा म्हणाला, 'अरे हो! आता मला समजले! पांढरे म्हणजे असे वाकडे! दुधाची खीर अशी वाकडी असते तर!'_

              _अंधाला पांढरे म्हणजे काय हे समजणे अशक्यच आहे. कारण पांढरे म्हणजे काय याचा त्याला अनुभव कसा येणार? पांढरे म्हणजे काय हे समजण्याची क्षमताच त्याच्याजवळ नाही. *आपणालाही खरे सत्य म्हणजे काय हे जाणण्याची क्षमताच जर नसेल, तर त्याची प्रचिती कशी येणार? म्हणूनच ती क्षमता विकसित होईपर्यंत ते आपल्याला पांढऱ्या बगळ्यासारखेच वाकडेच वाटणार!*_

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*संदर्भ : जगण्याची कला*

*संकलन : महेश कांबळे*

*१७/१०/२०२१*

https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


No comments:

Post a Comment

Medicinal Herbs and drugs

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺💐 *_Medicinal Herbs and drugs_* *_भेसज्जमुआदीनी_* https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/medicinal-herbs-and-drugs...