🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*॥ भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत ॥*
https://mikamblemahesh.blogspot.com/2025/06/blog-post_30.html
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
जगात वेगवेगळ्या धर्म संस्थापकांनी वेगवेगळे धर्म सिद्धांत मांडले आहेत. आपण भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत पाहू या.
भगवान बुद्धाने सांगितलेला कर्म सिद्धांत जगातील अन्य धर्मांच्या कर्म सिद्धांतापेक्षा भिन्न आहे. त्याचा उद्देश मानवाचे कल्याण करण्याचा आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणीचा सर्व जोर कुशल कर्म करणे म्हणजेच क्रियाशील राहणे यावर आहे. धम्म मूर्तीत नाही. विहारात नाही किंवा धम्म ग्रंथात सुद्धा नाही, तर धम्म आचरणात आहे. कर्म करताना बरे-वाईट, खरे-खोटे, सत्य-असत्य, कुशल- अकुशल, हितकारी-अहितकारी इत्यादीचा सारासार विचार केला पाहिजे. भगवान बुद्धाचा धम्म स्वतःसाठी आहे आणि सर्व मानवजातीसाठी आहे. कारण वाईट कर्माने स्वतःला दुःख होते आणि दुस-यालाही दुःख होते. भगवान बुद्ध धम्म उपदेश देताना म्हणतात, "कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे." असे म्हणणे मानणे म्हणजे धम्म. ह्या जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे, ती खालील घटनांनी सिद्ध होते.
१) आकाशातील ग्रहगोलाच्या चलनवलनात - गतीत- एक प्रकारची सुव्यवस्था आहे.
२) ऋतूचक्रमानामध्ये ही सुव्यवस्था आहे.
३) काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बीजाचे वृक्ष होतात, वृक्षापासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून पुन्हा बीज निर्माण होते. या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणा-या नियमाला ऋतूनियम, बीजनियम असे म्हणतात. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो? कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही, त्यांचे उत्तर सरळ आहे. ईश्वर वादी म्हणतात, 'संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने हा संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तो भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे. आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. या ईश्वरवादी समूहाच्या व्याख्येमुळे समाधान होत नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, तर ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत ही तोच असेल आणि माणसाला ईश्वरी आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते?
१) भगवान बुद्ध म्हणतात - माझ्या धम्माचा हेतू मनुष्य सत्कर्मी व्हावा. ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत, परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे म्हणतात त्यांच्या जवळ या प्रश्नांचे उत्तर नाही. सृष्टीचा नैतिक क्रम कसा राखला जातो? या प्रश्नाचे भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. भगवान बुद्ध म्हणतात, 'सृष्टीची नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. निसर्ग नियमाने सांभाळली जाते तिथे ईश्वराचा संबंध नाही. ती नैतिक व्यवस्था माणसाच्या कर्मावर असते.
*कर्म :* कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल, तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल, तर मनुष्य कुशल कर्म करीत आहे असे समजावे. भगवान बुद्ध म्हणतात - दिवसामागून रात्र येते, त्याचप्रमाणे कर्मा मागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे. कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम - या दोहोमध्ये काही कालांतर असते. असे बहुधा घडते.
कर्माचे तीन भाग आहेत, ते खालीलप्रमाणे -
१) दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म - म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म,
२) उपज्ज वेदनीय कम्म - म्हणजे ज्याचा परिणाम फार काळाने होतो,
३) अपरा परिवेदनीय कम्म - म्हणजे अनिश्चित काळाने फळ देणारे कर्म.
काही कर्म असे घडते की त्याचा परिणाम काहीच होत नाही. त्याला अहोसी कर्म असे म्हणतात. इतर प्रबळ कर्मामुळे या चौथ्या कर्माचे परिणाम दिसून येत नाहीत किंवा इतर कर्मामुळे ते कर्म बाद होते. निसर्गातील बिज नियम व ऋतुनियम या अतूट व चिरस्थायी नियमाप्रमाणे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत आहे म्हणजेच कम्मनियम हा अतूट व कायम स्वरुपात आहे. त्या नियमांना प्रतित्य समुत्पाद म्हणतात.
म्हणजेच 'कार्य कारण भाव'. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. नशीब किंवा ईश्वर यांचा माणसाच्या कर्माशी काही संबंध नाही.
*॥ कम्म नियम-कर्माचा नियम ॥*
१) कर्म हे चराचर सृष्टीच्या अस्तित्वाचे आणि विनाशाचे मूळ कारण आहे.
