🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🪷 *_महापरिनिब्बान (महापरिनिर्वाण) की महाप्रयाण?.... एक संशोधनात्मक स्पष्टीकरण_* 🪷
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/12/blog-post_4.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
६ डिसेंबर १९५६ रोजी जेव्हा बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला देह त्याग केला, आंबेडकरी बौद्ध अनुयायी या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे सम्बोधन करते, जे की बौद्ध साहित्याच्या दृष्टीने अयोग्य आहे. बाबासाहेबांच्या प्रति असलेल्या अती श्रद्धायुक्त चित्ताने बौद्ध जनता हे करते, कारण पाली भाषा व साहित्याचा अभ्यास त्यांचा नाही हे त्यातून स्पष्ट होते... जी एक शोकांतिका आहे. ज्या महामानवाने आपली तब्येत साथ देत नसतानाही आपल्या पुढील पिढीने पाली भाषेचा अभ्यास करावा यासाठी एक व्याकरणावर आणि भाषांतरवार आधारित एक ग्रंथ लिहिला जो बहुतांश जणांना आजही माहित नाही अशा अनुयायांकडून तरी आपण काय अपेक्षा धरणार?... असो.
*_सत्य हे आहे की, महापरिनिर्वाण हा शब्द प्रयोग बोधिसत्त्वांकरिता वापरला जात नाही._*
"या दिवसाला महापरिनिर्वाण दिन का म्हणू नये?" या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे शब्दांचे योग्य अर्थ आणि बौद्ध परंपरेच्या आणि साहित्याच्या आधारावर दिले आहे.
*_१. बोधिसत्व (बोधिसत्त) म्हणजे काय?_*
सर्वांत प्रथम बोधिसत्व म्हणजे काय हे समजून घेऊया. याचे पालि उच्चारण बोधिसत्त असे होते. ज्याची फोड बोधि + सत्त अशी होते.
▪️ *_बोधि म्हणजे काय?_*
बोधि म्हणजे ज्ञान. ते ज्ञान म्हणजे:
*_दुक्ख अरिय सच्च, दुक्ख समुदय अरिय सच्च, दुक्ख निरोध अरिय सच्च आणि दुक्ख निरोधगामिनीपटिपदा अरिय सच्च ... अर्थात चार आर्यसत्यांचे ज्ञान, पटिच्च समुत्पाद, सततिंस (३७) बोधि पक्खिय धम्म यांचे ज्ञान, आणि निब्बानाचा साक्षात्कार म्हणजे बोधि होय._*
▪️ *सत्त (सत्व) म्हणजे काय?*
सत्व म्हणजे जीव, प्राणी (मनुष्य, देवता किंवा पशु). बौद्ध परंपरेनुसार ३१ लोक (भवचक्र) आहेत, जे कामावचार, रूपावचार आणि अरुपावचार या तीन विभागात विभागलेले आहेत. जोपर्यंत एखादा सत्व निब्बान प्राप्त करत नाही, तोपर्यंत त्याला या भवचक्रात वारंवार पुनर्जन्म घ्यावा लागतो.
▪️ *बोधिसत्त (बोधिसत्व):*
अशा भवचक्रातून जेव्हा एखाद्या सत्त्वात प्रज्ञा जागते आणि त्याला हा संसार निरर्थक वाटतो, तेव्हा तो निब्बानाचा शोध घेण्यास सुरुवात करतो. जो त्या बोधि आणि निब्बानाला शोधण्यास सुरुवात करतो, असा प्रज्ञावान सत्व म्हणजे बोधिसत्व होय.
