Wednesday, 29 April 2020

आयुर्वेदाचार्य जीवक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖    

             *_आयुर्वेदाचार्य जीवक_*
https://mikamblemahesh.blogspot.com/2020/04/blog-post_29.html

*संकलन -*  *महेश कांबळे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

          *आचार्य जीवक हे बुद्धाच्या समकालीन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य होते. बर्‍याच बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या वैद्यकीय ज्ञानाची व्यापक स्तुती केली जाते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जीवंत सापडले म्हणून त्यांचे नाव ‘जीवक’ ठेवण्यात आले  होते.*

         तथागत बुद्धांच्या काळात वैशाली एक अत्यंत संपन्न गणराज्य होते. तेथे गणिका आम्रपाली अभिरूप, परम रूपवती, नृत्य, गीत, गायन आणि वादनात प्रवीण होती. *एका प्रसिद्ध श्रेष्टीने राजा बिंबीसाराला सुचविले की राजगृहात सुद्धा वैशाली सारखी एखादी गणिका असावी. शोध घेतल्यानंतर "सालवती (शालवती)" नावाची रूपवान मुलगी सापडली.*

        _सालवती (शालवती) ही वैशालीतील आम्रपाली सारखीच सौंदर्यवती होती. काही दिवसात ती नृत्य कलांत निपुण होत ती राजा बिंबीसाराच्या राज्यातील राजगृहातील नृत्यांगना झाली._ *_ती कुमारी असतांना गर्भवती राहिली. आपल्या बदनामीच्या भीतीने तीने नवजात बाळाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले. "राजकुमार अभय" यास दिसल्यानंतर त्यांनी त्या बाळास राजवाड्यात आणले. "अभयने" त्याला दत्तक घेतले व त्याचे पालनपोषण केले. कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जीवंत सापडले म्हणून त्यांचे नाव ‘जीवक’ पडले._*

      _जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली,  त्याला वाटले राजवाड्यात राहण्यासाठी एखादे शिल्प असल्याशिवाय जगणे कठीण आहे. म्हणून त्याने काही तरी शिल्प शिकण्याचे ठरविले, त्याकाळी तक्षशिलात एक प्रख्यात वैद्य राहत होते. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती._ एकेदिवशी *जीवक कोणालाही न विचारता तक्षशिला येथे पोहचला. त्यानंतर जीवक ने ७ वर्षेपर्यंत तक्षशिलेत वैद्यक शास्त्राचा अभ्यास केला.*
सतत सात वर्ष अभ्यास केल्यानंतर जीवकला असे वाटले की मी खूप अभ्यास करत आहे. मी जो अभ्यास करत आहे त्याचा अंत माहित नव्हता…म्हणून जीवक आपल्या आचार्य वैद्याकडे जाऊन मी सात वर्षांपासून अभ्यास करतोय…केंव्हा या शिल्पाचा अंत माहित होईल.
आचार्य म्हणाले…’जीवक, कुदळ घेऊन जा आणि तक्षशिलाच्या सर्व सर्व दिशांनी फिरून जे *(अभैषज्य)* औषधासाठी उपयुक्त नसलेले ते पहा आणि त्याला घेऊन ये’ मात्र जीवकाला तक्षशिलेच्या सर्व दिशेला एकही अभैषज्य काहीही मिळाले नाही. आचार्य जवळ जीवकाने तसे सांगितले, आचार्य म्हणाले जीवक आता तू आता शिकला आहेस, ते तुझ्या जीविकेसाठी पुरेसे आहे’

   *_अभ्यास पूर्ण करुन जीवक तक्षशिलेतून राजगृहाला परत येण्यास निघाले. साकेत जवळ आले असता त्यांच्याजवळील पैसे संपले. पुढील प्रवासासाठी पैसे जमवावे या उद्देशाने त्यांनी साकेतमध्ये कोणी आजारी आहे काय याची चौकशी केली. साकेत येथील नगरश्रेष्ठीची सेठानी सात वर्षांपासून डोके दु:खीच्या आजाराने पीडीत होती. अनेक वैद्यानी उपचार करूनही तिला आराम झाला नव्हता. जीवकने आपण तिचा आजार बरा करू शकतो असे सांगितले. मात्र कंजुष सेठानीचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा जीवक म्हणाले की. “आजार बरा झाल्यावरच पैसे द्यावे. “सेठानी तयार झाल्यावर जीवकने तिचा आजार ओळखून औषध दिले. ते औषध नाकातून ओढून तोंडातून बाहेर काढण्यास सांगितले. ती पूर्णत : निरोगी झाली. तेव्हा तिने जीवकास मोबदला देऊन सत्कार केला._*

      *_मगध नरेश बिंबीसार भंगदर रोगाने त्रस्त होते. जीवकाने त्यांचा आजार पूर्णपणे बरा केला, तेव्हा त्यांनी जीवकास भरपूर अलंकार दिले. परंतु ते न स्वीकारता फक्त माझी शुश्रुषा तेवढी लक्षात ठेवावी एवढेच जीवकाने म्हटले. बिंबीसाराने जीवकाच्या वैद्यकीय ज्ञानाने प्रभावीत होवून तथागत बुद्धाच्या सेवेसाठी जीवकाला नियुक्त केले. जीवकांनी तथागत बुद्धांची व त्यांच्या भिक्खू संघाची आरोग्य विषयी काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली व जीवकाने ती सहर्ष स्वीकारली._*
     
     *मगधराजा बिंबीसाराने जीवकास राजवैद्य म्हणून घोषित केले होते.*
   
*_जीवकाने राजगृहातील नगरश्रेष्टींचे डोकेदुखी त्याच्या डोक्याचे ऑपरेशन करून बरी केली. बनारस येथील एका श्रेष्टीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया. जीवकाने केलेल्या अनेक ऑपरेशनबद्दलची माहिती महावग्गामध्ये आहे. यावरून लक्षात येते की त्यावेळी जीवकाकडे भूल देण्याची कला अवगत केली होती._*