२) कोणतेही कारण किंवा हेतू असल्याशिवाय कर्म घडत नाही.
३) प्रत्येक कर्माला शेवटी फळ असतेच किंवा त्यांचा परिणाम किंवा परिपाक असतो.
४) जसे कर्म तसे फळ : या नियमात फरक होत नाही. ते नियमबद्ध असते म्हणून चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. हे विसरु नये, हा धम्माचा नियम आहे.
५) जसे निरनिराळ्या बीजानुसार निरनिराळी वनस्पती व त्याची फुले, फळे निर्माण होतात तसे भिन्न-भिन्न कर्म बिजानुसार त्यांची बरी-वाईट फळे मिळतात. या कर्म बिजाच्या व त्यांच्या फळाशी किंवा परिणाम स्वरुप वनस्पतीशी आहे. तुमच्या कुठल्याही देव देवतांचा संबंध नसतो आणि म्हणूनच कम्म बिजानुसार माणसाचे अस्तित्व त्याची जीवन अवस्था व त्याचे स्वभाव भिन्न-भिन्न प्रकारचे दिसून येतात.
त्याच्या अवस्थेला पूर्व जन्मातील कर्माचे कारण लावणे चुकीचे आहे. भगवान बुद्धाने पूर्व जन्म नाकारला आहे. या जीवनातील कर्माला मानले आहे.
६) कर्म - संगतीची अवस्था व परिस्थिती यावर कर्म फळाच्या पूर्णत्वाचा कालावधी अवलंबून असतो. त्यानुसार काही कर्माचे फळ थोड्या उशीराने मिळते किंवा अंतर्गत कारणांमुळे काहीचे फळ मिळत नाही. परंतु इतके निश्चित की, ब-या-वाईट कर्मांची बरी-वाईट फळे मिळणारच. ते कोणीही थांबवू शकत नाही. यांनाच कम्म नियम तथा या कम्म प्रक्रियेला प्रतित्य समुत्पाद म्हणतात. उदा. तात्काळ फळ १) आपण एखाद्याला 'अरे' म्हटले की तो मनुष्य 'कारे' म्हणणार, हे तात्काळ फळ.
२) वडिलांनी लावलेल्या आंब्याचे रोपटे व त्याला येणारी फळे ही उशिरा येतात किंवा वडील हयात असताना येत नाहीत. मग त्याच्या मुलांना मिळतात इ. कर्माचा हेतू व उद्दीष्टं आहेत. हेतू दोन प्रकारचे आहेत. या कर्माचा हेतू असा की, काया, वाचा, मने माणसाच्या हातून कुशल, परिशुद्ध कर्म व कर्मचरण घडून त्याला सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे असा बुद्ध धम्माचा हेतू आहे. चांगले कर्म करा, वाईट कर्म करू नका, सत्यहित जाणून डोळसपणे कर्म करा. अंद्धश्रद्धेने गैर कर्म करू नका. म्हणून भगवान बुद्ध उपदेश करतांना खालील गाथा म्हणतात-
*सब्ब पापस्स अकरणं ।*
*कुसलस्स उपसंपदा ॥*
*सचित्त परियोदपनं ।*
*एतं बुद्धानु सासनं ॥*
सर्व पापांपासून दूर राहा, पुण्य कर्माचा संचय करा, मनाला शुद्ध ठेवा, हेच धम्माचे शासन आहे.
मनुष्याच्या मनातील वैरभाव हे सर्व अकुशल कर्माचे उगमस्थान आहे. म्हणून वैरभाव सोडून बंधुभाव जोडा. मैत्री करा. असे भगवान बुद्ध म्हणतात.
*न हि वेरेन वेरानि, सम्मतीध कुदाचनं ।*
*अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ॥*
अर्थ - 'वैराने वैर शमत नाही, तर अधिकच वाढत जाते. बदल्याची भावना निर्माण होते, ते अवैरानेच शमन पावते. म्हणून आपल्या मनामध्ये दुस-या विषयी संपूर्ण आदर व मैत्री भावना असणे गरजेचे आहे. वैर भावनेने आपले व दुस-याचेही नुकसान होते.
भगवान बुद्ध आपला कर्मसिद्धांत सांगताना म्हणतात,
*'अत्ता हि अत्तनो नाथो को हि नाथो परो सिया ।*
*अत्तना 'व सुदन्तेन नाथं लभति दुल्लभं ॥*
१) माणसाचे वाईट कर्म स्वतःकडून घडते.