👉 _म्हणून *बुद्धवंसामध्ये* म्हटले आहे-_
*रहोगतो निसीदित्वा, एवं चिन्तेसहं तदा।*
*“दुक्खो पुनब्भवो नाम, सरीरस्स च भेदनं॥*
*“जातिधम्मो जराधम्मो, ब्याधिधम्मो सहं तदा।*
*अजरं अमतं खेमं, परियेसिस्सामि निब्बुतिं॥*
*“यंनूनिमं पूतिकायं, नानाकुणपपूरितं।*
*छड्डयित्वान गच्छेय्यं, अनपेक्खो अनत्थिको॥*
*“अत्थि हेहिति सो मग्गो, न सो सक्का न हेतुये।*
*परियेसिस्सामि तं मग्गं, भवतो परिमुत्तिया॥*
अर्थ:
_तेव्हा एकांतामध्ये बसून विचार केला कि, शरीर त्याग आणि अवागामन (पुनर्जन्म) दोन्ही दुक्ख दायक आहे._
_जन्म धर्म, जरा धर्माने युक्त आहे. या पासून वेगळे अमर आणि (शांत) स्वरूपाच्या निर्वाणाला शोधावे._
_अवश्य मला या विविध प्रकारच्या दुरगन्ध युक्त, अपवित्र शरीराला सोडून ममता रहित होऊन जावे लागेल._
_जो (निब्बानाचा) मार्ग आहे, तो असणारच! तो नसणार असे होणे अशक्य आहे. संसारातून मुक्त होण्या करिता मी त्या (निर्वाण= निब्बान) मार्गाला शोधणार._
बोधिसत्त्व बुद्ध बनण्याच्या दिशेने प्रगतशील असतो. या मार्गावर असताना तो आपल्या जन्मो-जन्मात १० पारमिता (दान, सील, नेक्खम, पञ्ञा, विरिय, खन्ति, सच्च, अधिट्ठान, मेत्ता, उपेक्खा) तीन प्रकारात परिपूर्ण करतो:
▪️ *पारमिता:* अंग प्रत्यंगाचे परित्याग.
▪️ *उपपारमिता:* विविध वस्तूंचे दान.
▪️ *परमत्थ पारमिता:* प्राणाचे बलिदान.
थोडक्यात, बोधिसत्त्व हे परिपूर्ण राग, दोस, मोह विकारांना नष्ट केलेले नसतात. ते बुद्ध बनण्याच्या प्रयत्नात असतात आणि दरम्यान ते आपल्या विकारांना नष्ट करण्याच्या प्रयत्नात असतात, म्हणून त्यांचा मृत्यू म्हणजे महापरिनिब्बान होऊ शकत नाही.
*_२. क्लेश आणि पुनर्जन्म_*
पाली साहित्यानुसार, जोपर्यंत सत्व राग, दोस, मोह विकारांना नष्ट करत नाही (क्लेशयुक्त असतो), तोपर्यंत त्याला ३१ लोकांच्या भवचक्रातून जावेच लागते.
▪️ *मिलिंद पञ्ह:*
*_जसे की मिलिन्द पञ्ह या ग्रंथात म्हटले आहे-_*
*राजा आह “भन्ते नागसेन, अत्थि कोचि मतो न पटिसन्दहती”ति।*
राजा म्हणाला- "भन्ते नागसेन, असे कोणी आहे का ज्याची प्रतिसंधी ( जन्म) होणार नाही?"
*थेर आह “कोचि पटिसन्दहति, कोचि न पटिसन्दहती”ति।*
थेर म्हणाले- काहींची प्रतिसंधी ( पुनर्जन्म) होईल, काहींची प्रतिसंधि होणारवनाही.
*“को पटिसन्दहति, को न पटिसन्दहती”ति?*
कोण प्रतिसंधी पावेल, कोण प्रतिसंधी नाही पावणार.
*“सकिलेसो, महाराज, पटिसन्दहति, निक्किलेसो न पटिसन्दहती”ति।*
महाराज, क्लेश युक्ताची प्रतिसंधी होईल, क्लेश नसणाऱ्याची प्रतिसंधी होणार नाही.
*“त्वं पन, भन्ते नागसेन, पटिसन्दहिस्ससी”ति?*
भन्ते नागसेन, तुमची देखील प्रतिसंधी (पुनर्जन्म)(भविष्यात) होईल का?
*“सचे, महाराज, सउपादानो भविस्सामि पटिसन्दहिस्सामि, सचे अनुपादानो भविस्सामि न पटिसन्दहिस्सामी”ति।*
महाराज, जर उपादान (_राग, दोस, मोह_) युक्त असेल तर प्रतिसंधि होईल, उपदान रहित असेल तर प्रतिसंधि होणार नाही.