       *_एकदा तथागत बुद्धांचे शरीर दोषग्रस्त झाले होते. तथागत बुद्ध जुलाबाचे औषध घेऊ इच्छित होते. त्याप्रमाणे जीवकाकडे निरोप पाठवला. जीवकाने प्रथम तथागतांचे शरीर स्निग्ध करण्यास सांगितले. नंतर जीवकाने तथागतांना जुलाबाचे औषध दिले. तथागत बुद्ध बरे झाले. पालि ग्रंथात अनेक वेळा जीवकाने तथागत बुद्धांच्या आजारांवर उपचार केल्याचे वर्णन केले आहे. तसेच जेव्हा देवदत्तने तथागत बुद्धांना जीवे मारण्यासाठी उंच भागावरून मोठा दगड ढकलला होता, त्यात एक छोटा तुकडा बुद्धाच्या पायावर पडून रक्तस्त्राव झाला होता. त्यावेळी जीवकाने त्यांच्यावर उपचार केले होते. याबाबत तिबेटियन ग्रंथात माहिती दिली आहे._*
          *जीवकाने अंवती राजा प्रद्योत हा पांडुरोगाने त्रस्त होता याला सुद्धा बरे केले होते. अवंती राजा हा तापट स्वभावाचा होता परंतु जीवकाच्या उदार सेवेमुळे राजा प्रद्योतच्या तापट स्वभावात बदल झाला आणि शेवटी तथागताला शरण गेला व बौद्ध झाला.*
*_वरील जीवकाच्या वैद्यक कथावरून त्याकाळात सुद्धा हे शास्त्र किती प्रगत होते याची कल्पना करता येईल._*

    *_राजा प्रद्योताने जीवकास अत्यंत मूल्यवान शालजोडी अर्पण केली. जीवकाने ती स्वीकारावयाची भगवंतांना विनंती केली आणि सोबतच सर्व भिक्खुंनीदेखील उकिरड्यावरील वस्त्रांऐवजी चिवरे वापरावयाची अनुमती देण्याची विनंती केली; ज्यामुळे रोगराई प्रमाण कमी व्हावे. भगवंतांनी विनंती मान्य केली. तेव्हापासून भिक्खुंनी चिवरांचे दान स्वीकारणे सुरू केले व त्यांची रोगराईची समस्या बरीच कमी केली._*
     
        *_बिंबीसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू यांच्या पदरी राहिला; आणि आजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंतांकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला._*

     *_जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिषग्वर जीवक दिवसातून दोन वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले वेळूवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्यांच्या मालकीचे "आम्रवन" नावाचे उद्यान होते. तिथे एक सर्वांगीण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले. ह्या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपुर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली. तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली._*
    
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖                          



Tuesday, 28 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

              *_सुजाता_*

        *सुजाता सेनानी ग्राम येथील धनगरांच्या सरदारांची कन्या होती. ते ग्राम फल्गु नदीच्या काठी बोधगयेच्या विरुद्ध दिशेस होते. पूर्वी त्या नदीस नेंरजरा म्हणत.* सुजातेचे लग्न एका कुलपुत्राशी झाले. परंतु बरीच वर्षे तिला मुलबाळ नव्हते. त्यामुळे ती दुःखी होती. *तिने वटवृक्षास देवता समजून नवस केला की तिला मूल झाल्यास ती वृक्षदेवतेची पूजा करील.* त्या श्रद्धामय तरुणीस जेव्हा मूल झाले तेव्हा तिने आपल्या दासीला वटवृक्षाखाली पूजा करील. तेथे अत्यंत कृश शरीराच्या सिद्धार्थाला पाहून दासीला वाटले की, वृक्षदेवता स्वतःच सशरीर तिची पूजा ग्रहण करावयास अवतरली आहे.
      *सुजाताने अत्यंत रुचकर खीर तयार करून सुवर्णपात्रामध्ये ती घेऊन गेली.* सिद्धार्थाने देहदंडनाच्या तपश्चर्येचा त्याग करून, चिंतनाच्या मार्गाने जावयाचा काही वेळापूर्वीच निश्चय केलेला होता, म्हणून त्याने ती खीर ग्रहण केली. सुजातेस आशीर्वाद देऊन नंतर त्या पात्रास नेंरजरा नदीमध्ये फेकून दिले. *खीर ग्रहण केल्याने त्याच्या अंगास शक्ती मिळून मन ताजेतवाने झाले.* त्याने उरुवेला सोडली व तो बोधगयेस आला. त्यानंतर चाळीस दिवस पुरेल एवढे अन्न त्याने जमा केले व बोधिप्राप्तीचा संकल्प करून बोधिवृक्षाखाली बसला.
        *सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती होऊन तो सम्यक संबुद्ध झाला.*
     *_येणेंप्रमाणें सुजातेने दिलेली खीर खाऊन सिद्धार्थाने आपल्या देहदंडनाच्या तपश्चर्येचा भंग करून चिंतनमय मार्गाचा अवलंब केला व पुढे त्यास संबोधी प्राप्त झाली, यास्तव सुजातेच्या दानाला सर्वाधिक महत्वाचे दान मानण्यात येते._*

*संकलन -*  *महेश कांबळे*


🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

              *थेरी उप्पलवण्णा*
   
         *_उप्पलवण्णा (उत्पलवर्णा) ही श्रावस्तीच्या कोषाध्यक्षाची मुलगी होती. तिचा वर्ण निळ्या कमळाच्या गर्भासारखा सुंदर असल्यामुळे तिला उत्पलवर्णा म्हणू लागले._* पुष्कळसे सामंतपुत्र आणि श्रेष्टीपुत्र तिच्याशी लग्न करावयास उत्सुक होते. परंतु *तिने गृहत्याग करून प्रव्रज्या ग्रहण केली.*