२) माणसाचा स्वतःमुळेच अधःपात होतो.
३) माणूस स्वतःच वाईट कर्मापासून दूर राहू शकतो.
४) माणसाला स्वतःमुळेच पावित्र्य, शुद्धी वा मुक्ती मिळते.
५) माणसाला पावित्र्य किंवा अपावित्र्यता स्वतःमुळेच मिळते.
६) दुसरा कोणीही माणसाला पवित्र करू शकणार नाही.
७) प्रज्ञा, शील, करुणा व समाधी प्राप्त करून घेण्यासाठी पराकाष्ठा करून आपले कर्म शुद्ध, सतर्क व संयमित करण्यासाठी प्रयत्न करणे, हाच भगवान बुद्धाचा खरा कर्मसिद्धांत आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत व त्याचे उद्दीष्ट व त्यातील मार्गदर्शक अशी काही तत्त्वे भगवान बुद्धांनी सांगितली आहेत. यावरून असे सिद्ध होते की, भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत किती तर्कशुद्ध सांगितला आहे. मानवाला अकुशल कर्मापासून परावृत्त करणारा व कुशल कर्म करण्यास सांगणारा आहे. त्यामुळे मनुष्य कल्याण मार्गावर आरुढ होतो हे सत्य आहे.
सत्यनारायण गोयंका (कर्माविषयी) काही दोह्यांत म्हणतात-
*मन के करम सुधार ले, मन ही प्रमुख प्रधान ।*
*कायिक, वाचिक कर्म तो, मन की है संतान ।*
*कर्म हमारा पुत्र है, कर्म हमारा बाप ।*
*कर्म हमारा रुप है, कर्म स्वयं हम आप ॥१॥*
*अपने अपने कर्म पर, अपनाही अधिकार ।*
*स्वयं बना ले कर्म पंथ, स्वयं मिटवन हार ।*
*अपने दुषित कर्म ही, लाते हैं दुख पैगाम ।*
*त्यो बेचारे देव को, करे व्यार्थ बदनाम ।*
*अपने मन की सरलता, अपना सुख सार ।*
*अपने मन की कुटिलता, अपने ही सिरभार ।*
*भगवान बुद्ध भिक्षुंना कर्म सिद्धांत सांगताना म्हणतात-*
भिक्षुंनो, कर्म हे मनुष्याचा आधार आहे, म्हणून प्रत्येकाने असे समजावे की, जसे आपण कर्म करू तसे फळ मिळणारच. म्हणजेच 'कराल तसे भराल' हे विसरू नये.
१) मी कर्मस्वकिय आहे- म्हणजेच माझे कर्मच मला स्वकिय.
२) मी कर्मदायाद आहे- म्हणजेच जसे कर्म तसे फळ मिळेलच.
३) मी कर्मयोगी आहे- म्हणजेच माझा कर्मामुळेच जन्म झाला.
४) मी कर्म बंधू आहे- म्हणजे संकटात माझे कर्मच माझे बांधव आहे.
५) मी कर्मप्रतिशरण आहे- म्हणजे कर्मच माझे रक्षण करील. अशा प्रकारे आपला कर्म सिद्धांत भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितला आहे.
माणसाचं भलं किंवा वाईट जगातील कुठलीही शक्ती किंवा देव ईश्वर करीत नसतो. आपले बरे-वाईट आपणच करीत असतो व पूर्व जन्माच्या नावाने टाहो फोडून आपले समाधान करून घेतो. वर्तमान जीवनात पूर्व जन्माच्या कर्माचा काही संबंध नाही.
संत कबीर म्हणतात-
*"नर करे करनी तो नर का नारायण बन जाए"*
*आपण जसे कर्म करतो तसेच त्याचे परिणाम असतात.*
*तुच तुझा साथी वेड्या, तुच तुझा साथी !*
*सोने किंवा माती होणे, आहे तुझ्या हाती ॥१॥*
आपण आपल्या जीवनाचे सोने करायचे की माती करायची हे आपणच ठरवावे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत हा त्यांच्या वर्तमान जीवनापुरताच मर्यादित आहे. मरणानंतर काहीही सांगितले नाही. याच जीवनात चांगले कर्म करा आणि त्याची चांगली फळे चाखा.