*“कल्लोसि, भन्ते नागसेना”ति।*
फार छान! भन्ते नागसेन
_*जो पर्यंत राग, दोस, मोह यांना नष्ट करित नाही व निब्बान प्राप्त करित नाही तो पर्यंत या भव चक्रात किंवा संसार चक्रात (३१ लोकात) वारंवार जन्म मृत्यु आणि पुनर्जन्म व पुन्हा मृत्युच्या चक्रातून जावेच लागते.*_
_*आता उपप्रश्न असा निर्माण होतो की पुनर्जन्म आहे का? आणि तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मान्य केला आहे का?*_
या प्रश्नाचे उत्तर आहे _*होय!*_ असे आहे.
याचा पहिला पुरावा त्यांच्या महान लेखनीत त्यांचा शेवटचा ग्रंथ - भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यात मिळतो.
*१. बुद्धांचा पुनर्जन्मावर विश्वास होता का?*
*२. उत्तर होकारार्थी आहे.*
(पान क्र: ३३०- भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म)
दुसरा पुरावा त्यांच्या भाषणामध्ये मिळतो-
*"माझा पुनर्जन्मावर पूर्ण विश्वास आहे. मी ते वैज्ञानिकांना सिद्ध करून दाखवू शकतो कि, पुनर्जन्म तर्कसंगत आहे. माझ्या मते मूळधातू बदलतात, मनुष्य नाही."*
_डॉ बाबासाहेब आंबेडकर
(५ फेब्रुवारी १९५६ रोजी महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध विहार येथे झालेल्या सभेत दिलेले भाषण)
*दीघनिकायमध्ये महानिदान सुत्तामध्ये* म्हटले आहे की-
*एतस्स, आनन्द, धम्मस्स अननुबोधा अप्पटिवेधा एवमयं पजा तन्ताकुलकजाता कुलगण्ठिकजाता मुञ्जपब्बजभूता अपायं दुग्गतिं विनिपातं संसारं नातिवत्तति||*
अर्थ: आनंद, याचमुळे (या) धम्माला योग्य प्रकारे न अनुबोध केल्या मुळे, योग्य प्रकारे न पटिवेध (जाणल्या) केल्या मुळे ही प्रजा गुंतागुंतीच्या गाठी सम, धाग्याच्या गाठी सम, गुंफलेल्या झाडी सम आहे. अपाय, (नर्क) दुर्गतिला, विनिपाताला, संसाराला पार करित नाही.
*_३. निब्बान, परिनिब्बान आणि महापरिनिब्बान_*
या तीन शब्दांमधील फरक पालि साहित्याच्या आधारावर समजून घेणे आवश्यक आहे.
▪️ *_अ. निब्बान (निर्वाण)_*
👉 *संयुत्तनिकायमध्ये निब्बानपञ्ह सुत्तामध्ये असे म्हटले आहे.*
*“‘निब्बानं, निब्बान’न्ति, आवुसो सारिपुत्त, वुच्चति।*
आवुस सारिपुत्त, (तुम्ही) जे निब्बान, निब्बान म्हणता.
*कतमं नु खो, आवुसो, निब्बान”न्ति?*
आवुस, ते निब्बान काय आहे?
*“यो खो, आवुसो, रागक्खयो दोसक्खयो मोहक्खयो – इदं वुच्चति निब्बान”न्ति।*
आवुस, इथे जो रागक्षय, दोषक्षय, मोहक्षय आहे- याला निब्बान म्हणतात.
*“अत्थि पनावुसो, मग्गो अत्थि पटिपदा एतस्स निब्बानस्स सच्छिकिरियाया”ति?*
पण, आवुस निब्बानाला जाण्याचा किंवा साक्षात्कार करण्याचा मार्ग आहे का?
*“अत्थि खो, आवुसो, मग्गो अत्थि पटिपदा एतस्स निब्बानस्स सच्छिकिरियाया”ति।*
आवुस, आहे निब्बानाला ज्याण्याचा आणि साक्षात्कार करण्याचा मार्ग आहे.