      *_एके दिवशी तिने दिवा पेटविला व सतत त्याकडे पाहून चिंतन करू लागली. हळूहळू तिने अभिज्ञा आणि पटिसंभिदेच्या योगाने अर्हत्वपद प्राप्त केले. ज्या भिक्खुणींना रिद्धी प्राप्त झाली, त्यांच्यामध्ये तिला प्रमुख गणले जाते असे._*

*संकलन -*  *महेश कांबळे*


Sunday, 26 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                     *_अंगुलीमाल_*
 
          तो कोशल राजाच्या पुरोहिताचा पुत्र होता. *त्याचे नाव अहिंसक होते.* _तो अंत्यत आज्ञाधारक, उद्योगी आणि प्रियभाषी होता._
   
        त्यामुळे *त्याच्याविषयी द्वेषभावना जागृत होऊन त्याच्या सहपाठी विद्यार्थ्यांनी त्याच्याविरुद्ध गुरुमातेला मध्ये गोवून खोटाच आरोप लावला. त्यावर त्याच्या आचार्यांनी त्याला शिक्षा करावयाच्या उद्देशाने गुरुदक्षिणा मागितली ती अशी की त्याने शेकडो लोकांचा वध करावा (जेणेकरून कोणीतरी त्याचाही वध करील.) त्यानुसार अहिंसकाने जंगलात राहून आडवाटेने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचा वध करून त्यांच्या करंगळ्यांची माळ करणे सुरू केले. त्यामुळे त्यास अंगुलीमाल म्हणू लागले. त्याची संपूर्ण राज्यात मोठीच भीती निर्माण झाली होती, परंतु त्याने कोणाचीही संपत्ती लुटली नाही.*

          भगवंतांनी त्याच वाटेने जाऊन त्यास उपदेश केला. त्यामुळे प्रभावित होऊन त्याने श्रमनाची दीक्षा घेतली. _लोकांना जेव्हा समजले की, हा भिक्खूच अंगुलीमाल आहे, तेव्हा *त्यांनी त्याला दगड मारून जखमी केले.* परंतु *ते सर्व सहन करीत अंगुलीमालाने धम्माचरणांत प्रगती केली व मोठे नाव कमाविले*._

*संकलन -*  *महेश कांबळे*


Saturday, 25 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                     *खेमा*

          *खेमा (क्षेमा) हिचा जन्म सागल राजवंशात झाला. ती अतिशय सुंदर असून तिची कांती सुवर्णासारखी होती. तिचे बिंबिसार राजा बरोबर लग्न झाले.* एके दिवशी तिने असे ऐकले की, भगवान बुद्ध सुंदरतेची निंदा करतात. राजा *बिंबिसार भगवंतांचा प्रशंसक असून त्याची भगवंतांवर अगाध श्रद्धा होती.* त्याने आपल्या राजकवीला वेळूवनाच्या सौंदर्याविषयी काव्य रचून महालात त्याचे मोठमोठ्याने गायन करावयास सांगितले जेणेकरून ते राणीच्या कानी पडावे. क्षेमाने हे ऐकले व वेळूवणाची उत्सुकता लागून राजाची परवानगी घेऊन ती वेळूवनास गेली.
       _जेव्हा ती भगवंतांसमोर गेली तेव्हा भगवंतांनी तिच्या मनातील सौंदर्याबद्दलचे स्वाभिमानाचे भाव ओळखून आपल्या रिद्धीबलाने एक सुंदर अप्सरा पंख्याने वारा घालीत असल्याचा भास निर्माण केला. त्या अप्सरेचे स्वतःहून अधिक असलेले रुपलावण्य पाहून राणीला आपल्या रूपाची लाज वाटू लागली. पाहता पाहता ती अप्सरा तारुण्यांतून प्रौढावस्थेत व नंतर जराजर्जर म्हातारपणांत पोहचलेली तिला दिसली. तिचे दात पडलेले, केस पांढरे झालेले, सुरकुत्यांचा चेहरा असलेली आणि शेवटी ती आपल्या पंख्यासहितच जमिनीवर पडली, असे तिला दिसले. ते पाहून क्षेमाला वाटू लागले की, तिच्या नशिबिदेखील अशीच विपन्नावस्था लिहिलेली असणार._
    *तिचे मन येणेप्रमाणे नरम झालेले पाहून आणि धम्मोपदेश ऐकण्यास तयार झालेले जाणून भगवंतांनी उपदेश केला व क्षेमाला तिथल्यातीथेच विमल विरज चक्षु उत्पन्न झाला. त्यानंतर राजाच्या परवानगीने क्षेमाने भिक्खूणीची दीक्षा घेतली.*
   
     *_खेमाने अंतर्मनाच्या सर्व अवस्थांवर प्रभुत्त्व मिळविले व भिक्षुनी संघामध्ये "महाप्रज्ञावती" अशी तिची ख्याती झाली._*