*॥ याच देही याच डोळा पहा आपल्या मुक्तीचा सोहळा ॥*
भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत हा हिंदू धर्माच्या किंवा ब्राह्मणी धर्माच्या सिद्धांतासारखाच आहे, असा आरोप करण्यात आला. परंतु हे सर्व मुद्दे तथागतांनी खोडून टाकले व बौद्ध धम्मात 'आत्मा' याला तिलांजली दिली. आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केलेत त्यांना उदाहरणासह पटवून सांगितले.
हिंदू धर्माचा कर्म सिद्धांत आत्म्यावर आधारलेला आहे. भगवान बुद्धाने आत्मा नाकारला आहे, हे लक्षात ठेवावे.
गरीबी, श्रीमंती ही गत जन्मीचे दुष्कर्म किंवा पुण्यकर्म असे सांगणे हे दुष्टपणाचे आहे व लोकांना अज्ञानात ठेवणारे आहे. *असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही अर्थ राहणार नाही.* गत जन्माच्या कर्मामुळेच ही अवस्था भोगत आहोत, असे म्हटले तर या जन्मी माणूस काहीच प्रयत्न करणार नाही. व अधिकाधिक दारिद्र्यात जाईल. म्हणून या जन्माचा परिणाम याच जन्मात भोगावा लागतो. मेल्यानंतर काहीच शिल्लक राहात नाही. असे भगवान बुद्धांनी सांगितले आहे.
हिंदू धर्माचा कर्म सिद्धांत हा पूर्ण आत्म्यावर अवलंबून आहे. आपण जे करतो त्याचा आत्म्यावर ठसा उमटतो. आपण मेल्यावर आत्मा दुस-याच्या शरीरात जातो. तुम्ही या जन्मी श्रीमंत असाल तर मागच्या जन्मी तुमचे पुण्यकर्म असेल म्हणूनच श्रीमंताच्या घरात जन्म घेतलात असे समजणे ही अंधश्रद्धा आहे. लोकांना अज्ञानी ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. ते भगवान बुद्धाने नाकारले आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा समाजावर, देशावर परिणाम होत असतो. मंत्र्याचा भ्रष्टाचार, अधिका-यांचा भ्रष्टाचार असो, तो इतरांनाही भोगावा लागतो. उदा. गावात दुष्काळ पडून किंवा अतिवृष्टीमुळे अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. अशा वेळी व्यापा-यांनी धान्यसाठा लपवून ठेवला व भरमसाठ भाव वाढवून पैसे कमवू लागले. काही माणसे अन्नावाचून मरु लागली. मरतांना त्यांच्या वेदनेत व्यापा-यांनी घेतलेल्या पैशाचा खुळखुळाट दिसत असतो. त्या व्यापा-यांबद्दल समाजाला आपुलकी वाटेल काय? नाही. कारण त्याचेकडे मानवता, करुणा, मैत्री भावना नाही. माणुसकी नाही, दया भावना नाही, तो लोभी असतो.
सर्वात वाईट कृत्य कोणी केले असेल की त्यामुळे संपूर्ण देशावर, राष्ट्रावर परिणाम झाला. तो म्हणजे दुस-या महायुद्धात अमेरिकेने नागासाकी व हिरोशिमा या देशांवर अणुबाॅम्ब टाकून राष्ट्र बेचिराख केले.
तसेच एका मनु नावाच्या ब्राह्मणांनी चार वर्ण तयार करून माणसाला जातीयतेत, दारिद्र्यात ढकलून आमच्या हजारो पिढ्या बर्बाद केल्या.
तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यकर्मामुळे त्यांना वैयक्तिक फळ मिळाले. म्हणजेच सायमन कमिशन, गोलमेज परिषद व जागतिक धम्म परिषदेकरिता सन्मापूर्वक बोलावले, कायदा मंत्री पद मिळाले व भारतीय घटनाकार म्हणून त्यांना बहुमान मिळाला. हे त्याच्या कर्माचे फळ आहे.
या सत्कर्मामुळेच या देशातील कोटी-कोटी माणसं समतेच्या रथात बसली आहेत. ती माणसं विकसित झालीत व गुलाम समजणारी माणसं शक्तिशाली झालीत, असंघटित असणारे संघटित झालेत, अज्ञानी असणारे ज्ञानी झाले. गरीब असणारे श्रीमंत झाले. एवढी गरुड भरारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यकर्मांनी झाली. म्हणून माणसाने नेहमी चांगले करावे.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
धन्यवाद! जयभिम!!
लेखक : एम. डी. सरोदे
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