*“कतमो पनावुसो, मग्गो कतमा पटिपदा एतस्स निब्बानस्स सच्छिकिरियाया”ति?*
पण आवुस, निब्बानाला जाण्याचा किंवा साक्षात्कार करण्याचा कोणता मार्ग आहे.?
*“अयमेव खो, आवुसो, अरियो अट्ठङ्गिको मग्गो एतस्स निब्बानस्स सच्छिकिरियाय,*
आवुस, एकमेव, आर्य आष्टांगिक मार्ग आहे जो निब्बानाला जाण्याचा किंवा साक्षात्कार करण्याचा मार्ग आहे.
*सेय्यथिदं –*
१. सम्मादिट्ठि
२. सम्मासङ्कप्पो
३. सम्मावाचा
४. सम्माकम्मन्तो
५. सम्माआजीवो
६. सम्मावायामो
७. सम्मासति
८. सम्मासमाधि।
तो अश्या प्रकारे-
सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधि.
*अयं खो, आवुसो, मग्गो अयं पटिपदा एतस्स निब्बानस्स सच्छिकिरियाया”ति।*
आवुस, एकमेव मार्ग आहे जो निब्बानाला जाण्याचा आणि साक्षात्कार करण्याचा आहे.
*_डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आपल्या पुस्तकात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधे निब्बानाची हिच व्याख्या दिलेली आहे._*
( पहा इंग्रजी ग्रंथ पान क्र: २३३ ते २३८ - ओळ क्र: ६७ पाहा)
*_निसंदेह राग, दोस, मोहाला नष्ट करणे म्हणजे निब्बान होय. म्हणून धम्मपदा मध्ये म्हटले आहे._*
*निब्बानं परम सुखं*
निब्बान परम (उच्चतर) सुख आहे.
*निब्बान धातु चे दोन प्रकार:*
*सउपादिसेसा निब्बानधातु?*
*_इध, भिक्खवे, भिक्खु अरहं होति खीणासवो वुसितवा कतकरणीयो ओहितभारो अनुप्पत्तसदत्थो परिक्खीणभवसंयोजनो सम्मदञ्ञा विमुत्तो। तस्स तिट्ठन्तेव पञ्चिन्द्रियानि येसं अविघातत्ता मनापामनापं पच्चनुभोति, सुखदुक्खं पटिसंवेदेति। तस्स यो रागक्खयो, दोसक्खयो, मोहक्खयो – अयं वुच्चति, भिक्खवे, सउपादिसेसा निब्बानधातु।_*
येथे एक भिक्खू एक अरहंत आहे, ज्याचे कलंक नष्ट झाले आहेत, पवित्र जीवन पूर्ण झाले आहे, ज्याने जे करायचे होते ते केले आहे, भार ( संपवून) टाकले आहे, ध्येय गाठले आहे, अस्तित्वाचे बंधन नष्ट केले आहे, अंतिम ज्ञानाद्वारे पूर्णपणे मुक्त झाले आहे. तथापि, त्याची पाच ज्ञानेंद्रिये अविघटित राहतात, ज्याद्वारे तो अजूनही सहमत आणि असहमत सुखद आणि दुक्खद वेदना अनुभवतो. त्याच्यातील राग, दोस आणि मोह यांचा नाश होणे *यालाच सउपदिसेस ( सउपादिशेष) निब्बान धातु* म्हणतात.