*संकलन -*  *महेश कांबळे*


🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                *आम्रपाली*
   
        *भगवान बुद्ध वैशालीस पोहोचल्यावर आम्रपाली गणिकेच्या उपवनांत थांबले*, ते ऐकून ती खूप आनंदित झाली तेथे जाऊन तिने भगवंतास प्रणाम केला.
       ती अगदी साध्या वेशात होती भगवंतांनी विचार केला, *"ही स्त्री सांसारिक वातावरणात राहते. राजांची व राजपुत्रांची ती आवडती आहे, तथापि तिचे अंतःकरण शांत व मन संतुष्ट आहे, वयाने तरुण, विलासाने वेढलेली तरीपण ती विवेकी व निश्चयी आहे."* नंतर भगवंतांनी धार्मिक प्रवचनाने तिला मार्गदर्शन केले व तिच्या मनास जागृत करून प्रफुल्लित केले. आम्रपालीने त्यांना भिक्खूसंघासहित भोजनाचे निमंत्रण दिले व त्यांनी मौन राहूनच ते स्वीकारले.
      राजतुल्य असा श्रीमंत लिच्छवी परिवारदेखील भगवंतांच्या दर्शनास निघाला. वाटेत त्यांना आम्रपाली भेटली, परंतु त्यांच्यापुढून ती मोठ्या स्वाभिमानाने जाऊ लागली. त्याचे कारण विचारताच, भगवंतांनी तिचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारलेले असल्याचे तिने सांगितले. *भगवंतांच्या या निमंत्रणाचा मान आम्हास घेऊ दे, अशी विनवणी करून त्याबद्दल लिच्छविंनी तिला अनेक लक्ष मोहरा देऊ केल्या, परन्तु तिने भगवंतांच्या जेवणाचा मान स्वतःकडेच राखला*. दुसऱ्या दिवशी मोठ्या मेहनतीने तिने जेवणाची सिद्धता केली.
     दुसऱ्या दिवशी भगवंतांनी संघासंवेत तिच्याकडे पाचारण केले. *जेवण संपल्यावर आम्रपालीने आपला वाडा भिक्षुसंघास दान केला.* त्यानंतर भगवंतांनी धाम्मीक प्रवचनाने तिचे मार्गदर्शन केले. *आम्रपाली ही गणिका असुनही तिच्या शुद्ध अंतःकरणामुळे भगवंतांनी तिला श्रेष्ठ उपासिकेचे स्थान दिले.*


*संकलन -*  *महेश कांबळे*


🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                      *आनंद*

             *शुद्धोदनाचा धाकटा भाऊ अमितोदन याचा आनंद हा मुलगा होता.* त्याने *पुष्णमन्तानिपुत्त याचे शिष्यत्व पत्करून सोतापत्ति पदास प्राप्त केले.* भगवंतांच्या संबोधिप्राप्तीनंतर वीस वर्षांनी आनंदास आपल्यासोबत नेहमीसाठी राहावयास निवडले व पुढील पंचवीस वर्षे *आ. आनंद भगवंतासोबत सावलीप्रमाणे राहिले; आणि परिचारकाप्रमाणे सेवा केली.*
 
       *महाप्रजापती गौतमी हिची स्वतः भिक्खूणी व्हावयाची फार इच्छा होती. तसेच स्त्रियांनादेखील धम्मलाभ व्हावा या उद्देशाने भिक्खूणी संघाची स्थापना व्हावयास पाहिजे, असे तिला मनःपूर्वक वाटत होते. त्याकरिता वारंवार विनंती करूनही भगवंताचे मन वळवले व त्यामुळे भिक्खूणी संघाची स्थापना झाली व भिक्खूणी त्यांना अतिशय आदराचे स्थान देत असत.*
      भगवंतांच्या महापरिनिर्वाण समयी आ. आनंदांनी भगवंतांची फारच सेवा केली. तथागतांचे महापरिनिर्वाण एखाद्या महानगराशेजारी व्हायला पाहिजे असे आनंदांना वाटत होते, जेणेकरून भगवंतांच्या असंख्य अनुयायांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे.
         *जेव्हा प्रथम संगीति झाली, तेव्हा महास्थविर आनंदांना सुत्रपठन करावयास व त्यांची तपासणी करावयास प्रमुख नेमण्यात आले.* कारण भगवंतांसोबत सर्वांत अधिक वास्तव्य त्यांचेच होते. बहुतेक सुत्तांच्या आरंभी *"एवं मे सुतं" (असे मी ऐकले आहे)* हे वाक्य असते. प्रथम संगीतिमध्ये महाकाश्यपांनी, 'तुम्ही काय ऐकले आहे?' असा आ. आंनदाना प्रश्न विचारला असता त्यांनी "एवं मे सुतं" असे म्हणून भगवंतांकडून ऐकलेली सूत्रे सांगितली.

       *बहुश्रुत भिक्खुश्रावकांत, स्मृतिमान भिक्खुश्रावकांत, गतिमान भिक्खुश्रावकांत, धृतिमान भिक्खुश्रावकांत आणि उपस्थायक भिक्खुश्रावकांत आनंद महास्थविर सर्वश्रेष्ठ होते*

*संकलन -*  *महेश कांबळे*

Wednesday, 22 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                     *कोसलनरेश प्रसेनजित*
 
        राजा प्रसेनजिताला भगवंतांविषयी नितांत आदर होता. श्रावस्ती ह्या नगरास भगवंतांनी पंच्याहत्तर वेळा भेटी दिल्या. त्यांनी राजाला वेळोवेळी उपदेश केला.
           *"आपली बरीवाईट कृत्ये नेहमी आपला पाठपुरावा करतात, सर्वांत अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची,        राजेशाही बडेजावास अवास्तव महत्व देऊ नये, तोंडपूजा करणाऱ्यांच्या गोडगोड स्तुतिस भाळून जाऊ नये,  तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन करून सदाचरणाचे महत्व ओळखावे. सर्वात अधिक आवश्यकता प्रेमळ अंतःकरणाची आहे. ज्याप्रमाणे लोक आपल्या एकुलत्या एक पुत्रास जपतात, त्याप्रमाणे आपण प्रजेला जपावे, दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती  सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल, सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात ते काम वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात, झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षीं कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे, ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालावंग प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणें म्हणजे जीवनाचे अपयशच होय, सर्व ग्रंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे; कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे,  आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे म्हणून आपण सत्कर्मेच करावित, मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठता असू द्या, सदवर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल ".* इ. राजा प्रसेनजित जेतवनांत जाऊन उपदेश ग्रहण करीत असत.!
        *भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले.*

