🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
बीज व फळ
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*_जसे कारण तसा परिणाम, जसे बीज तसेच फळ! जशी करणी तशी भरणी_*
_शेतकरी आपल्या एकाच शेतात दोन बिया पेरतो, झाडे लावतो. एक उसाचे असते, तर दुसरे कडुनिंबाचे. त्या दोघांकरिता एकच माती असते. तेच पाणी, तोच सूर्यप्रकाश, तीच हवा. इतकेच काय पण निसर्ग यांना सारखेच भरण - पोषणाचे द्रव्य देतो. दोघा छोट्या रोपट्यांचा वृक्ष विकास होऊ लागतो. पण निंबाच्या झाडाचे होते काय? त्याच्या कणाकणात कटुता भरलेली आढळते. याउलट ऊसाचा तंतू न् तंतू गोडव्यांनी भरून जातो. मग निसर्ग एकाशी असा कृपाळू तर दुसऱ्याशी असा क्रूर का वागतो?_
_नाही! नाही! निसर्ग असा कनवाळू नाही किंवा दुष्टही नाही. तो आपल्याला नेमून दिलेल्या ठराविक नियमांप्रमाणेच वागतो. निसर्ग हा फक्त बियांमध्ये अगोदरच असलेल्या गुणांना अभिव्यक्त होण्यास सहाय्यक ठरतो. निसर्गाचे भरणपोषण हे बियांमधील सुप्त गुणांना फक्त बाहेर पडण्यास, प्रगट होण्यास मदत करते. उसाच्या बिजात गोडवाच गोडवा असतो, त्यामुळे त्याच्या झाडाला पण गोडवा येतो, तर कडुनिंबाच्या बिजातील कटुताच कटुता वृक्षाच्या रूपात अभिव्यक्त होते. म्हणजेच, *जसे बीज त्या प्रमाणेच त्याचे फळ!*_
_जर एखादा शेतकरी या कडुनिंबाच्या झाडाजवळ गेला, त्याला तीन वेळा वाकून नमस्कार केला, १०८ प्रदक्षिणा घातल्या, त्याला धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून प्रार्थना केली, "हे कडुनिंब देवा, मला मधुर आंबे हवे आहेत, कृपया मला गोड गोड आंबे दे". बिचारा कडुनिंब काय करणार? तो त्याला गोड आंबे कोठून देणार? त्याच्याजवळ ही शक्ती नाही. तो गोड आंबे देऊच शकणार नाही. जर कोणाला गोड आंबे हवे असतील तर त्याने कडुनिंबाचे बी पेरून उपयोग नाही, तर आंब्याचेच बी पेरले पाहिजे. तसे केल्यास त्याला रडण्याची, कुणाकडेही भीक मागण्याची किंवा मदत मागण्याची गरज नाही. त्याला मिळणारे फळ हे गोड आंब्याखेरीज दुसरे काहीच असू शकणार नाही. कारण, *जसे बीज तसेच त्याचे फळ.*_
*_आपली अडचण, आपले अज्ञान हे आहे की, पेरतांना आपण गाफील असतो, बेसावध असतो. आपण पेरतांना कडुनिंबाचे बी पेरतो, पण जेव्हा फळे चाखावयाची वेळ येते तेव्हा आपण खडबडून जागे होतो व अपेक्षा करतो की, आपल्याला सुमधुर आंब्याचे फळ हवे आणि त्यासाठी रडू लागतो. प्रार्थना करू लागतो. आशा धरून बसतो. पण कडुनिंबाचे बी लावल्यावर त्याला फळ मात्र आंब्याचेच यावे असे जगात कधीच घडत नाही. कडुनिंबाला आंब्याचे फळ कधीच येणार नाही. आंब्याचे मधुर फळ हवेय ना? मग आंब्याचेच बी पेरा. आंब्याचेच रोप लावा._*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*संदर्भ : जगण्याची कला*
*संकलन : महेश कांबळे*
*१२/१०/२०२१*
https://mikamblemahesh.blogspot.com/?m=1
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments:
Post a Comment