*अनुपादिसेसा निब्बानधातु?*
*_“कतमा च, भिक्खवे, अनुपादिसेसा निब्बानधातु? इध, भिक्खवे, भिक्खु अरहं होति खीणासवो वुसितवा कतकरणीयो ओहितभारो अनुप्पत्तसदत्थो परिक्खीणभवसंयोजनो सम्मदञ्ञा विमुत्तो। तस्स इधेव, भिक्खवे, सब्बवेदयितानि अनभिनन्दितानि सीति भविस्सन्ति । अयं वुच्चति, भिक्खवे, अनुपादिसेसा निब्बानधातु। इमा खो, भिक्खवे, द्वे निब्बानधातुयो”ति। एतमत्थं भगवा अवोच।_*
येथे एक भिक्खू एक अरहंत आहे, ज्याचे कलंक नष्ट झाले आहेत, पवित्र जीवन पूर्ण झाले आहे, ज्याने जे करायचे होते ते केले आहे, भार ( संपवून) टाकले आहे, ध्येय गाठले आहे, अस्तित्वाचे बंधन नष्ट केले आहे, अंतिम ज्ञानाद्वारे पूर्णपणे मुक्त झाले आहे. जे काही भाव (भावना) आहे. आनंद न करता, शांत होतात. यालाच, *अनुपादिसेसा निब्बानधातु* म्हणतात.
म्हणून *महापरिनिब्बान सुत्ता* मध्ये म्हटले आहे-
*“अनिच्चा वत सङ्खारा, उप्पादवयधम्मिनो। उप्पज्जित्वा निरुज्झन्ति, तेसं वूपसमो सुखो”ति॥*
निश्चितच संस्कार अनित्य आहेत, उत्पन्न व व्यय स्वभावाचे आहे, उत्पन्न होऊन नष्ट होतात, त्यांचे शांत होणे सुखकारक आहे.
▪️ *_ब. परिनिब्बान (परिनिर्वाण)_*
👉 हा शब्द प्रामुख्याने अरहंत (अरिय सावक) यांच्या देह त्यागासाठी वापरला जातो.
👉 _परिनिब्बान याचा अर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपला ग्रंथ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यात देतात की-_
_*उदानात म्हटल्याप्रमाणे:* “परिनिब्बान तेव्हा होते जेव्हा शरीराचे विघटन होते, सर्व संज्ञा थांबलेल्या होतात, सर्व संवेदना नष्ट होतात, क्रियाकलाप थांबतात आणि चेतना निघून जाते. अशा प्रकारे पूर्ण नामशेष परिनिब्बानाचा अर्थ होतो"_
*यालाच वरती दिलेल्या प्रमाणे _अनुपादिसेसा निब्बान_ म्हणतात.*
*_निब्बान हे वेगळे असून परिनिब्बान हे वेगळे आहे._*
_ (वरील सउपदिसेस आणि अनुपादिसेस निब्बान पहावे)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी खंड १६ पान नंबर २६८–२६९ मध्ये परिनिब्बान या शब्दांचा अर्थ दिला आहे तो आपण पाहूया...
१. परिनिब्बानं : Attainment of Nirvana, extinction: annihilation (परिनिर्वाण)
२. परिनिब्बानिको (adj): Tending or conducive to Nirvana
३. परिनिब्बापेति : To cause to attain Nirvana
४. परिनिब्बाति, : To be extinguished; to attain Nirvana or the extinction of being; to attain arhatship (परि + निर्वा)
५. परिनिब्बायी (adj): One who attains Nirvana or the extinction of being (परि + निर्वा + इन्)
६. परिनिब्बुतो : Extinghished, extinct: Having attained Nirvana or annihilation of being, dead (परि + निर्वृत)
वरील सर्व शब्दांमध्ये परिनिब्बान (परिनिर्वाण) या शब्दाचा अर्थ अरहंत व्यक्तीच्या जीवन-प्रवासाचा अंतिम टप्पा असा होतो.
सउपादिसेसा निब्बान (सउपादिशेष निर्वाण): क्लेश (राग, द्वेष, मोह) विझले आहेत, पण शरीर (उपादी) अजून बाकी आहे. (यासाठी परिनिब्बुतो हा शब्द वापरतात.)
अनुपादिसेसा निब्बान (अनुपादिशेष निर्वाण): क्लेश आणि शरीर दोन्ही विझले आहेत. या अवस्थेलाच परिनिब्बान म्हणतात.
साध्या भाषेत: या शब्दांचा उपयोग अरहंत (जे बुद्ध नाहीत) त्यांच्या दुःखाच्या अंतासाठी केला जातो.
या सर्व शब्दांत “परि” म्हणजे पूर्ण, सर्वांगिणरीत्या आणि “निब्बान/निर्वा” म्हणजे निर्वाण-अंत-शमन असा भाव आहे.