*संकलन -*  *महेश कांबळे*


Tuesday, 21 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                     *महाभिज्ञा यशोधरा*

        कोलीय देशाच्या दंण्डपाणीची यशोधरा ही अत्यंत लावण्यसंपन्न व गुणवती कन्या होती. तिचे *माहेरचे नाव गोपा असे होते.* स्वयंवरानुसार तिने सिद्धार्थाच्या गळ्यात माळ घातली. त्यावेळी ती पंधरा वर्षांची होती व सिद्धार्थ सोळा वर्षांचा.
    _सिद्धार्थाने गृहत्याग केल्यामुळे तिला अत्यंत दुःख होणे स्वाभाविकच होते. परंतु *सिद्धार्थाच्या तपश्चर्येबद्दल आणि देहदंडनेबद्दल जसजशी बातमी तिला मिळत असे, तसतशी तीदेखील स्वतःचे केशवपन करून उपासतापास करीत असे व अत्यंत साधेपणाने राहून बाळ राहुल आणि सासुसासरे यांची सेवा करीत असे.*_
    जेव्हा *भगवंतांनी कपिलवस्तूस आगमन केले तेव्हा तिने आपला पुत्र राहुल यास त्यांच्याकडे पाठवून वारसा हक्काची मागणी करविली व सातच वर्षे वय असलेल्या राहुलास श्रमणत्वाची दीक्षा देण्यात आली. येणेप्रमाणे आपल्या एकमात्र पुत्रास यशोधरेने धम्मकार्यास समर्पित केले.*
     _भिक्षुनी संघाची स्थापना करावयास पाचशे कुमारिकांना घेऊन महाप्रजापती भगवंतांकडे गेली त्यावेळी यशोधरेने देखील प्रव्रज्या ग्रहण केली._ *कठीण साधना आणि शिलपालन करीत करीत तिने महाभिज्ञा प्राप्त केली.* आणि भिक्षुनी संघात *महाथेरी कात्यायनी, (भद्दा कच्चाना) या नावाने विख्यात झाली*

       *आपल्या पतीची ती खरी अनुगामिनी झाली. धन्य ती यशोधरा !*

*संकलन -*  *महेश कांबळे*

*टीप :* _जाणकार आणि अभ्यासकारांना विनंती आहे की, सदर माहितीमध्ये अधिक माहिती जोडून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे_

Monday, 20 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                     *आयुष्यमान उपाली*

    *भद्दीय, अनुरुद्ध, आनंद, भृगु, किम्बिल, देवदत्त आणि उपाली ह्यांची प्रव्रज्जा बरोबरच झाली. ह्यांच्यापैकी पहिले सहा जण शाक्य होते परंतु उपाली न्हावी होता*. शाक्य-कुमार उपाली नाव्यासह जेव्हा भगवंतांजवळ पोहचले, तेव्हा ते म्हणाले - "भन्ते! आम्ही शाक्य अहंकारी आहोत. हा उपाली न्हावी नेहमीच आमचा दास राहिला आहे. भगवंतांनी प्रथम ह्याला दीक्षा देऊन प्रव्रजित करावे, जेणेकरुन आम्ही ह्याला आदरपूर्वक वंदन करू, ह्याला हात जोडून नमस्कार करू. ह्यामुळे आम्हा शाक्यांचा असलेला जातीयवादी अभिमान गळून पडेल.
    तेव्हा भगवंतांनी उपालिस प्रथम प्रव्रजित करून शाक्यकुमारांना नंतर प्रव्रजित केले. *भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर जी प्रथम संगीता झाली होती, त्यावेळी महाकाश्यप यांनी विणायासंबंधी प्रश्नांचे निरसरण करण्याकरिता ह्याच महास्थविर विनयधर उपालीची निवड केली होती.*

*विनयधर भिक्खुश्रावकांत उपाली सर्वश्रेष्ठ होते.*

*संकलन -*  *महेश कांबळे*


🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

                     *मिगारमाता विशाखा*
       साकेत नगरचा श्रेष्टी धनंजय याची रूपवती कन्या विशाखा हिचा विवाह श्रावस्तीचा श्रेष्टी मिगार याचा पुत्र पूर्णवर्धन यांच्याशी झाला. तिची लहानपणापासूनच भगवंतांवर आणि भिक्खूसंघावर श्रद्धा होती, परंतु सासरा मिगार श्रेष्टी ह्याची निर्गंथ साधूंवर श्रद्धा होती. ते नग्न साधु त्याचा घरी आले व सासऱ्याने तिला त्यांचे दर्शन घ्यावयास बोलाविले. त्या नग्न साधूंना पाहून ती त्वरीतच परतली. त्यावर तिने उत्तर दिले की, निर्वस्त्र लोकांमध्ये ती निर्लज्जपणे जाऊ शकत नाही. निर्गंथ साधूंनी ते ऐकले तेव्हा तीव्र संताप व्यक्त करून त्यांनी विशाखेची माहेरी रवानगी करण्याची मागणी केली. मिगारश्रेष्टीने त्यांची क्षमा मागून कशीबशी समजूत काढली.
      एके दिवशी सासरा जेवणास बसला असताना, विशाखा त्यास पंख्याने वारा घालीत सेवा करू लागली. तेवढ्यात एक बौद्ध श्रमण भिक्षाटनासाठी दारात आला. परन्तु मिगारश्रेष्टीने त्याला पाहुनदेखील न पाहिल्यासारखे केले. त्यावर विशाखेने श्रमणास उद्देशून म्हटले, "भन्ते, माझे शश्वुर शिळे खात आहेत. तुम्ही अन्यत्र जावे." त्यामुळे मिगारश्रेष्टीचा पारा अत्यंत चढला व त्याने विशाखेला "आत्ताच चालती हो" असे रागावून म्हटले. परंतु विशाखेने शांतपणे सांगितले की, तिच्या पित्याने नेमलेल्या अष्ट मंडळीस बोलवावे. ते आल्यावर आल्यावर तिने स्पष्टीकरण दिले. *"माझे सासरे जुन्या पुण्यावरच संतोष करीत आहेत. नवीन पुण्य अर्जन करू इच्छित नाहीत. त्यामुळेच ते शिळे खात आहेत, असे मी म्हटले.* त्यावर अष्टमंडळी संतुष्ट झाली. परंतु मिगारश्रेष्टी म्हणाला, "हिच्या वडिलांनी माहेराहून रवानगी करताना हिला भलतीसलती शिकवण दिलेली आहे व ती तिचा स्वेच्छेने वाटेल तो अर्थ काढून तशीच वागते" त्यावर विशाखेने पित्याने तिला दिलेल्या दहा शिकवणींचा उलगडा येणेप्रमाणे केला -
*१.* घरातील अग्नी बाहेर घेऊन जाऊ नकोस, म्हणजे सासू-सासरे, नणंद, जेठ वगैरे कोणी निंदा केल्यास ते घराबाहेर सांगू नये.
*२.* बाहेरील अग्नी घरात आणू नकोस - बाहेरची भांडणे घरात सांगू नये.
*३.* ज्या व्यक्तीकडून जी गोष्ट घेतली ती निश्चित वेळी परत केलीच पाहिजे.
*४.* ज्या व्यक्तीपासून वस्तू घेतली ती इतर कुणास न देता त्याच व्यक्तीला परत करावी.
*५.* प्रियजन निर्धन असल्यास यथासामर्थ्य मदत करावी.
*६.* गृहिणीचे कर्तव्य आहे की, सर्वांचे जेवण झाल्यावरच स्वतः जेवावे.
*७.* सर्वजण झोपावयास गेल्यावर गृहिणीने विश्राम करावा.
*८.* वारंवार उठावे लागणार नाही अशाच स्थानी बसावे.
*९.* ज्याप्रमाणे ब्राह्मण अग्नीची परिचर्या करतात त्याप्रमाणे पूर्ण निष्ठने पतीची सेवा करावी.
*१०.* सासू सासरे इत्यादी वडील मंडळींची ग्रहदेवाप्रमाणे सेवा करावी.

     याप्रमाणे विशाखेचे उत्तरे ऐकून अष्टमंडळी प्रसन्न झाली व मिगारश्रेष्टी खजील झाला. त्यावेळी बौद्ध श्रमणांना दानधर्म करावयाची तिला मुभा देण्यांत यावी याविषयी तिने सासऱ्याला केली व ती त्याने मान्य केली. तदनुसार विशाखेने भगवंतांना व भिक्खूसंघाला निमंत्रित केले. निर्गथांनी मिगारश्रेष्टीला भगवंतांचा उपदेश श्रवण न करण्याची ताकीद दिली होती. परंतु विशाखेच्या अनुनयामुळे भगवंतांचा उपदेश पडद्याआडून ऐकावयास त्याने संमती दिली.
       तथागतांचा उपदेश ऐकून मिगारश्रेष्टी आनंदविभोर झाला. त्याच्या बुद्धीवरील अंधकाराचे आवरण दूर झाले. त्याने पडदा दूर सारला व भगवंतांच्या चरणांवर त्याने डोके ठेवले, व तो बौद्ध उपासक झाला. हा सुअवसर त्याला विशाखेमुळेच प्राप्त झाल्यामुळे *"आजपासून ही माझी धार्मिक माताच होय"* असे सर्वांसमक्ष सांगितले. तेव्हापासून *विशाखेस मिगारमाता* असे संबोधन मिळाले.
    *विशाखेने भिक्खूसंघाच्या हिताकरिता भगवंतांजवळ आठ वर मागून घेतले*, व ते काय आहेत हे जाणून घेतल्यावर भगवंतांनी तिला अनुमती दिली.
  विशाखा म्हणाली, *भगवंत जे वर मी मागु इच्छिते ते योग्य व कल्याणकारी आहेत* ते वर असे -
*१.* पूर्ण वर्षासाठी भिक्खूसंघाला लागणारी वस्त्रें माझ्या आयुष्यभर मी पुरवावी, अशी माझी ईच्छा आहे.
*२.* मी आगंतुक भिक्खुंना भिक्षांन्न  देऊ इच्छिते आणि
*३.* येथून परगावी जाणाऱ्या भिक्खुंना भिक्षांन्न  देऊ इच्छिते
*४.* आजारी भिक्खुंकरिता भिक्षांन्न 
*५.* आजाऱ्याची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खुंनांही भिक्षांन्न देऊ इच्छिते
*६.* आजारी भिक्खूकरिता औषधे आणि
*७.* सर्व भिक्खूसंघाला तांदळाची खीर (पायस) देऊ इच्छिते
*८.* भिक्खूणींकरिता स्नानाच्या वेळी वापरण्यासाठी वस्त्रे देऊ इच्छिते.
    त्यावर भगवंतांनी विचारले, 'विशाखे, असे कोणते कारण घडले की तू तथागताकडून हे आठ वर मागत आहेस?"
   त्यावर तिने सांगितले, _'भगवंत मी दासीला आज्ञा दिली होती की, जा भोजन तयार असल्यामुळे भिक्खूसंघाला बोलावून आण' तेव्हा दासीला विहारांत भिक्खुंनी पाऊस पडत असताना आपली वस्त्रे काढलेली आहेत असे दिसले. भगवंत नग्नता घृणास्पद आणि मलिन आहे, म्हणून मी वर्षाऋतुसाठी संघाला विशेष प्रकारची वस्त्रे यावज्जीव पुरविण्याची इच्छा केली. आगंतुक भिक्खूला रस्त्यांची माहिती नसल्यामुळे, विहारात परत येतांना भिक्षाटनाने तो पूर्णपणे थकून गेलेला असतो, म्हणून आगंतुक भिक्खुंना अन्नदान करु इच्छिते. भिक्षेच्या शोधांत राहिल्याने प्रवासास जाणारा भिक्खु बरोबरीच्या भिक्खुंच्या मागे सुटु शकतो, हे *तिसरे कारण. चवथे कारण* असे की आजारी भिक्खूला पथ्यकारक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढू शकतो, *पाचवे कारण* असे की, जो भिक्खु आजाऱ्याची सुश्रुषा करावयास त्याच्याजवळ थांबलेला असतो, त्याला भिक्षा मागावयास बाहेर जायची संधीच मिळायची नाही. *सहावे कारण* असे की, जर आजारी भिक्खूला योग्य औषधी मिळाली नाही तर त्याचा आजार वाढू शकतो. *सातवे कारण* असे की, भगवंतांनी तांदळाच्या खिरीची स्तुती केलेली आहे कारण तिने मन ताजेतवाने होते. *आठवे कारण* असे की, भिक्खूणी अचिरावती नदीच्या एकाच घाटावर गणिकांच्या सोबत नग्न अवस्थेत स्नान करतात व गणिका भिक्खूणींचा उपहास करतात.भगवंत स्त्रियांची नग्नता किळसवाणी, तिरस्करणीय आणि मलिन असते._ त्यावर सर्वांनी तिला साधुकार दिला.
 