त्यामुळे या शब्दांचा केंद्रबिंदू:
👉 तृष्णा-क्लेश-उपादानांचा अंत → पुनर्जन्माचा अंत → निर्वाणपूर्णता.
*_क. महापरिनिब्बान (महापरिनिर्वाण)_*
👉 *_सम्यक सम्बुद्ध, तथागत जेव्हा देह त्याग करतात त्यास महापरिनिब्बान म्हणतात._*
या बद्दल *महापरिनिब्बान सुत्तामधे* आयु. अनुरुद्ध म्हणतात-
*“असल्लीनेन चित्तेन, वेदनं अज्झवासयि।पज्जोतस्सेव निब्बानं, विमोक्खो चेतसो अहू”ति॥*
त्या स्थिरचित्त असलेल्या तथागतांचा आता श्वास - प्रश्वास राहिलेला नाही. शांतीच्या प्रांती करिता तृष्णारहित तथागत मुनीने काळाला पार केलेले आहे.
म्हणून तथागत म्हणतात-
*तथागतस्स ये आसवा संकिलेसिका पोनोब्भविका सदरा दुक्खविपाका आयतिं जातिजरामरणिया – ते पहीना उच्छिन्नमूला तालावत्थुकता अनभावंकता आयतिं अनुप्पादधम्माति।*
तथागतांचे अश्राव क्षीण झालेत, अभावप्राप्त झालेत, भविष्यात न उत्पन्न होणारे झालेत, जे अश्राव मलयुक्त, पुनर्भवकारक, दुखविपाक देणारे, भविष्यात जरा मरण देणारे (नष्ट झालेत). जसे पापी! डोके कापलेल्या ताडाचे वृक्ष पुन्हा वाढणे अशक्य आहे; अश्याच प्रकारे तथागतांचे अश्राव क्षीण झालेत, अभावप्राप्त झालेत, भविष्यात न उत्पन्न होणारे झालेत, जे अश्राव मलयुक्त, पुनर्भवकारक, दुखविपाक देणारे, भविष्यात जरा मरण देणारे (नष्ट झालेत).
त्यामुळे आपण असे जाणले पाहिजे की:
👉 *_निब्बान म्हणजे आश्रवांचा क्षय करणे होय. त्यांना नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे अट्ठाङ्गिक मग्ग आहे._*
👉 *_परिनिब्बान हे अरिय सावकांचे होते. हे सउपादिसेस आणि अनुपादिसेस निब्बान यावरून कळते._*
👉 *_महापरिनिब्बान हे तथागतांचे होते हे महापरिनिब्बान सुत्त वाचल्यावर कळते._*
*_म्हणून बोधिसत्ता साठी महापरिनिब्बान हा शब्द प्रयोग करणे कितपत योग्य आहे हे आपण जाणावे...... !_*
*निष्कर्ष:* महापरिनिब्बान हा शब्द बोधिसत्त्वासाठी वापरणे, बुद्धांच्या श्रेष्ठ पदाचा आणि बाबासाहेबांच्या बोधिसत्त्व पदाचा अवमान करण्यासारखे आहे.
*_४. बोधिसत्त्वासाठी योग्य शब्द: महाप्रयाण_*
पाली साहित्यात, विशेषत: जातक अट्ठकथा वाचल्यास, भगवान बुद्ध बोधिसत्त्वाच्या देह त्यागाला 'महापरिनिब्बान' संबोधित करत नाहीत. तेथे *चुति, कालकिरिया किंवा यथाकम्मं गतो (कर्मानुसार गेले) असे शब्द वापरले आहेत.*
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असणाऱ्या अनंत श्रद्धेमुळे, त्यांच्या देहत्यागाला साधारण 'मृत्यू' किंवा 'कालकिरिया' असे शब्द वापरणे आंबेडकरी जनतेला रुचणार नाही.