*संकलन -*  *महेश कांबळे*


Sunday, 19 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

              *राजा बिंबिसार*

          कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थाने विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता.राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी सिद्धार्थाने बनविली. सिद्धार्थाने नुकतीच प्रव्रज्या घेतल्यानंतर मगध साम्राज्याचा *राजा बिंबिसार याने सिद्धार्थाला आपले अर्धे राज्य देऊ केले होते आणि प्रव्रज्येचा त्याग करून राजपद स्वीकारण्याची विनंती केली होती. परंतु सिद्धार्थाने दुःखमुक्तीच्या कारणांचा शोध लावण्याचा जो प्रण केला होता, त्यास सोडले नाही. तेव्हा राजा बिंबिसाराने सिद्धार्थास अशी विनंती केली की सद्धम्माची प्राप्ती झाल्यावर राजगृहास येऊन आपला शिष्य स्वीकारावे. त्यानुसार संबोधि प्राप्त झाल्यावर भगवान राजगृहास गेले व राजाला व जनतेला धम्माचा उपदेश केला.
         भगवंतांचा उपदेश तो  ऐकून *राजा बिंबिसार भगवंतांचा आजन्म शरणागत उपासक झाला.*
     *भगवंतांच्या निवासासाठी राजाने वेळूवन उपवन भिक्खूसंघास दान केले.* ते स्थान शहरापासून फार जवळ अथवा फार दूर नव्हते आणि दर्शनास उत्सुक असलेल्या लोकांना जायला सुलभ होते. राजगृहास भगवंतांनी चोवीस वेळा भेटी दिल्या व वेळूवनांत वास्तव्य केले. त्यामुळे राजा बिंबिसार व त्याच्या प्रजेस मोठाच लाभ झाला.
 
*संकलन -*  *महेश कांबळे*


Saturday, 18 April 2020

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका* 🌹

              *महाप्रजापती गौतमी*

          देवदह नावाच्या गावात कोलीय वंशातील पिता अंजना व आई सुलक्षणा यांना दोन अत्यंत रूपवती कन्या होत्या, महामाया व महाप्रजापती. त्यांची लग्ने कपिलवस्तूच्या शुद्धोदन राजाशी लावण्यात आली. ज्येष्ठ महामायापासून सिद्धार्थाचा जन्म झाला. द्वितीय प्रजापातीपासून नंद नावाचा पुत्र झाला. गौतम वंशीय वधू झाल्यामुळे तिला 'महाप्रजापती गौतमी' असे संबोधू लागले.
     महाप्रजापतीची आपल्या बहिणीवर फारच श्रद्धा होती. सिद्धार्थाच्या जन्मानंतर केवळ सातच दिवसात महामायाचे निधन झाले. तेव्हा सिद्धार्थाचे लालनपालन महाप्रजापतीने मोठ्या प्रेमाने केले. तिच्या ममतामयी मातृप्रेमाणे सिद्धार्थाने दया, दान, कार्यकुशलता इ. अनेक गुणांनी ओतप्रोत होऊन विद्याभ्यास केला. सिद्धार्थाच्या सर्वच कामांत उत्साहित राहणाऱ्या महाप्रजापतीला त्याच्या गृहत्यागामुळे अतिशय दुःख झाले. तथापि सून यशोधरा हिला झालेले दुःख कमी करावयाचा ती आटोकाट प्रयत्न करीत असे.
     भगवंतांच्या कल्याणकारी उपदेशाचा तिच्या मनावर अतिशय खोलवर परिणाम झाला. तीलादेखील परिव्रजा देण्यात यावी अशी तिने भगवंतास विनंती केली. एकदा भगवान बुद्ध वैशाली येथे वास्तव्य करीत असतांना पाचशे शाक्य कुमारिकांना व यशोधरेला सोबत घेऊन महाप्रजापतीने पायीच वैशालीपर्यंत यात्रा केली. तिचे पाय सुजून गेले होते. तिने भिक्षुनी संघाच्या स्थापनेकरिता भगवंतांस कळकळीची विनंती केली. तरीदेखील भगवंतांनी तिची विनंती मान्य केली नाही.
    तेव्हा आयु. आनंदांनी भगवंतांना विचारले, 'आपल्या पवित्र धम्मात स्त्रियांच्या कल्याणासाठी सोया नाही काय?' त्यावर *भगवंतांनी स्पष्ट केले, 'श्रोतापत्ती, सकृदागामी फळ, अनागामी फल आणि अर्हतपद प्राप्त करून घेण्यास स्त्रिया सक्षम आहेत, परंतु स्त्रियांच्या भिक्षुनी होण्याबद्दल व्यावहारिक अडचणी आहेत.'*  तथापी महाप्रजापतीने वारंवार केलेल्या अनुनयामुळे व स्त्रियांची धम्माविषयीची निष्ठा पाहून स्त्रियांना भिक्षुनी होण्यास स्वीकृती दिली. स्त्री जातिकरिता तो अत्यंत गौरवशाली दिवस होता. त्या दिवशी पाचशे कुमारिकांना काषाय वस्त्रे परिधान करून भिक्षुनी संघाची स्थापना केली. महाप्रजापती गौतमी संघप्रमुख होती.
  *महाप्रजापतीने एकाग्रचित्ताद्वारे आणि अलौकिक ज्ञानसाधनेद्वारे अर्हतपद प्राप्त केले.* थेरिगाथेमध्ये तिची अपूर्व भक्तीने ओतप्रोत उदाहरणे विद्यमान आहेत. येणेप्रमाणे स्त्रियांना पुरुषांच्या समकक्ष पोचविण्याचे जे महत्कार्य  महाप्रजापती गौतमाने केले त्यामुळे तिचे नाव अजरामर झालेले आहे. चिरप्रव्रजित भिक्षुनी श्राविकांमध्ये महाप्रजापती गौतमी पहिली आहे.
 
*संकलन -*  *महेश कांबळे*


धम्मसेनापती आयुष्यमान सारिपूत्त

🌹 *बुद्ध धम्मातील विशिष्ट भिक्खु-भिक्षुनी-उपासक-उपासिका*

*_धम्मसेनापती आयुष्यमान सारिपूत्त_*
     संजय मुनींच्या अडीचशे शिषयांपैकी सारिपूत्त व मोद्गल्यायन हे दोन ब्राह्मण पट्टशिष्य होते. एकदा *आयु. अश्वजित* नावाचा अनुयायी फारच संयमाने एकेक पाऊल टाकीत जात असलेला सारिपुत्तांना दिसला. तेव्हा तो कोणाचा शिष्य आहे व त्याच्या धम्माचे मर्म काय आहे, असे त्याला विचारले. "मी तथागताचा शिष्य आहे" असे सांगुन त्याने एक गाथा म्हटली -
*ये धम्मा हेतुप्पभवा तेसं हेतुं तथागतो आह।*
*तेसञ्च यो निरोधो एवं वादि महासमणो'ति ।*
(अर्थ - _कारणापासून उत्पन्न झालेले जे पदार्थ म्हणजेच पंचस्कंधादिक दुःखद पदार्थ यांचे कारण तथागताने सांगितलेले आहे, व त्यांचा निरोध कसा होतो हेही सांगितले आहे, हेच महाश्रमणाचे मत होय_.)
     व येणेप्रमाणे अश्वजिताने धम्माचे मर्म संक्षिप्तपणे सांगितले. ते ऐकून सारिपुत्ताला तेथल्या तेथेच विमल, विरज, सत्यचक्षु प्राप्त झाला. त्यानंतर सारिपूत्त आणि मोद्गल्यायन यांनी भगवंतांकडे जाऊन दीक्षा घेतली.
      *सारिपूत्ताची धीरगंभीर प्रकृती व प्रज्ञावंत वाणी यामुळे ते सर्वांचे प्रिय झाले*. भगवंतांनी त्यांच्याविषयी उद्गार काढलेले होते, " _जगज्जेता सम्राटाचा ज्येष्ठ पुत्र ज्याप्रमाणे सम्राटाच्या मुख्य सेनापतीप्रमाणे त्याला मदत करतो, त्याप्रमाणे धम्मचक्राचे प्रवर्तन करावयास माझा मुख्य अनुयायी होऊन सारिपूत्त मला मदत करील._"

*सारिपुत्तांची धम्मसेवा प्रामुख्याने गणली जाते.*
           अनाथपिण्डिकाने दान केलेल्या जेतवन विहाराचे बांधकाम त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. *महाज्ञानी भिक्खुंमध्ये सारिपूत्त सर्वश्रेष्ठ होते.* सेल ब्राह्मणाने भगवंताला, "आपला सेनापती कोण?" असा प्रश्न केला असता, त्यांनी म्हटले -

*मया पवित्तितं चक्कं धम्मचक्कं अनुत्तर ।*
*सारिपुत्तो अनुवत्तेति अनजातो तथागतं ।।*
( _मी प्रस्थापित केलेले धम्मचक्र सारिपूत्त चालवीत आहे. तथागताच्या मागोमाग जाणारा तो आहे_)

संकलन - महेश कांबळे

*टीप :* _जाणकार आणि अभ्यासकारांना विनंती आहे की, सदर माहितीमध्ये अधिक माहिती जोडून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे

राहुलवत्थु

राहुलवत्थु अथ खो भगवा राजगहे यथाभिरन्तं विहरित्वा येन कपिलवत्थु तेन चारिकं पक्कामि। मग भगवान बुद्ध, राजगृह येथे त्यांना आवडेपर्यंत राहिल्यान...