महाप्रयाण (The Great Journey) हा शब्दप्रयोग बोधिसत्त्वाच्या स्थितीला अत्यंत साजेसा आहे:
▪️ _प्रयाण म्हणजे 'लांबची यात्रा' किंवा 'प्रवास'._
▪️ _महा म्हणजे 'महान', ज्यांच्या गुणांची गिनती शब्दात करता येत नाही._
▪️ *_महाप्रयाण म्हणजे त्या महान व्यक्तीने इहलोकांतून प्रयाण केले (निघून गेले), परंतु बोधिसत्त्व असल्यामुळे त्यांचा कधी ना कधी या संसारात (दुसऱ्या रूपात) पुन्हा जन्म होणारच आहे. ते पुनर्जन्म करुणेने स्वीकारतात._*
बोधिसत्त्वांच्या देहत्यागाला महाप्रयाण असे संबोधणे, त्यांच्या बुद्धत्व प्राप्त करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या महान प्रवासाचा आणि त्यांच्या स्थितीचा सन्मान करणे आहे.
🗣️ *महाप्रयाण शब्दाला अनेक पूज्य भिक्खूंनी हा शब्द उचित असल्याचे अनुमोदन दिले आहे:*
▪️ *पूज्य य. आनंद महाथेर (श्रीलंका):* त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "बाबासाहेब को महाप्रयाण शब्द है, बाबासाहेब का सन्मान है", कारण बाबासाहेब अरहंत नव्हते, तर भावी बुद्ध (बोधिसत्त्व) होते. त्यांनी भदंत आनंद कौसल्यायन यांनी 'महापरिनिर्वाण'ला संमती दिल्याचा दावाही चुकीचा ठरवला.
▪️ *पूज्य प्रज्ञानंद भंतेजी:* दीक्षाभूमी सोहळ्याला उपस्थित असलेल्या भंतेजींनी अनुमोदन दिले, "हो म्हणे, हिंदीमध्ये हा बाबासाहेब महाप्रयाण युज करणं योग्य आहे."
▪️ *पूज्य बुद्धरक्षित भंतेजी:* सहाव्या संगीतीला (बर्मा) हजर असलेल्या भंतेजींनी पुष्टी दिली, "हा, यही शब्द उचित आहे बाबासाहेब महाप्रयाण."
▪️ *पूज्य किरीबत गोड ज्ञान महास्थवीर (श्रीलंका):* त्यांनीही अनुमोदन दिले, "महाप्रयाण शब्द उचित आहे, सचमुच बोधिसत्व का महाप्रयाण ही होता है, निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण नही होता है."
▪️ पूज्य गोयंका गुरुजी यांच्या विधीसाठी सुद्धा 'प्रयाण' शब्द वापरण्यात आलेला आहे.
▪️ *भिक्खु ग्यानरक्षित थेरो* यांचे ही "बाबासाहेबांसाठी महाप्रयाण हा शब्दच उचित आहे" असे म्हणणे आहे.
▪️ *भदंत ज्ञानज्योती महाथेरो* यांच्या मते बोधिसत्वांच्या देह त्यागाला महापरिनिर्वाण म्हणणे योग्य नाही.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी ६ डिसेंबर हा दिवस त्यांच्या बुद्धत्व मार्गातील एका महान टप्प्याचा समाप्ती दिवस आहे, म्हणून या दिवसाला 'महाप्रयाण दिन' असे संबोधणे हेच पाली साहित्य, बौद्ध परंपरा आणि त्यांच्या बोधिसत्त्व स्थितीला उचित सन्मान देणारे आहे.
🙏 सर्वांचे मंगल होवो, कल्याण होवो!
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_ *संकलन व लेखन*
*_आदित्य चंद्रकांत यादव_*
*_महेश हरिश्चंद्र कांबळे_*
*_दिनांक : ०५/१२/२०२५_*
*संदर्भ:*
१ बुद्धवंस
२ मिलिन्द पञ्ह
३ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ( इंग्रजी)
४ Thus spoke ambedkar- vol-2
५ दीघनिकाय
६ संयुत्तनिकाय
७ धम्मपद
८ इतिवुत्तक
९ उदान
१० मज्झिम निकाय
११ जातकट्ठकथा
१२ खंड १६
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